scorecardresearch
Wednesday, 1 April, 2026
घरराजकारणकाँग्रेसकडून वायनाड भूस्खलनग्रस्तांसाठीच्या पुनर्वसन प्रकल्पाची पायाभरणी

काँग्रेसकडून वायनाड भूस्खलनग्रस्तांसाठीच्या पुनर्वसन प्रकल्पाची पायाभरणी

2024 यावर्षी वायनाड येथे झालेल्या भूस्खलनातील पीडितांना एलडीएफ सरकार घरांच्या पहिल्या टप्प्याचे वाटप करणार आहे, त्याच्या काही दिवस आधी, काँग्रेसने गुरुवारी त्यांच्या पुनर्वसन प्रकल्पाची पायाभरणी केली, ज्याचा उद्देश 100 कुटुंबांसाठी घरे बांधणे आहे.

तिरुअनंतपुरम: 2024 यावर्षी वायनाड येथे झालेल्या भूस्खलनातील पीडितांना एलडीएफ सरकार घरांच्या पहिल्या टप्प्याचे वाटप करणार आहे, त्याच्या काही दिवस आधी, काँग्रेसने गुरुवारी त्यांच्या पुनर्वसन प्रकल्पाची पायाभरणी केली, ज्याचा उद्देश 100 कुटुंबांसाठी घरे बांधणे आहे. केरळ प्रदेश काँग्रेस समितीच्या ‘आदर्श गाव प्रकल्पा’च्या पहिल्या टप्प्यात एकूण तीन एकर जमिनीवर आठ सेंटच्या भूखंडावर प्रत्येकी 1 हजार 41 चौरस फुटाची 60 घरे बांधली जातील. वायनाडच्या कालपेट्टा येथे झालेल्या पायाभरणी समारंभाचे उद्घाटन विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी वायनाडच्या खासदार प्रियंका गांधी, एआयसीसीचे सरचिटणीस केसी वेणुगोपाल आणि काँग्रेस आणि त्यांच्या मित्रपक्षांच्या इतर नेत्यांच्या उपस्थितीत केले.

पक्षाने भूस्खलनात व्यवसाय गमावलेल्या 40 स्थानिक दुकान मालकांना 5 लाख रुपयांच्या धनादेशाचे वाटपदेखील केले.  अधिकृत आकडेवारीनुसार, 30 जुलै 2024 रोजी वायनाडमधील मुंडक्काई, चुरमला आणि अट्टामाला गावांमध्ये अनेक भूस्खलन झाल्याने 266 लोकांचा मृत्यू झाला आणि 32 जण बेपत्ता झाले. वायनाडचे तत्कालीन खासदार राहुल गांधी यांनी घटनेनंतर लगेचच मतदारसंघाच्या भेटीदरम्यान गृहनिर्माण प्रकल्पाची घोषणा केली होती.

राजकीय वाद

काही काळाच्या राजकीय वादानंतर हा समारंभ आयोजित करण्यात आला आहे, ज्यामध्ये सीपीआय(एम) प्रकल्पाच्या अंमलबजावणीत झालेल्या विलंबासाठी काँग्रेसला जबाबदार धरत आहे, तर प्रमुख विरोधी पक्षाने राज्य सरकारवर प्रक्रियात्मक विलंबाचा आरोप केला आहे. आजचा कार्यक्रम महत्त्वाचा आहे, कारण एलडीएफ सरकार 1 मार्च रोजी त्यांच्या पुनर्वसन प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्याचा भाग म्हणून 178 घरे हस्तांतरित करणार आहे. ‘मॉडेल टाउनशिप प्रकल्पा’त प्रत्येकी सात सेंट जमिनीवर बांधलेली एकूण 410 घरे समाविष्ट आहेत, जी पूर्वी कलपेट्टा येथील एल्स्टन इस्टेटचा भाग होती. दरम्यान, काँग्रेस पक्षाच्या योजनेचे लाभार्थी असे आहेत, जे राज्य सरकारच्या पुनर्वसन प्रकल्पात समाविष्ट नाहीत.

राज्य सरकारच्या म्हणण्यानुसार, त्यांच्या योजनेच्या लाभार्थ्यांमध्ये कायदेशीर रहिवासी आहेत, ज्यांची घरे उद्ध्वस्त झाली आहेत किंवा राहण्यायोग्य नाहीत किंवा सीमांकित उच्च-जोखीम झोनमध्ये (प्रभावित भागात नदीच्या 50 मीटरच्या आत) असलेल्या मालमत्ता आहेत. पायाभरणी कार्यक्रमात बोलताना वायनाडच्या खासदार प्रियांका गांधी म्हणाल्या की, केरळमधील सर्व पक्षांच्या खासदारांनी केंद्राकडून अनेक वेळा मदत मागितली. राहुल गांधी यांनी घटनेनंतर लगेचच गृहनिर्माण प्रकल्पाची घोषणा केली. “तुमची बहीण म्हणून, मला हे ऐकून खूप दुःख होत आहे, की या प्रक्रियेला इतका वेळ लागला. आम्हाला आवश्यक असलेल्या मंजुरी, जमिनीच्या समस्या आणि तरतुदींमुळे आम्हाला वेळ लागला. पण शेवटी, मला हे सांगताना आनंद होत आहे, की आज आम्ही हे सुरू करू शकलो आहोत,” प्रियांका म्हणाल्या. प्रकल्पाचे उद्घाटन करताना, राहुल गांधी यांनी संकटकाळात वायनाडच्या लोकांच्या धैर्याचे आणि करुणेचे कौतुक केले.

“या पुनर्प्राप्तीच्या प्रक्रियेत, आम्ही तुमच्यासोबत आहोत. आमच्यासाठी, ही एक दिवसाची घटना नाही. तुम्ही आमचे कुटुंब आहात. आम्ही एकदा नाही, दोनदा नाही तर प्रत्येक वेळी तुमच्यासोबत उभे राहणार आहोत.” राहुल म्हणाले. त्यांनी सांगितले, की त्यांना आशा आहे, की प्रकल्प लवकरच पूर्ण होईल. प्रकल्प पूर्ण करण्यात मदत केल्याबद्दल त्यांनी यूडीएफ घटकपक्षांचे आभारही मानले.

वायनाड आणि काँग्रेस

उत्तर केरळमध्ये स्थित, वायनाड लोकसभा मतदारसंघ 2019 पासून गांधी कुटुंबाचा बालेकिल्ला आहे. तेव्हा राहुल गांधींनी चार लाखांहून अधिक मतांच्या ऐतिहासिक फरकाने विजय मिळवला होता. त्यांनी 2024 मध्ये तीन लाखांहून अधिक मतांच्या फरकाने जागा राखली. परंतु त्यांनी रायबरेलीची जागादेखील जिंकली. त्यांना फक्त एकच जागा राखता आली आणि त्यांनी रायबरेलीची निवड केली, ज्यामुळे वायनाडमध्ये पोटनिवडणूक आवश्यक झाली. प्रियांका गांधी यांनी पोटनिवडणूक 4 लाख 10 हजार 931 मतांनी जिंकली. या कुटुंबाने त्यांच्या भेटीदरम्यान लोकांना पाठिंबा आणि प्रेम देण्याचे वचन दिले आहे. वेणुगोपाल म्हणाले की, राहुल आणि प्रियांका दोघांनीही संसदेत हा मुद्दा जोरदारपणे उपस्थित केला आणि केंद्र सरकारच्या हस्तक्षेपाची मागणी केली. त्यांनी सांगितले की, काँग्रेसच्या नेतृत्वाखालील कर्नाटक सरकारने राज्याला सुपूर्द केलेल्या 20 कोटी रुपयांच्या पुनर्वसन प्रकल्पातही पक्षाने राज्य सरकारला पाठिंबा दिला.

“आम्ही डिझाइन पूर्ण केले आहे आणि बांधकाम कंपनीची नियुक्ती केली आहे. आम्ही बांधकाम सुरू ठेवू. हा राजकीय फायद्याचा दावा नाही, तर काँग्रेस आणि युडीएफने वायनाडसाठी दिलेल्या नैतिक पाठिंब्याचे प्रतीक आहे,” असे वेणुगोपाल म्हणाले. काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले की, पक्ष या प्रकल्पासाठी स्वतःचा निधी वापरत आहे, परंतु त्यांनी एकूण खर्च जाहीर केला नाही.

संबंधित लेख

चुकवू नका

Recent Comments