मुंबई: बृहन्मुंबई महानगरपालिका (बीएमसी) निवडणुकीत काँग्रेस एकट्याने लढणार अशी चर्चा अनेक आठवड्यांपासून सुरू होती. बिहारमध्ये पक्षाच्या पराभवानंतर पक्षाचे महाराष्ट्र प्रभारी रमेश चेन्निथला आणि मुंबई अध्यक्षा वर्षा गायकवाड यांनीही ही घोषणा केली. गेल्यावर्षी, महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत झालेल्या पराभवानंतर नाजूक स्थितीत असलेली महाविकास आघाडी (एमव्हीए) या घोषणेमुळे आणखी खिळखिळी झाल्याचे दिसून येत आहे. मित्रपक्ष शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) काँग्रेसच्या निर्णयाला नकार देत असताना, त्यांचा दुसरा सहकारी राष्ट्रवादी (शरद पवार पक्ष) यांनी हा निर्णय “बिहारमध्ये झालेल्या पराभवानंतरही अस्मितेपोटी घेतलेला” असल्याचे म्हटले आहे.
या निर्णयावर प्रतिक्रिया देताना उद्धव ठाकरे यांनी माध्यमांना सांगितले, की “प्रत्येकजण स्वतंत्र आहे आणि त्यांचे निर्णय घेऊ शकतो. त्यांचा पक्ष वेगळा आहे आणि माझा पक्ष वेगळा आहे. ते त्यांचे निर्णय घेऊ शकतात आणि मी माझे निर्णय घेईन,” असे ते रविवारी म्हणाले. 2019 मध्ये काँग्रेस, अविभाजित शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हे मुख्य भागीदार असताना महाविकास आघाडीची स्थापना झाली. 2022 मध्ये शिवसेनेत आणि 2023 मध्ये राष्ट्रवादीत फूट पडल्यानंतरही ही युती सुरूच राहिली. 2024 च्या लोकसभा निवडणुकीत आघाडीने चांगली कामगिरी केली होती, जिथे त्यांनी 48 पैकी 30 जागा जिंकल्या होत्या, परंतु त्याच वर्षीच्या विधानसभा निवडणुकीत त्यांनी अतिशय खराब कामगिरी केली. तेव्हापासून आघाडीत अस्वस्थता दिसून येते. राष्ट्रवादी (शप) चे नेते शरद पवार, जे महाविकास आघाडीचे शिल्पकार होते, त्यांचेही अनेक वेळा काँग्रेसशी मतभेद झाले आहेत. दुसरीकडे, 25 वर्षांहून अधिक काळ अविभाजितरीत्या बीएमसीवर नियंत्रण ठेवलेली शिवसेना (उबाठा) आता अस्तित्वासाठी संघर्ष करत असल्याचे दिसून येते. मुंबईत जन्मलेला पक्ष, फुटल्यापासून, टिकून राहण्यासाठी संघर्ष करत आहे आणि सध्या राज ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेसोबत युती करण्याचा विचार करत आहे. राजकीय विश्लेषक अभय देशपांडे म्हणाले की, देशभरात काँग्रेसचा मतदानाचा टक्का कमी होत चालला आहे आणि आता त्यांची प्राथमिकता स्वतःला बळकट करणे आहे.
“उद्धव यांना काँग्रेसला सोबत घेण्यास अजिबात रस नव्हता आणि ते बीएमसी निवडणुकीत राज यांच्याशी युती करण्याचा विचार करत होते. जर युती शक्य असती तर काँग्रेसला जास्तीत जास्त 50 जागा मिळाल्या असत्या. तर त्यांनी काय केले असते? भाजपला रोखण्यासाठी त्यांनी सर्वत्र प्रादेशिक युती स्थापन केल्या, परंतु आता त्यांना वाटते की त्यांच्या खर्चाने प्रादेशिक पक्ष मजबूत झाले आहेत, म्हणून ते त्यांचा पाया वाढवू इच्छितात,” असे त्यांनी स्पष्ट केले. बीएमसी अंतर्गत 24 प्रशासकीय वॉर्ड आणि 227 नगरसेवक वॉर्ड आहेत. यापूर्वी, शिवसेना (उबाठा) नेते संजय राऊत म्हणाले होते, की ‘इंडिया ब्लॉक’ लोकसभा निवडणुकीसाठी आहे, आणि महाविकास आघाडी विधानसभा निवडणुकीसाठी आहे. देशपांडे यांनी एमव्हीएला कोणताही धोका असल्याची शक्यता नाकारली. “कदाचित बीएमसी निवडणुकीनंतर ते (एमव्हीएचे मित्रपक्ष) एकत्र येऊ शकतात. यापूर्वीही, राज्यात सत्तेत असूनही स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत युती कशा स्वतंत्रपणे लढतात हे आपण पाहिले आहे,” असे ते म्हणाले.
महाविकास आघाडीतील मतभेद
विधानसभा निवडणुकीपासून राष्ट्रवादी (शप) आणि काँग्रेसमध्ये अनेक वेळा मतभेद झाले आहेत. प्रस्तावित 130 व्या घटना दुरुस्ती विधेयकावर, जे तुरुंगात असलेल्या केंद्रीय आणि राज्यमंत्र्यांशी संबंधित घटनेच्या कलमांमध्ये सुधारणा करण्याचा प्रयत्न करते आणि जे सध्या वादाच्या भोवऱ्यात आहे, राष्ट्रवादी (शप) संयुक्त संसदीय समिती (जेपीसी) मध्ये सामील झाली आहे, जेव्हा काँग्रेस, तृणमूल काँग्रेस, शिवसेना (उबाठा) आणि आम आदमी पक्षासह इतर विरोधी पक्षांनी पॅनेलवर बहिष्कार टाकण्याचे संकेत दिले होते. या वर्षाच्या सुरुवातीला, ‘ऑपरेशन सिंदूर’वर चर्चा करण्यासाठी विशेष संसदीय अधिवेशन बोलावण्याच्या मागणीवरून पवार यांनी विरोधी पक्षांशी मतभेद व्यक्त केले होते. पहलगाम हल्ल्यानंतरचा मुद्दा संवेदनशील असल्याचे पवार म्हणाले होते आणि विशेष अधिवेशनाची मागणी करण्याऐवजी, खाजगी चर्चा करून सर्वपक्षीय बैठक घेणे अधिक फलदायी ठरेल, असे त्यांनी म्हटले होते. गेल्या आठवड्यात, काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी पवारांवर निशाणा साधला आणि महाराष्ट्रात पक्ष कमकुवत करण्यात त्यांचा हात असल्याचे म्हटले. पुणे जमीन प्रकरणात पवारांनी घेतलेल्या मवाळ भूमिकेच्या पार्श्वभूमीवर पटोले यांचे आरोप आले. पार्थ हे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पाडणाऱ्या अजित पवार यांचे पुत्र आहेत.
“राज्यात काँग्रेसला कमकुवत करण्यासाठी भाजप आणि आमच्या मित्रपक्षांनी नेहमीच एक पद्धतशीर योजना आखली आहे हे आता उघड झाले आहे,” असे पटोले यांनी नागपूरमध्ये पत्रकारांना सांगितले. शरद पवारांचा उल्लेख करत आहात का असे विचारले असता ते म्हणाले: “हो, नक्कीच. सर्वांना हे माहीत आहे.”
काँग्रेसची कोंडी
काँग्रेस आणि शिवसेना (उबाठा) यांच्यात तणाव स्पष्ट आहे, विशेषतः मुंबईत जिथे ते वर्षानुवर्षे एकमेकांचे प्रतिस्पर्धी आहेत. काँग्रेसचा आरोप आहे, की शिवसेनेशी (उबाठा) युती केल्याने अपेक्षित मते त्यांच्याकडे गेली नाहीत. काँग्रेस नेत्यांचे म्हणणे आहे की, अल्पसंख्याकांमध्ये उद्धव यांची लोकप्रियता वाढत आहे आणि त्यामुळे मुस्लिम त्यांच्या पक्षाला मतदान करत आहेत, ज्यामुळे मतपेढी शिवसेनेकडे (उबाठा) वळत आहे. मनसेच्या बाबतीत, काँग्रेसला वाटते, की त्यांच्या स्थलांतरितविरोधी भूमिकेचा परिणाम त्यांच्या उत्तर भारतीय मतदारांवर होऊ शकतो. “शिवसेना (उबाठा) आधीच 100 हून अधिक जागा लढवेल, त्यानंतर राज ठाकरेंनाही मोठा वाटा मिळेल. राष्ट्रवादी (शप) चा मुंबईत लहान पाया असूनही काही ठिकाणी त्यांची उपस्थिती असली तरी त्यांना काही जागा मिळतील. मग आमच्यासाठी काय उरणार?” असा प्रश्न काँग्रेसच्या एका पदाधिकाऱ्याने विचारला.

Recent Comments