मुंबई: पुणे आणि पिंपरी-चिंचवड महानगरपालिका निवडणुकांसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या दोन्ही गटांमधील युतीमुळे पक्ष कार्यकर्त्यांमध्ये संमिश्र प्रतिक्रिया उमटल्या आहेत. काही कार्यकर्त्यांनी या पुनर्मिलनाचे स्वागत केले आहे, तर काही जणांनी या निर्णयाला ‘वैचारिकदृष्ट्या विसंगत’ असे म्हटले आहे. विशेषतः राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) गटामध्ये असंतोष स्पष्टपणे दिसून येत आहे, जिथे कार्यकर्ते भाजपच्या विरोधाच्या भूमिकेशी जुळवून घेण्याचा प्रयत्न करत आहेत, कारण ही युती त्यांना अजित पवार गटासोबत एकत्र आणत आहे.
“जे घडले आहे, त्यामुळे मी खरोखरच आनंदी नाही. हे माझ्या तत्त्वांच्या आणि विचारसरणीच्या विरोधात आहे. एका बाजूला आपण भाजपला विरोध करण्याबद्दल बोलतो आणि दुसऱ्या बाजूला, राज्यात भाजपसोबत सत्तेत असलेल्या व्यक्तीशी हातमिळवणी करतो. हे सर्व कुटुंबासाठी आहे,” असे शरद पवार गटाच्या एका पदाधिकाऱ्याने सोमवारी ‘द प्रिंट’ला सांगितले. या अस्वस्थतेमुळे पक्षाला आधीच एका प्रमुख नेत्याला गमवावे लागले आहे. गेल्या आठवड्यात, पुण्यात पक्षाचा प्रमुख चेहरा आणि माजी महापौर प्रशांत जगताप यांनी अजित पवार यांच्या राष्ट्रवादीसोबत युती करण्याच्या निर्णयावर वैचारिक मतभेद असल्याचे सांगत पक्षाचा राजीनामा दिला. जगताप यांनी त्यानंतर काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे.
तथापि, अजित पवार गटाच्या कार्यकर्त्यांनी या निर्णयाचे समर्थन केले असून, ही युती व्यावहारिक राजकीय विचारांचे प्रतिबिंब असल्याचे म्हटले आहे. पिंपरी-चिंचवडमधील एका पदाधिकाऱ्याने ‘द प्रिंट’ला सांगितले, “सध्या आमच्या कार्यकर्त्यांना वाटले की आपण दुसऱ्या राष्ट्रवादीसोबत जायला हवे, कारण आम्ही भूतकाळात एकत्र काम केले आहे आणि नेहमीच भाजपच्या विरोधात लढलो आहोत. त्यामुळे युती करणे फारसे अवघड नव्हते. याशिवाय, आमच्याकडे अनेक इच्छुक उमेदवार आहेत आणि जर आम्ही महायुतीसोबत गेलो असतो, तर सर्वांना सामावून घेणे शक्य झाले नसते. पुढे काय होईल हे आम्हाला माहीत नाही, पण सध्या ही युती पुणे महानगरपालिका आणि पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेसाठी काम करेल.”
तळागाळातील कार्यकर्त्यांची सहमती की कौटुंबिक समझोता?
या युतीची घोषणा रविवारी करण्यात आली, जेव्हा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पिंपरी-चिंचवडमधील एका प्रचार कार्यक्रमात दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस गट एकत्र निवडणूक लढवतील असे जाहीर केले. “या महानगरपालिका निवडणुकांसाठी ‘घड्याळ’ आणि ‘तुतारी’ एकत्र आले आहेत. अनेकांची इच्छा होती, त्यानुसार पवार कुटुंब एकत्र आले आहे,” असे ते दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांच्या निवडणूक चिन्हांचा संदर्भ देत म्हणाले. त्यांचे पुतणे आणि राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) गटाचे आमदार रोहित पवार यांनी पुणे महानगरपालिकेसाठीही युती झाल्याची पुष्टी करताना, हा निर्णय कार्यकर्त्यांनी घेतल्याचे अधोरेखित केले.
“हा निर्णय तळागाळातील कार्यकर्त्यांशी सल्लामसलत करून घेण्यात आला आहे, ज्यांना वाटते,की आपण एकत्र यायला हवे. ही युती स्थानिक कार्यकर्त्यांच्या भावनांचे प्रतिबिंब आहे. सुप्रिया ताईही सर्वांशी बोलल्या आहेत, आहे आणि त्यांचे म्हणणे आहे की आपण ‘घड्याळा’सोबत गेल्यास चांगले होईल आणि ही कार्यकर्त्यांची निवडणूक असल्याने, आम्ही त्या दिशेने पुढे जाण्याचा निर्णय घेतला आहे,” असे रोहित पवार यांनी ज्येष्ठ नेत्या सुप्रिया सुळे यांचा संदर्भ देत सांगितले, ज्या बारामतीतून लोकसभा खासदार आणि शरद पवार यांच्या कन्या आहेत. परंतु, रोहित यांनी स्पष्ट केले, की ही युती केवळ पुणे आणि पिंपरी-चिंचवडच्या निवडणुकांपुरती मर्यादित आहे आणि दोन गटांच्या विलीनीकरणाचा कोणताही संकेत देत नाही. तरीही, टीका सुरूच आहे. रविवारी बारामती येथील कार्यक्रमात, शरद पवार, अजित पवार आणि सुप्रिया सुळे यांनी उद्योगपती गौतम अदानी यांच्यासोबत शरदचंद्र पवार सेंटर ऑफ एक्सलन्स इन आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या उद्घाटनासाठी मंच शेअर केला. आपल्या भाषणात सुळे म्हणाल्या की, त्या अदानींना आपला मोठा भाऊ मानतात.
“काही दिवसांपूर्वी आम्ही ‘इंडिया’ आघाडी म्हणून लढत आहोत आणि अदानींना विरोध करणाऱ्या काँग्रेससोबत आहोत, आणि दुसरीकडे आम्ही म्हणतो, की ते आमचे मोठे भाऊ आहेत. हे सर्व कुटुंबासाठी केले जात आहे आणि भविष्यात विलीनीकरण होण्याची शक्यता आहे असे वाटते,” असे एका पदाधिकाऱ्याने म्हटले. त्यांनी 2024 च्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपला टक्कर देण्यासाठी स्थापन झालेल्या विरोधी पक्षांच्या आघाडीचा संदर्भ देत दिला. ही युती दोन्ही बाजूंच्या मित्रपक्षांना रुचली नाही. काँग्रेस आणि उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेने सोमवारी पुण्यात स्वतःची आघाडी जाहीर केली असताना, भाजप आणि एकनाथ शिंदे यांची शिवसेना अद्याप जागावाटपाच्या व्यवस्थेवर वाटाघाटी करत आहेत.
‘धोरणात्मक अपरिहार्यता’
पिंपरी-चिंचवड आणि पुणे यांसह महाराष्ट्रातील 29 महानगरपालिकांच्या निवडणुका 15 जानेवारी रोजी होणार असून, मतमोजणी दुसऱ्या दिवशी होणार आहे. या पार्श्वभूमीवर ही युती झाली आहे. उमेदवारी अर्ज दाखल करण्याची अंतिम तारीख मंगळवार आहे. महाराष्ट्रातील दुसरे राजकीय घराणे असलेल्या ठाकरे कुटुंबाच्या अलीकडील एकीकरणानंतर, पवार यांची ही युती महानगरपालिका निवडणुकांपूर्वीची आणखी एक अनपेक्षित भागीदारी दर्शवते, ज्याला या दोन शहरांमधील भाजपच्या वर्चस्वाला आव्हान देण्यासाठी एक सामरिक पाऊल मानले जात आहे. एनसीपीचे पुणे आणि पिंपरी चिंचवड महापालिकांवर पारंपरिकरित्या मजबूत नियंत्रण राहिले आहे, या दोन्ही महापालिका पश्चिम महाराष्ट्रातील पक्षाचे बालेकिल्ले मानल्या जातात. परंतु 2017 मध्ये भाजपने दोन्ही महापालिका जिंकल्याने ही पकड सैल झाली. शहरांमध्ये वेगाने विकास होत असताना—मेट्रो मार्ग आणि उद्योगांचा विस्तार होत असताना—भाजप आपली पकड कायम ठेवण्यास उत्सुक आहे.
राजकीय विश्लेषक हेमंत देसाई म्हणाले की, ही युती अटळ होती. “पुणे आणि पिंपरी-चिंचवड महापालिकेत भाजपची ताकद वाढली आहे, आणि ज्या पवारांनी या महापालिकांवर पूर्वी सत्ता गाजवली होती, त्यांची ताकद कमी होत आहे. त्यामुळे, हे प्रदेश विकसित होत असताना त्यांनी एकत्र येणे आवश्यक आहे,” असे ते म्हणाले. देसाई पुढे म्हणाले की, शरद पवार कदाचित त्यांच्या कुटुंबाच्या दीर्घकालीन राजकीय अस्तित्वाचा विचार करत असावेत. “मला वाटते, की ज्येष्ठ पवारांना असे वाटत असेल, की राज्यात अजित पवार यांची लोकप्रियता सुप्रिया सुळे यांच्यापेक्षा जास्त आहे. आणि त्यामुळे, शरद पवार यांची प्रकृती ठीक नसल्यामुळे, भविष्यात राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाला अजित पवार यांच्या सहकार्याची गरज भासेल. जयंत पाटील यांना बाजूला सारल्यामुळे आणि त्यांचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांना जनमानसात फारशी लोकप्रियता नसल्यामुळे पक्षाच्या मर्यादा आहेत,” असे ते म्हणाले.
पुण्याचे पालकमंत्री असलेले अजित पवार यांनी या दोन्ही शहरांमध्ये पुन्हा सत्ता मिळवण्याच्या आपल्या महत्त्वाकांक्षेबद्दल उघडपणे सांगितले आहे. रविवारच्या कार्यक्रमात त्यांनी पक्ष कार्यकर्त्यांना विकासाच्या मुद्द्यावर लक्ष केंद्रित करण्याचे आवाहन केले. “आम्ही शेतकरी कुटुंबातून आलो आहोत. महाराष्ट्राच्या व्यापक हितासाठी काही निर्णय घ्यावे लागतात. आम्हीच प्रगतीसाठी काम करत आहोत. ज्यांनी महापालिकेवर कर्जाचा बोजा टाकण्याचा प्रयत्न केला, त्यांना आम्ही बाहेरचा रस्ता दाखवू,” असे ते म्हणाले. गेल्या वर्षीच्या विधानसभा निवडणुकीपासून, पवार कुटुंब अनेक प्रसंगी एकत्र दिसले आहे—जय पवार (अजित यांचा मुलगा) यांच्या साखरपुड्यापासून ते युगेंद्र पवार (अजित आणि सुप्रिया यांचा पुतण्या) यांच्या लग्नापर्यंत आणि शरद पवार यांच्या वाढदिवसाच्या सोहळ्यापर्यंत. या कुटुंबाने सोशल मीडियावर कौटुंबिक फोटोही पोस्ट केले आहेत. अजित यांचा मुलगा पार्थ पवार यांच्याशी संबंधित अलीकडील वादाच्या वेळीही कौटुंबिक एकजूट दिसून आली, ज्यांच्यावर 1 हजार 800 कोटी रुपयांच्या मुंडवा येथील जमिनीच्या खरेदीत भ्रष्टाचाराचे आरोप झाले होते. अजित पवार यांनी सार्वजनिकरित्या आपल्या मुलाला पाठिंबा दिला नसला तरी, सुप्रिया सुळे त्यांच्या समर्थनासाठी पुढे आल्या.
2023 मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात फूट पडली, त्यानंतर दोन्ही गटांनी 2024 च्या लोकसभा निवडणुकीत एकमेकांविरुद्ध निवडणूक लढवली. शरद पवार गटाने लढवलेल्या 10 पैकी 8 जागांवर विजय मिळवला असला तरी, विशेष म्हणजे, प्रचारादरम्यान या कुटुंबातील सदस्यांनी एकमेकांवर वैयक्तिक टीका करणे टाळले.

Recent Comments