scorecardresearch
Thursday, 19 February, 2026
घरराजकारणसुप्रिया सुळे, रोहित पवार यांनी दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलीनीकरणाची शक्यता फेटाळली

सुप्रिया सुळे, रोहित पवार यांनी दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलीनीकरणाची शक्यता फेटाळली

महाराष्ट्राचे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघाती निधनानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या (एनसीपी) दोन्ही गटांमधील विलीनीकरणाच्या संभाव्य अनिश्चिततेदरम्यान, दोन्ही गटातील नेत्यांनी एकत्र येण्याच्या शक्यता फेटाळून लावल्या आहेत.

मुंबई: महाराष्ट्राचे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघाती निधनानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या (एनसीपी) दोन्ही गटांमधील विलीनीकरणाच्या संभाव्य अनिश्चिततेदरम्यान, दोन्ही गटातील नेत्यांनी एकत्र येण्याच्या शक्यता फेटाळून लावल्या आहेत. माध्यमांशी बोलताना राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) गटाच्या खासदार सुप्रिया सुळे म्हणाल्या, की शरद पवार यांच्या नेतृत्वाखालील गट आणि अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील गट यांच्यातील विलीनीकरणाच्या मुद्द्यावर 28 जानेवारी रोजी अजित पवार यांच्याशी यापूर्वी चर्चा झाली होती. “अजित दादांनी घेतलेले निर्णय आता त्यांच्यासोबत गेले आहेत. आता माझा भाऊ नाही, तर त्याबद्दल (विलीनीकरण) बोलण्याचा काय उपयोग?” त्या म्हणाल्या.

त्यांचे पुतणे आणि राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) गटाचे आमदार रोहित पवार यांनी सुळे यांच्या भूमिकेचा पुनरुच्चार केला. ” तो विषय आता संपला आहे. आम्ही अजित दादांसोबत बैठका घेतल्या. एनडीएसोबत जायचे, की अजित दादा युतीतून बाहेर पडून लढणार, हीच आमची त्यांच्याशी झालेली चर्चा होती. पण आता अजितदादा गेले आहेत, त्यामुळे यावर चर्चा करणे अप्रासंगिक आहे. आमच्यासाठी, त्यांच्या निधनाबरोबरच विलीनीकरणाचा मुद्दा संपला,” असे ते म्हणाले. ‘राष्ट्रवादीच्या दुसऱ्या गटातील नेते फक्त पवारसाहेब, सुप्रिया सुळे आणि मला विरोध करण्यासाठी आणि राजकीयदृष्ट्या संबंधित राहण्यासाठी आणि शक्तिशाली दिसण्यासाठी विलीनीकरणाचा मुद्दा उपस्थित करत आहेत’, असेही त्यांनी सांगितले. त्यांनी असेही म्हटले की, राष्ट्रवादी काँग्रेसचे (शप) ज्येष्ठ नेते जयंत पाटील यांच्या निवासस्थानी या मुद्द्यावर बैठका होत असत.

सोमवारी रात्री, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी बोलावलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांच्या बैठकीनंतर, पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी माध्यमांना सांगितले, की ‘विलीनीकरण आत्ता अजेंड्यावर नाही आणि आमदारांना त्याबद्दल बोलू नये, असे निर्देश देण्यात आले आहेत’. अजित पवार यांच्या निधनानंतर लगेचच, राष्ट्रवादी काँग्रेसच्या (शप) अनेक नेत्यांनी सांगितले, की ते दोन्ही पक्षांच्या गटांच्या संभाव्य पुनर्मिलनावर चर्चा करत आहेत. महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यासह काहींनी दावा केला, की विलीनीकरण ही त्यांची शेवटची इच्छा होती, आणि तिचा आदर केला पाहिजे. माजी केंद्रीय नागरी विमान वाहतूक मंत्री प्रफुल्ल पटेल यांनी अजितदादांनी मृत्यूपूर्वी अशा कोणत्याही चर्चा केल्याचे नाकारले. गेल्या काही महिन्यांपासून राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन्ही गट विलीन होतील अशी व्यापक चर्चा होती. 2024 च्या विधानसभा निवडणुकीत शरद पवारांच्या गटाला 288 सदस्यांच्या सभागृहात फक्त 10 जागा मिळाल्या होत्या. डिसेंबर 2025 मध्ये, शरद पवार आणि अजित पवार या दोन्ही गटांनी पुणे आणि पिंपरी-चिंचवडमधील महानगरपालिका निवडणुका एकत्र लढवल्या, परंतु दोन्ही महानगरपालिकांवर ते ताबा मिळवू शकले नाहीत.

दोन्ही पक्षांनी फेब्रुवारीमध्ये होणाऱ्या जिल्हा परिषद निवडणुका एकाच व्यासपीठावर, एकाच चिन्हाचा म्हणजे घड्याळाचा वापर करून लढवण्याची योजना आखली आणि त्या निवडणुकांनंतर औपचारिक विलीनीकरणाची चर्चा सुरू झाली. तथापि, 28 जानेवारी रोजी अजित पवार यांच्या निधनाने त्या चर्चा थांबल्या. शरद पवार यांनी पत्रकारांना सांगितले, की ‘विलीनीकरण प्रगतीपथावर आहे आणि 12 फेब्रुवारी रोजी त्याची घोषणा होणार होती, परंतु दोन्ही गटांनी आता चर्चा स्थगित केल्या आहेत.

संबंधित लेख

चुकवू नका

Recent Comments