नवी दिल्ली: काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी रविवारी सांगितले की, “पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची सत्ता गेल्यावर त्यांचा तोरा नाहीसा होईल आणि अखेरीस सत्यासमोर त्यांचा पराभव होईल. यासाठी वेळ लागला, तरीही हे घडेल.” असे ते म्हणाले. लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी दिल्लीच्या रामलीला मैदानावर काँग्रेसच्या ‘मतचोरी’ विरोधातील महासभेला संबोधित करताना ही टिप्पणी केली. ही सभा निवडणूक आयोग आणि भाजप सरकार यांच्यातील कथित संगनमताद्वारे ‘निवडणुका चोरण्या’च्या विरोधात पक्षाच्या देशव्यापी मोहिमेचा एक भाग होती.
“सहा वर्षांच्या मुलापासून ते 90 वर्षांच्या वृद्धापर्यंत, प्रत्येकाला माहीत आहे, की मोदी आणि शहा मतांची चोरी करून निवडणुका जिंकतात. याला वेळ लागू शकतो, पण भारतात सत्याचाच विजय होईल. मोदी आणि शहा कितीही भाषणे करोत, आम्ही त्यांना हिंसा आणि द्वेषाने नाही, तर सत्य आणि अहिंसेने हरवू,” असे राहुल म्हणाले. या सभेला मोठ्या संख्येने लोक उपस्थित होते. पक्षाच्या दिल्ली, उत्तर प्रदेश, राजस्थान आणि हरियाणा युनिट्सने हजारो कार्यकर्त्यांना एकत्र आणले होते, ज्यामुळे मध्य दिल्लीचा काही भाग अनेक तास ठप्प झाला होता. काँग्रेसचे संपूर्ण शीर्ष नेतृत्व आणि त्यांचे वरिष्ठ राज्य नेते उपस्थित होते. आपल्या भाषणांमध्ये, राहुल आणि प्रियांका गांधी वद्रा यांच्यासह अनेक वरिष्ठ काँग्रेस नेत्यांनी पक्षाचे कार्यकर्ते आणि समर्थकांचे खच्ची झालेले मनोधैर्य वाढवण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न केला. “हरियाणा, महाराष्ट्र आणि बिहारमधील निवडणुकीतील पराभवामुळे निराश होऊ नका, कारण ‘मोदी आणि शहा निवडणुका कशा चोरतात हे सर्वांना माहीत आहे”, असे ते म्हणाले. राहुल आणि प्रियांका दोघांनीही मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार आणि निवडणूक आयुक्त सुखबीर सिंग संधू आणि विवेक जोशी यांचा स्पष्टपणे उल्लेख केला आणि समर्थकांना त्यांची नावे लक्षात ठेवण्यास सांगितले.
“ही नावे लक्षात ठेवा, कधीही विसरू नका. त्यांना वाचवण्यासाठी कितीही व्यवस्था केली तरी हा देश ही नावे कधीही विसरणार नाही. एके दिवशी त्यांना लोकांना उत्तर द्यावे लागेल की त्यांनी तुमच्या मतदानाच्या हक्कापासून तुम्हाला वंचित ठेवण्याचा कट कसा रचला,” असे प्रियांका म्हणाल्या. आपल्या बहिणीच्या सुरात सूर मिसळत, राहुल यांनी लोकसभेतील निवडणूक सुधारणांवरील चर्चेदरम्यान केलेल्या आपल्या विधानाचा पुनरुच्चार केला. त्यांनी सांगितले की, सत्तेवर परत आल्यानंतर काँग्रेस ‘मुख्य निवडणूक आयुक्त आणि इतर निवडणूक आयुक्त (नियुक्ती, सेवेच्या अटी आणि पदाचा कार्यकाळ) कायदा, 2023’ मध्ये सुधारणा करेल. हा कायदा मुख्य निवडणूक आयुक्त आणि निवडणूक आयुक्तांना पदावर असताना घेतलेल्या निर्णयांसाठी कायदेशीर कारवाईपासून संरक्षण देतो. “मी तुम्हाला या मंचावरून सांगत आहे, काँग्रेस तुम्हाला सांगत आहे, हे विसरू नका की तुम्ही या देशाचे निवडणूक आयोग आहात, नरेंद्र मोदींचे नाही. आम्ही हा कायदा पूर्वलक्षी प्रभावाने बदलू आणि तुमच्यावर कारवाई करू,” असे राहुल गांधी म्हणाले, आणि त्यांनी निवडणूक आयोगाच्या तीन सदस्यांवर भाजप सरकारशी संगनमत करून काम केल्याचा आरोप केला. राहुल यांनी अमित शहा यांनाही लक्ष्य केले आणि संसदेत निवडणूक सुधारणांवरील चर्चेदरम्यान त्यांचे हात थरथरत होते असा दावा केला.
“त्यांचे हात थरथरत होते, कारण जोपर्यंत ते सत्तेत असतात, तोपर्यंतच ते शूर असतात. ज्या क्षणी ते सत्ता गमावतील, तेव्हा तुम्ही पाहाल की हा शूरपणा कसा नाहीसा होतो. मोदींच्या चेहऱ्याकडे बारकाईने पाहा. त्यांचा आत्मविश्वास कमी झाला आहे. त्यांनाही माहीत आहे, की त्यांची मतचोरी पकडली गेली आहे, आणि लवकरच संपूर्ण देशाला हे सत्य कळेल,” असे राहुल म्हणाले. आपल्या भाषणात, प्रियांका यांनी असाही आरोप केला की, पंतप्रधानांच्या कार्यालयातील एक व्यक्ती सट्टेबाजीच्या ॲपशी संबंधित अनियमिततांमध्ये सामील आहे. देशातील बेरोजगार तरुणांच्या स्थितीवर बोलताना त्यांनी हा आरोप केला. “या देशातील तरुण बेरोजगारी, महागाई, पेपरफुटी आणि अंमली पदार्थांच्या विळख्यात सापडले आहेत, आणि दिवसभर सट्टेबाजीच्या ॲप्सवर वेळ घालवत आहेत. आणि हे सट्टेबाजीचे ॲप कुठून चालवले जात आहे? सूत्रांनुसार, पंतप्रधानांच्या कार्यालयातील एका व्यक्तीने सट्टेबाजीच्या ॲपमध्ये अनियमितता केली आहे. यावर संसदेत चर्चा होते का? का नाही? त्यांना आमच्याकडून राष्ट्रगीतावर चर्चा करायची आहे, बेरोजगारी, पेपरफुटी किंवा महागाईवर नाही,” असे प्रियांका म्हणाल्या. त्यांनी भाजपला कागदी मतपत्रिका वापरून निवडणुका घेण्याचे आव्हानही दिले, ही मागणी त्यांनी अलीकडे वारंवार केली आहे.
राहुल यांनी आरएसएस प्रमुख मोहन भागवत यांच्यावरही हल्ला चढवला. भागवत यांनी शनिवारी पोर्ट ब्लेअर (ज्याचे नाव बदलून श्री विजय पुरम ठेवण्यात आले आहे) येथील एका जाहीर सभेत म्हटले होते की, सध्याच्या काळात केवळ सत्य नव्हे, तर सामर्थ्य जागतिक मान्यता मिळवून देते. “विश्व सत्याला नाही, शक्तीला पाहते, ज्याच्याकडे शक्ती आहे, त्याला मानते. भले मनापासून नाही, पण मानते नक्कीच,” असे भागवत यांनी म्हटल्याचे वृत्तसंस्था पीटीआयने उद्धृत केले आहे.
राहुल म्हणाले की, भागवत यांची विचारसरणी हिंदू तत्त्वज्ञानाशी जुळत नाही, जे सत्याला सर्वोच्च मानते. “ती भागवत आणि आरएसएसची विचारसरणी आहे आणि आमचा वैचारिक संघर्ष त्यांच्या विरोधात आहे. ही सत्य आणि असत्यामधील लढाई आहे,” असे राहुल म्हणाले.

Recent Comments