scorecardresearch
Wednesday, 24 December, 2025
घरराजकारणउदयनिधी यांच्या ‘संस्कृत ही मृत भाषा’ या विधानावरून भाजपचा हल्लाबोल

उदयनिधी यांच्या ‘संस्कृत ही मृत भाषा’ या विधानावरून भाजपचा हल्लाबोल

चेन्नई येथे एका पुस्तक प्रकाशन कार्यक्रमात तामिळनाडूचे उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन यांनी संस्कृतला 'मृत भाषा' असे संबोधले होते, त्यावर भाजप आणि काँग्रेसकडून तीव्र प्रतिक्रिया उमटल्या आहेत.

चेन्नई: चेन्नई येथे एका पुस्तक प्रकाशन कार्यक्रमात तामिळनाडूचे उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन यांनी संस्कृतला ‘मृत भाषा’ असे संबोधले होते, त्यावर भाजप आणि काँग्रेसकडून तीव्र प्रतिक्रिया उमटल्या आहेत. 21 नोव्हेंबर रोजी चेन्नई येथे एका पुस्तक प्रकाशन सोहळ्यात बोलताना, उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर थेट शाब्दिक हल्ला चढवला होता आणि धोरण आणि निधीद्वारे हिंदी आणि संस्कृतचा प्रचार करताना तमिळ भाषेबद्दल ‘सोयीस्कर’ चिंता व्यक्त केल्याबद्दल टीका केली होती. भाजपच्या ज्येष्ठ नेत्या तमिलिसाई सुंदरराजन यांनी प्रत्युत्तर दिले की,”उपमुख्यमंत्र्यांच्या भाषेने सभ्यतेच्या सर्व मर्यादा ओलांडल्या आहेत. जी भाषा आपल्या संस्कृतीचे मूळ आहे, तिला मृत कसे म्हणता येईल? हा केवळ संस्कृतवर हल्ला नाही तर लाखो हिंदूंच्या सांस्कृतिक वारशाचा अपमान आहे,” त्या म्हणाल्या.

काँग्रेस खासदार कार्ती चिदंबरम यांनी केंद्रीय निधी पद्धतींवरील उदयनिधींच्या टीकेला दुजोरा देत, संस्कृतसंबंधीच्या वक्तव्यापासून स्वतःला अलिप्त ठेवले. “मी कोणत्याही भाषेला मृत भाषा म्हणणार नाही. जर कोणाला कोणतीही भाषा शिकायची असेल तर ते ती शिकू शकतात. परंतु केंद्र सरकार तमिळ भाषेला निधी देताना भेदभाव दर्शवते आणि त्यात काही शंका नाही,” असे ते म्हणाले. पुस्तक प्रकाशनाच्या वेळी उदयनिधी स्टॅलिन म्हणाले होते: “पंतप्रधान मोदींनी बोलताना सांगितले होते, की ते तमिळ शिकले नाहीत आणि तमिळ वाचू शकत नाहीत याची त्यांना चिंता आहे. मी त्यांना विचारत आहे की, एकीकडे, तुम्ही तमिळ भाषेची काळजी असल्याचे नाटक करत आहात आणि दुसरीकडे तुम्ही लोकांना तमिळ शिकू न देता त्यांच्यावर हिंदी आणि संस्कृत लादत आहात. जर राज्याने त्रिभाषिक धोरण स्वीकारले तर तुम्ही तामिळनाडूच्या वाट्याचे फक्त 2 हजार 500 कोटी रुपये राज्याला वाटप कराल असे म्हणणे किती योग्य आहे?” उदयनिधी यांनी पुढे असा दावा केला होता, की गेल्या दशकात केंद्र सरकारने तमिळसाठी फारसे काही केले नाही.

“गेल्या दहा वर्षात, तुम्ही तमिळच्या विकासासाठी काय केले आहे? केंद्र सरकारने तमिळसाठी फक्त 150 कोटी रुपये दिले आहेत, परंतु संस्कृतसाठी 2 हजार 400 कोटी रुपये दिले आहेत, जी खरे म्हणजे आता मृत भाषा आहे.” असे ते पुढे म्हणाले.

संबंधित लेख

चुकवू नका

Recent Comments