नवी दिल्ली: मंगळवारी लोकसभेत कामकाज सुरू असताना विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्यावर तीव्र शाब्दिक हल्ला चढवत केंद्रीय संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजिजू म्हणाले की, ‘काँग्रेस खासदार प्रियंका गांधी यांनी विरोधी पक्षनेत्या म्हणून चांगली कामगिरी केली असती, कारण त्या कमीतकमी संसदेत येऊन चाललेले कामकाज ऐकून तरी घेतात.” सभापती ओम बिर्ला यांच्याविरुद्धच्या अविश्वास प्रस्तावावरील चर्चेला उत्तर देताना रिजिजू यांनी हे भाष्य केले. या वक्तव्यामुळे विरोधी पक्ष सदस्यांनी प्रतिक्रिया व्यक्त केल्या.
गांधींचे नाव न घेता, रिजीजू यांनी काँग्रेसचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी संसदेतील वातावरणाचे गांभीर्य लक्षात न घेता ‘मिठी मारणे’, ‘डोळा मारणे’ असे अप्रगल्भ वर्तन केल्याचा उल्लेख केला. “मी असा नेता कधीही पाहिला नाही, जो पंतप्रधानांना येऊन मिठी मारतो, नंतर त्यांच्या जागेवर परत जातो आणि इतर पक्षाच्या खासदारांना डोळा मारतो (आँख मारता है),” रिजिजू म्हणाले. रिजिजू यांनी उल्लेख केलेला मिठी मारण्याचा प्रसंग 2018 चा होता. त्या घटनेवर भाजप तसेच पंतप्रधान मोदी यांनीही टीका केली होती. “तुमच्या बाजूनेही बरेच चांगले लोक आहेत. पण तुम्ही त्यांना विरोधी पक्षनेते बनवले असल्याने, आम्ही याबद्दल काहीही करू शकत नाही. ते माझ्या हातात नाही. पहा, प्रियंका गांधीजी मागे बसून हसत आहेत. जर त्यांना विरोधी पक्षनेते बनवले असते तर कदाचित कामगिरी चांगली झाली असती. किमान त्या बसून ऐकतात; तुमचे विरोधी पक्षनेते ऐकतही नाहीत.” असे ते पुढे म्हणाले.
रिजिजू यांनी स्पष्ट केले, की त्यांनी सार्वजनिकरित्या म्हटले आहे की, “जर कोणताही संसद सदस्य चांगले वागला तर मी त्यांची प्रशंसा केली पाहिजे. मी भाजप नेता आणि मंत्री आहे, परंतु संसदीय कार्यमंत्री म्हणून त्यांचे कौतुक करणे माझे कर्तव्य आहे. आता एखाद्याची प्रशंसा करणे हाही गुन्हा आहे का? काँग्रेस सदस्यांचे काय झाले आहे? तुम्ही काही चांगले बोललात तर ते नाराज होतात आणि तुम्ही काही कठोर बोललात तरीही ते नाराज होतात,” असे ते पुढे म्हणाले. रिजिजू यांनी भाषण संपवल्यानंतर प्रियांका गांधी वद्रा यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली, आणि त्या म्हणाल्या: एकच व्यक्ती आहे, जिने त्यांच्यासमोर झुकण्यास नकार दिला आहे आणि ते हे सत्य पचवू शकत नाहीत’. चर्चेदरम्यान बोलताना, रिजिजू यांनी गांधींच्या भूतकाळातील टिप्पणीवरही टीका केली, की त्यांना सभागृहात बोलण्यासाठी कोणाच्या परवानगीची आवश्यकता नाही. “पंतप्रधान किंवा विरोधी पक्षनेते किंवा इतर कोणतेही खासदार असू शकतात, परंतु सभापतींच्या परवानगीशिवाय कोणीही सभागृहात बोलू शकत नाही,” रिजिजू म्हणाले.
त्यांनी असा दावा केला, की विरोधी पक्षातील किमान 50 खासदारांनी त्यांना वैयक्तिकरित्या भेटून सांगितले, की ते लोकसभा अध्यक्षांविरुद्धच्या अविश्वास प्रस्तावाशी सहमत नाहीत, परंतु त्यात सहभागी होण्याशिवाय पर्याय नव्हता. ‘बिर्ला हे निष्पक्ष आहेत’ या मुद्द्यावर भर देऊन रिजिजू म्हणाले की, सर्व खासदारांना, मग ते नवीन असो वा जुने, सभागृहात नेहमीच संधी मिळते. “मी अभिमानाने सांगू शकतो की मी त्याच लोकसभेचा सदस्य आहे जिथे ओम बिर्ला अध्यक्ष आहेत.” सभागृहात नियमित व्यत्यय आणल्याबद्दल काँग्रेसवर टीका करताना रिजीजू यांनी सांगितले, की भाजपने कधीही सभापतींच्या खुर्चीवर कागदपत्रे फेकली नाहीत, कधीही सभागृहाबाहेर पडले नाहीत आणि सभागृहाची प्रतिष्ठा कधीही कमी होऊ दिली नाही. त्यांनी पुढे विरोधी पक्षांवर आरोप केला की ते आता सभापतींची भूमिका आणि अध्यक्षपद ठरवण्याचा प्रयत्न करत आहेत. “ते सभापतींच्या भूमिकेवरही नियंत्रण ठेवू इच्छितात. त्यांना खुर्चीवर कोण बसते हे ठरवायचे आहे. दुर्दैवाने, ते सभापतींचे अधिकार ताब्यात घेण्याचा प्रयत्न करत आहेत,” असे ते पुढे म्हणाले.
“सभापती निःपक्षपाती आहेत. ते सत्ताधारी पक्षाचे आहेत, आम्हालाही ते माहिती आहे. पण जर सभापती खुर्चीवर बसले असतील तर त्यांची भूमिका निष्पक्ष असते.”

Recent Comments