बेंगळुरू: कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी पाकिस्तानशी युद्ध टाळण्याच्या विधानावरून सुरू असलेल्या वादादरम्यान आता त्यांच्या आणखी एका मंत्र्यांनी वादाला तोंड फोडले आहे. “जो कोणी गोळीबार करणार आहे, तो जात (म्हणजे धर्म) विचारू शकेल. तुम्ही फक्त व्यावहारिकदृष्ट्या विचार करा. तो गोळीबार करेल आणि नंतर पळून जाईल,” असे विधान उत्पादन शुल्क मंत्री आर.बी. तिम्मापूर यांनी शनिवारी बागलकोट येथे पत्रकारांशी बोलताना केले. “कारगिल, पुलवामा आणि आता पहलगाममध्ये गुप्तचर यंत्रणेला अपयश आले. जेव्हा आम्ही त्यांना याबद्दल विचारतो, तेव्हा ते म्हणतात की दहशतवाद्यांनी हिंदू ओळखपत्र पाहिले आणि नंतर त्यांच्यावर गोळ्या झाडल्या. त्यांनी एका मुस्लिमाला मारले नाही का? जर तुम्हाला या सर्वांचे राजकारण करायचे असेल, तर परिस्थिती आपल्याला कुठे घेऊन जाईल?”
अनेक नेटिझन्सनी या विधानांवर नाराजी व्यक्त केली, कारण दहशतवाद्यांनी पीडितांचा धर्म ओळखल्यानंतर 26 हत्या केल्याचे अधिकृत वृत्त आता सर्वांनाच माहीत झाले आहे. कर्नाटकातील शिवमोग्गा येथील एका पीडितेच्या पत्नीनेही असेच म्हटले होते, की तिच्या पतीचीही अशाच प्रकारे गोळ्या घालून हत्या करण्यात आली. सिद्धरामय्या यांनी पाकिस्तानशी युद्ध करण्याची गरज नाही असे म्हटले होते. ते विधान वादाच्या भोवऱ्यात असतानाच तिम्मापूर यांच्या या विधानाने वातावरण तापले आहे. “युद्ध करण्याची गरज नाही. पण आपल्याला कठोर पावले उचलावी लागतील आणि सुरक्षा अधिक कडक करावी लागेल. आम्ही युद्धाच्या बाजूने नाही,” असे सिद्धरामय्या यांनी शनिवारी सांगितले होते.
सिद्धरामय्या यांच्या विधानावर चर्चा करणाऱ्या पाकिस्तानी टीव्ही चॅनेलच्या बातम्यांनी सोशल मीडियावर धुमाकूळ घातला होता. अनेक भाजप नेत्यांनी या बातमीची क्लिपिंग पोस्ट केली होती, काहींनी असे म्हटले होते, की कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी जर कधी शत्रू शेजाऱ्याला भेट दिली तर त्यांना उत्तम आदरातिथ्य मिळेल. काँग्रेस पक्षाचा असा दावा आहे, की 22 एप्रिलचा हल्ला थांबवण्यात किंवा पहलगाममधील पर्यटकांना कोणतीही सुरक्षा प्रदान करण्यात अपयशी ठरलेल्या भारताच्या गुप्तचर यंत्रणेत काही त्रुटी होत्या. रविवारी, विरोधी पक्षनेते आर. अशोक यांनी सिद्धरामय्या यांच्यावर टीका करताना म्हटले की, “त्यांना शेजारी देशाचे शांतीदूत म्हणून पाकिस्तानचा सर्वोच्च नागरी सन्मान निशाण-ए-पाकिस्तान देण्यात येईल”. “देश अत्यंत संवेदनशील परिस्थितीचा सामना करत असताना, सीमेवर युद्धाचा धोका असताना, तुम्ही शत्रू राष्ट्राच्या हातातल्या बाहुल्यासारखे वागता. सार्वजनिक जीवनात तुमच्यासारख्या लोकांची उपस्थिती ही आपल्या देशाची सर्वात मोठी शोकांतिका आहे,” असे त्यांनी कन्नड भाषेत ‘एक्स’ वर लिहिले.
सिद्धरामय्या यांनी त्यांच्या विधानाचे स्पष्टीकरण देण्याचा प्रयत्न केला. “मी जे म्हटले होते ते म्हणजे जर युद्ध अपरिहार्य असेल तरच आपण युद्ध करावे,” असे कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी रविवारी म्हैसूर येथे पत्रकारांना सांगितले. ते म्हणाले, की “हा उपाय नाही आणि मी कधीही असे म्हटले नाही, की युद्ध कधीच करू नये”.
मुख्यमंत्र्यांनी नंतर ‘एक्स’ वर एक लांब संदेश पोस्ट केला, ज्यामध्ये त्यांनी त्यांच्या टिप्पण्या अधिक स्पष्ट केल्या. “युद्ध हा नेहमीच राष्ट्राचा शेवटचा उपाय असला पाहिजे – कधीही पहिला किंवा एकमेव पर्याय नाही. जेव्हा शत्रूला पराभूत करण्याचे इतर सर्व मार्ग अपयशी ठरतात तेव्हाच एखाद्या देशाला युद्ध करण्यास भाग पाडले पाहिजे…,” असे त्यांनी ठामपणे सांगितले. त्यांनी पुढे म्हटले की, काही विघ्नसंतोषी समाजघटक या शोकांतिकेचा वापर देशामध्ये फूट पाडण्यासाठी आणि आपल्यातील शांतता आणि एकता बिघडवण्यासाठी करत आहेत.
Recent Comments