मुंबई: समाजवादी पक्षाचे (सपा) आमदार अबू आझमी यांना बुधवारी महाराष्ट्र विधानसभेतून चालू अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या अखेरपर्यंत निलंबित करण्यात आले. मुघल सम्राट औरंगजेबाची प्रशंसा करणाऱ्या त्यांच्या वक्तव्यानंतर सत्ताधारी आणि विरोधी पक्षांच्या आमदारांकडून त्यांचे निलंबन करण्याची मागणी सुरू झाली. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मंगळवारी आझमींवर कारवाई करण्याचे आश्वासन दिले आणि बुधवारी सकाळी त्यांच्या निलंबनाचा प्रस्ताव सादर केला.
‘एक्स’वरील पोस्टमध्ये आझमी म्हणाले, “माझ्या शब्दांचे विकृतीकरण केले गेले आहे. इतिहासकार आणि लेखकांनी औरंगजेब रहमतुल्ला अली यांच्याबद्दल जे म्हटले आहे तेच मी सांगितले. छत्रपती शिवाजी महाराज, संभाजी महाराज किंवा महाराष्ट्रातील इतर कोणत्याही प्रतिष्ठित व्यक्तींबद्दल मी कोणतेही अपमानजनक विधान केलेले नाही. जर माझ्या विधानामुळे कोणाचे मन दुखावले असेल तर मी माझे शब्द मागे घेतो आणि माफी मागतो.” मात्र, “मी सरकारला विचारू इच्छितो की राज्यात दोन वेगवेगळे कायदे आहेत का? एक अबू आझमींसाठी आणि दुसरा राहुल सोलापूरकर आणि प्रशांत कोरटकरांसाठी?” असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला आहे.
मराठी मालिका ‘राजश्री शाहू’मध्ये शाहू महाराजांची भूमिका साकारलेले अभिनेते राहुल सोलापूरकर यांनी फेब्रुवारीमध्ये एका पॉडकास्टमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या आग्रा किल्ल्यातून पळून जाण्याबद्दल काही भाष्य केले होते जिथे त्यांनी असा दावा केला होता, की शिवाजी महाराजांनी औरंगजेबाच्या अधिकाऱ्यांना पळून जाण्यासाठी लाच दिली होती. दुसरीकडे पत्रकार प्रशांत कोरटकर यांनी इतिहासकार इंद्रजित सावंत यांना शिवीगाळ केली आणि शिवाजी आणि संभाजी महाराज दोघांबद्दल वादग्रस्त भाष्य केले.
विरोधी पक्षांनी आझमींच्या निलंबनाचे समर्थन केले, परंतु शिवसेनेचे वरिष्ठ नेते भास्कर जाधव यांनी माध्यमांना सांगितले की, “आम्ही त्यांच्या निलंबनाचे समर्थन करतो, त्याच वेळी प्रशांत कोरटकर आणि राहुल सोलापूरकरसारख्या लोकांवरही कारवाई केली पाहिजे. आम्हाला त्यांच्याबद्दल सभागृहात बोलायचे होते, परंतु संधी देण्यात आली नाही.”
आझमींच्या या वक्तव्यावर उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केली. त्यांनी समाजवादी पक्षाला आझमींना उत्तर प्रदेशात आणण्यास सांगितले आणि म्हणाले, “अशा लोकांचा बंदोबस्त कसा करावा हे उत्तर प्रदेशला चांगलेच माहिती आहे. तुम्ही अबू आझमी वादावर तुमची भूमिका निश्चित करावी. अधिकृत घोषणा करा आणि त्या दुर्दैवी व्यक्तीला तुमच्या पक्षातून काढून टाका. मग त्याला उत्तर प्रदेशला पाठवा आणि बाकीचे आम्ही सांभाळू,” असे आदित्यनाथ विधान परिषदेत म्हणाले. आझमी यांनी यापूर्वी म्हटले होते, की छत्रपती संभाजी महाराजांच्या जीवनावर आधारित ‘छावा’ या हिंदी चित्रपटात दाखवलेल्या काही गोष्टी चुकीच्या आहेत. त्यांनी असेही म्हटले होते, की औरंगजेब खरं तर एक चांगला प्रशासक होता. “छावामध्ये चुकीचा इतिहास दाखवला जात आहे… औरंगजेबाने अनेक मंदिरे बांधली. मला वाटत नाही की तो क्रूर प्रशासक होता,” असे आझमी म्हणाले होते. औरंगजेबाच्या कारकिर्दीत भारताला ‘सोने की चिडिया’ असे संबोधले जात होते असा दावाही त्यांनी केला.
अनेक वाद
1995 मध्ये अबू आझमी यांना महाराष्ट्र समाजवादी पक्षाचे प्रमुख बनवण्यात आले आणि ते राज्यातील पक्षाचा एकमेव प्रमुख चेहरा राहिले आहेत. मुंबईतील मानखुर्द भागात त्यांचा मोठा प्रभाव आहे, जिथून ते 2009 पासून आमदार आहेत. 1993 मध्ये मुंबई बॉम्बस्फोट आणि गुंड दाऊद इब्राहिमशी असलेल्या संबंधांमुळे आझमी वादात येण्याची ही पहिलीच वेळ नाही. 1993 मध्ये त्यांना मुंबई बॉम्बस्फोट आणि गुंड दाऊद इब्राहिमशी असलेल्या संबंधांमुळे अटक करण्यात आली होती. 1995 पर्यंत ते तुरुंगात होते, परंतु सर्वोच्च न्यायालयाने त्यांना सोडण्याचा आदेश दिला. 2006 मध्ये, भिवंडीमध्ये जमावाला भडकावल्याचा त्यांच्यावर आरोप होता, ज्यामुळे दोन पोलिसांची हत्या झाल्याचा आरोप होता.
2009 मध्ये, जेव्हा आझमी यांनी विधानसभेत हिंदीमध्ये शपथ घेतली तेव्हा मनसेच्या 13 आमदारांनी त्यांच्यावर आक्षेप घेतला. खरं तर, मंगळवारी अबू आझमी यांचा मुलगा आणि उद्योजक फरहान आझमी याच्यावर गोवा पोलिसांनी बेदरकारपणे गाडी चालवल्याबद्दल स्थानिक रहिवाशांशी झालेल्या वादानंतर गुन्हा दाखल केला.
Recent Comments