scorecardresearch
Saturday, 14 February, 2026
घरराजकारण“‘मोदी तेरी कब्र खुदेगी’ ही घोषणा नाही, तो विरोधकांचा दीर्घद्वेष”: पंतप्रधान

“‘मोदी तेरी कब्र खुदेगी’ ही घोषणा नाही, तो विरोधकांचा दीर्घद्वेष”: पंतप्रधान

विरोधकांवर, विशेषतः काँग्रेसवर, 'आपल्याला मृत पाहण्याची इच्छा असल्याचा' आरोप करत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी सांगितले की, ‘मोदी तेरी कब्र खुदेगी’ ही केवळ एक घोषणा नाही, तर ते त्यांच्या मनात माझ्याबद्दल असलेल्या दीर्घद्वेषाचे प्रतीक आहे'.

नवी दिल्ली: विरोधकांवर, विशेषतः काँग्रेसवर, ‘आपल्याला मृत पाहण्याची इच्छा असल्याचा’ आरोप करत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी सांगितले की, ‘मोदी तेरी कब्र खुदेगी’ ही केवळ एक घोषणा नाही, तर ते त्यांच्या मनात माझ्याबद्दल असलेल्या दीर्घद्वेषाचे प्रतीक आहे’. राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील आभार प्रस्तावाला उत्तर देताना, त्यांनी लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्यावरही, पूर्वी काँग्रेसमध्ये असलेल्या केंद्रीय राज्यमंत्री रवनीत सिंग बिट्टू यांना ‘गद्दार’ संबोधून शीख समुदायाचा ‘अपमान’ केल्याचा आरोप केला. काँग्रेस नेतृत्वावर निशाणा साधत ते म्हणाले, “त्या पट्टीच्या चोरांनी एका गुजराती व्यक्तीचे, महात्मा गांधींचे आडनावही चोरले.”

“मागील काँग्रेस सरकारे रिमोट-कंट्रोलने चालवली जात होती. माझे सरकारही रिमोट-कंट्रोलने चालते. भारतातील 140 कोटी जनता हा माझा रिमोट आहे.” असेही ते म्हणाले. मागील दिवशी विरोधी खासदारांनी केलेल्या गोंधळामुळे लोकसभेत न बोलण्याच्या आपल्या निर्णयाचा संदर्भ देत मोदींनी अशा वर्तनाला राष्ट्रपती मुर्मू यांचा ‘अपमान’ म्हटले. त्यांनी आपल्या सरकारने आणलेल्या बँकिंग क्षेत्रातील सुधारणांबद्दलही सविस्तरपणे सांगितले. “ज्या सरकारी बँका कमकुवत झाल्या होत्या आणि काम करू शकत नव्हत्या, त्यांचे मोठ्या बँकांमध्ये विलीनीकरण करण्यात आले. आणि मला आठवतंय, स्वतःला विद्वान मानणाऱ्या एका महाशयांनी लिहिले होते की, जर मोदी सरकारने बँकांच्या बाबतीत हे केले, तर ती भारतासाठी एक मोठी सुधारणा ठरेल. ते काम मी सत्तेवर येताच केले होते,” असे पंतप्रधान म्हणाले.

‘मोहब्बत की दुकान’

“ते [काँग्रेस] ‘मोदी तेरी कब्र खुदेगी’ हा मंत्र जपत आहेत. त्यांनी ‘मोहब्बत की दुकान’चे फलक लावले आहेत. सार्वजनिक जीवनात असा द्वेष बाळगला जातो का?” असे पंतप्रधान राज्यसभेत म्हणाले. काँग्रेसवर टीका करताना ते म्हणाले की, “पक्षाचे नेते पंतप्रधानांच्या खुर्चीला आपली वैयक्तिक मालमत्ता मानतात. मोदी या पदापर्यंत कसे पोहोचले, याची चिंता काँग्रेसला सतावत आहे,”

“आम्ही कलम 370 ची भिंत पाडली, म्हणूनच त्यांना [काँग्रेसला] माझी कबर खणायची आहे. आम्ही ईशान्य भारतात शांतता आणली आणि पाकिस्तानी दहशतवाद्यांना त्यांच्या हद्दीत घुसून प्रत्युत्तर दिले, म्हणूनच त्यांना माझी कबर खणायची आहे. आम्ही ‘ऑपरेशन सिंदूर’ राबवले, त्यामुळे त्यांना त्रास होतो, म्हणूनच त्यांना माझी कबर खणायची आहे. आम्ही माओवादी दहशतवादाचा सामना करण्यासाठी पावले उचलतो, म्हणूनच त्यांना माझी कबर खणायची आहे.” अशा परखड शब्दांत पंतप्रधानांनी काँग्रेसवर टीका केली. हा संदर्भ गेल्या वर्षीच्या एका घटनेशी संबंधित आहे, जेव्हा राजस्थानमधील काँग्रेस कार्यकर्त्या मंजू लता दिल्लीच्या रामलीला मैदानावर आयोजित ‘व्होट चोर, गद्दी छोड’ रॅलीकडे जात असताना ‘मोदी तेरी कब्र खुदेगी’ अशी घोषणा देताना कॅमेऱ्यात कैद झाल्या होत्या. त्या घोषणेचा संदर्भ देत मोदींनी काँग्रेसला प्रत्युत्तर दिले, “तुम्ही कितीही घोषणा द्या, पण तुम्ही माझी कबर कधीही खणू शकणार नाही.”

‘शीख समुदायाचा अपमान’

राज्यसभेतील भाषणादरम्यान पंतप्रधानांनी  आदल्या दिवशी राहुल गांधी आणि भाजप खासदार रवनीत सिंह बिट्टू यांच्यातील वादाचाही उल्लेख केला. “या सभागृहातील एका सन्माननीय खासदाराला [बिट्टू] काँग्रेसच्या धूर्त युवराजांनी [राहुल] ‘देशद्रोही’ ठरवले. जरा विचार करा, त्यांचा अहंकार किती टोकाला गेला आहे. त्यांनी [राहुल] त्याला [बिट्टू] देशद्रोही म्हटले कारण तो शीख आहे. हा शिखांचा अपमान होता, गुरूंचा अपमान होता,” असे मोदी म्हणाले.

‘टीएमसी घुसखोरांचे संरक्षण करत आहे’

मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचे नाव न घेता, मोदींनी पश्चिम बंगालमधील तृणमूल काँग्रेस सरकारवर घुसखोरांना आमंत्रित करून राज्यातील तरुणांच्या भविष्याशी तडजोड केल्याचा आरोप केला. “सर्वांत प्रगत राष्ट्रेही आपल्या देशातून घुसखोरांना बाहेर काढत आहेत. मात्र, येथे या घुसखोरांचे संरक्षण करण्यासाठी न्यायालयांवर अवाजवी दबाव आणला जात आहे.” असे मोदी म्हणाले. पश्चिम बंगालमधील सरकार प्रशासनातील प्रत्येक निकषावर अपयशाचे नवीन विक्रम रचत आहे आणि तरीही त्यांचे नेते दिल्लीत येऊन प्रवचने देत आहेत, असेही ते म्हणाले. “तुम्ही घुसखोरांच्या बचावासाठी न्यायालयात हजर होतात, जे तुमच्याच लोकांचे हक्क आणि नोकऱ्या हिरावून घेत आहेत,” असे ते म्हणाले. त्यांनी आदल्या दिवशी निवडणूक आयोगाच्या विशेष सखोल पडताळणी (एसआयआर)  प्रक्रियेविरोधात सर्वोच्च न्यायालयात ममता बॅनर्जी यांनी स्वतः हजर राहून केलेल्या प्रतिनिधित्वावर टीका केली.

एनपीए, बँकिंग सुधारणा

पंतप्रधानांनी आपल्या सरकारच्या कामगिरीबद्दल, विशेषतः बँकिंग क्षेत्रातील सुधारणांच्या संदर्भात, सविस्तरपणे सांगितले. “2014 पूर्वी, फोन बँकिंगचे युग होते. नेते फोन कॉल करत असत आणि त्या कॉलच्या आधारावर कोट्यवधी रुपये वितरित केले जात असत, तर बँकांमध्ये गरिबांशी तुच्छतेने आणि तिरस्काराने वागले जात असे. देशातील 50 टक्क्यांहून अधिक लोकसंख्येने बँक आतून कधी पाहिलीही नव्हती. काँग्रेस नेत्यांच्या फोन कॉलवर लोकांना अब्जावधी रुपये दिले जात होते आणि ज्यांना हे पैसे मिळत होते, ते त्याला आपली वैयक्तिक मालमत्ता मानून स्वतःच्या खिशात टाकत होते. काँग्रेस आणि यूपीएच्या राजवटीत, तसेच आता ‘इंडिया’ आघाडीचा भाग असलेल्यांच्या सरकारांमध्येही असेच सुरू होते. बँकिंग व्यवस्था कोसळण्याच्या मार्गावर होती,” असे ते म्हणाले. मोदी म्हणाले की, त्यांच्या सरकारने ‘एनपीएचा (अनुत्पादक मालमत्ता) डोंगर’ कमी करून तो विक्रमी नीचांकी पातळीवर आणला. “एनपीएचे डोंगर साचले होते. हे एक मोठे आव्हान होते, परंतु आम्ही बँकिंग प्रणालीच्या सर्व भागधारकांना विश्वासात घेऊन आत्मविश्वासाने आवश्यक सुधारणा केल्या. आम्ही एक पारदर्शक प्रणाली तयार केली,” असे ते म्हणाले. सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रमांच्या (PSUs) मुद्द्यावर ते म्हणाले, “जे सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रम एकेकाळी काँग्रेसमुळे बंद होण्याच्या मार्गावर होते, तेच आता विक्रमी नफा कमावत आहेत. त्यांच्या कामगिरीमुळे ते ‘मेक इन इंडिया’ उपक्रमासाठी उत्प्रेरक म्हणून काम करत आहेत.”

“मुद्रा योजनेअंतर्गत 30 लाख कोटी रुपयांपेक्षा जास्त रक्कम तारण-मुक्त कर्ज म्हणून वितरित करण्यात आली आहे आणि त्यातील एक मोठा हिस्सा महिलांनी घेतला आहे. महिला बचत गटांचा विस्तार करण्यासोबतच, सरकारने 10 कोटी महिलांना आर्थिक मदत दिली आहे. आमच्या एमएसएमई क्षेत्रालाही कर्जाच्या माध्यमातून पाठिंबा देण्यात आला आहे.” असेही पंतप्रधानांनी सांगितले.

संबंधित लेख

चुकवू नका

Recent Comments