नवी दिल्ली: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी संसद सदस्यांना (खासदारांना) ‘लोकांना भेडसावणाऱ्या खऱ्या समस्या’ आपल्यापुढे मांडण्याचे आवाहन केले. त्यांनी असेही म्हटले आहे की, कोणत्याही कायद्यामुळे किंवा नियमामुळे लोकांना छळ किंवा ‘गैरसोय’ सहन करावी लागू नये, कारण सर्व उपाययोजना लोकांच्या सोयीसाठीच आहेत. पंतप्रधान एनडीए संसदीय पक्षाच्या बैठकीत बोलत होते, जिथे त्यांनी देश आता ‘सुधारणा एक्सप्रेस टप्प्यात’ असल्याचे निदर्शनास आणून दिले. ते म्हणाले की, सुधारणा वेगाने आणि स्पष्ट हेतूने होत आहेत. सूत्रांनी सांगितले, की त्यांनी जीवन सुलभता आणि व्यवसाय सुलभता या दोन्ही सरकारच्या सर्वोच्च प्राधान्यांवर भर दिला. बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना केंद्रीय संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजिजू म्हणाले की, पंतप्रधानांनी कायदेकर्त्यांना त्यांच्या राज्यांसाठी आणि प्रदेशांसाठी कसे काम करावे याबद्दल स्पष्ट मार्गदर्शक तत्त्वे दिली आहेत.
“सर्वसामान्य लोकांचे जीवन सोपे करण्यासाठी ते प्रत्येक क्षेत्रात सुधारणा राबवण्याबद्दल बोलले. पंतप्रधान म्हणाले, की कायदे कोणासाठीही ओझे नसावेत तर लोकांच्या सोयीसाठी असले पाहिजेत. नियम आणि कायदे व्यवस्था सुधारण्यासाठी असले पाहिजेत, लोकांना त्रास देण्यासाठी नसावेत,” रिजिजू म्हणाले. या बैठकीला दिल्लीतील सर्व एनडीए खासदार उपस्थित होते. मोदी म्हणाले, की “केंद्राच्या सुधारणा पूर्णपणे नागरिक-केंद्रित आहेत आणि सुधारणा समाजाच्या सर्व पैलूंमध्ये आणल्या पाहिजेत, केवळ अर्थव्यवस्थेपुरत्या किंवा महसूल-केंद्रित त्या नसाव्या.” “पंतप्रधानांनी यावर भर दिला, की खासदारांनी लोकांच्या ‘खऱ्या’ समस्या त्यांच्यापुढे मांडाव्यात, जेणेकरून त्या सहजतेने सोडवता येतील. आमच्या सरकारची ‘सुधारणा एक्सप्रेस’ प्रत्येक घरात पोहोचली पाहिजे आणि दैनंदिन अडचणी दूर करण्याचे उद्दिष्ट ठेवले पाहिजे. लोकांना भेडसावणाऱ्या दैनंदिन अडचणी दूर करून, आपण त्यांना पूर्ण क्षमतेने विकास करण्यास मदत करू शकतो,” असे एका खासदाराने सांगितले.
या उद्दिष्टात अनेक ठिकाणी जाणारे लांबलचक फॉर्म काढून टाकण्याची तसेच अनावश्यक कागदपत्रे काढून टाकण्याची गरजदेखील अधोरेखित करण्यात आली. “पंतप्रधान म्हणाले, की आपल्याला 30-40 पानांचे फॉर्म आणि अनावश्यक कागदपत्रांची संस्कृती संपवण्याची गरज आहे. नागरिकांच्या दाराशी सेवा देणे आणि वारंवार डेटा सबमिशन करणे बंद करणे हा यामागील हेतू आहे. यामुळे लोकांचे जीवन बदलेल,” असे खासदार पुढे म्हणाले. एक उदाहरण देत पंतप्रधान म्हणाले, की सरकारने स्व-प्रमाणीकरणाला परवानगी देऊन नागरिकांवर विश्वास ठेवला आणि हा विश्वास 10 वर्षे गैरवापर न करता यशस्वीरित्या काम करत आहे. बैठकीदरम्यान, एनडीए नेत्यांनी बिहार निवडणुकीत युतीच्या विजयाबद्दल पंतप्रधानांचे अभिनंदन केले.
रिजीजूंनी पत्रकारांना सांगितले, की “पंतप्रधानांनी सर्व एनडीए मित्रपक्षांना देशाला पुढे नेण्यासाठी अधिक वेगाने आणि एकतेने काम करण्यास सांगितले”.

Recent Comments