1605 मध्ये पहिले मुद्रित वृत्तपत्र प्रकाशित झाले, 2025 मध्ये इटलीतील ‘इल फॉग्लिओ’ (Il Foglio) ने कृत्रिम बुद्धिमत्तेद्वारे पूर्णपणे तयार केलेले पहिले वृत्तपत्र प्रकाशित केले. या वृत्तपत्राने पत्रकारितेवरील तंत्रज्ञानाचा प्रभाव दाखविण्यासाठी ‘एआय’चा उपयोग केला आहे. थोडा गमतीचा भाग म्हणजे हा बदल घडून येण्यासाठी मानवी समाजाला 420 वर्षे लागली!
‘इल फॉग्लिओ’चे संपादक क्लाउडिओ सेरासा यांनी सांगितले, की या आवृत्तीतील सर्व काही—लेखांपासून मथळ्यांपर्यंत—कृत्रिम बुद्धिमत्तेद्वारे तयार केले गेले आहे. ‘द गार्डियन’ला दिलेल्या मुलाखतीत सेरासा यांनी स्पष्ट केले की, यापुढे पत्रकारांचे काम फक्त एआय चॅटबॉट किंवा टूलला प्रश्न विचारणे आणि त्याची उत्तरे वाचणे एवढेच राहणार आहे! कृत्रिम बुद्धिमत्ता आता सर्व क्षेत्रांत मोठे बदल घडवून आणत आहे आणि वृत्तपत्र प्रकाशनातील हे परिवर्तन तर गोंधळात टाकणारे आहे. इंग्लंड मधील ‘द इंडिपेंडंट’ (The Independent) ने ‘गुगल एआय’च्या मदतीने एक नवीन सेवा सुरू करण्याची घोषणा केली आहे, तसेच, बीबीसीने देखील एआयचा वापर सुरू करण्याची योजना जाहीर केली आहे.
जगभरात वृत्तपत्र सुरू करण्याची कारणे :
- माहिती आणि ज्ञान प्रसार: राजकीय, सामाजिक आणि आर्थिक घडामोडी नागरिकांपर्यंत पोहोचविण्यासाठी वृत्तपत्रांचा वापर झाला. लोकांना माहिती उपलब्ध करून देत त्यांचे विचारप्रवाह घडविणे हे उद्दिष्ट होते.
- लोकशाहीचा विस्तार: लोकशाही व्यवस्थेत जनतेला सरकारच्या कामकाजावर लक्ष ठेवता यावे, यासाठी स्वातंत्र्यपूर्व काळात आणि स्वातंत्र्यानंतरही वृत्तपत्रांना महत्त्व आले.
- सामाजिक सुधारणा आणि जनजागृती: समाजात सुधारणा घडवून आणण्यासाठी, अन्यायाविरुद्ध आवाज उठवण्यासाठी आणि शिक्षण व प्रबोधनासाठी वृत्तपत्रे प्रभावी माध्यम ठरली.
- राजकीय उद्दिष्टे: स्वातंत्र्यलढा, राजकीय जागृती आणि स्वाभिमान यासाठी अनेक देशांत वृत्तपत्रांचा वापर झाला.
- व्यवसाय आणि व्यापारासाठी माहिती: व्यापाऱ्यांना बाजारातील घडामोडी आणि किंमतींची माहिती मिळावी म्हणूनही वृत्तपत्रे उदयास आली.
भारतात वृत्तपत्र सुरू होण्याची काही महत्वाची कारणे:
- ब्रिटिश राजवटीविरुद्ध स्वातंत्र्यलढा: भारतात वृत्तपत्रांनी स्वातंत्र्यलढ्याला प्रेरणा दिली. बंगाल गॅझेट, केसरी, मराठा यांसारखी वृत्तपत्रे लोकजागृतीसाठी महत्त्वाची ठरली.
- सामाजिक सुधारणा आणि जागृती: राजा राममोहन रॉय, लोकमान्य टिळक, आणि महात्मा गांधी यांनी सामाजिक सुधारणांसाठी वृत्तपत्रांचा वापर केला. संपर्क प्रकाश, यंग इंडिया, इ. वृत्तपत्रे सामाजिक परिवर्तनासाठी वापरली गेली.
- ब्रिटिश धोरणांवर टीका आणि नागरिक जागरूकता : ब्रिटिश धोरणांवर टीका करणे आणि जनतेमध्ये राष्ट्रीय भावना निर्माण करणे, हे उद्दिष्टही भारतीय वृत्तपत्रांनी साध्य केले.
2025 मध्ये एआय वृत्तपत्र निर्मितीमुळे जगभरातील वाचकांसाठी संभाव्य धोके:
- अर्धसत्य आणि दिशाभूल करणारी माहिती: एआय मोठ्या प्रमाणावर माहितीवर प्रक्रिया करून वृत्तपत्रे तयार करू शकते, परंतु चुकीचे संदर्भ, अर्धसत्य किंवा दिशाभूल करणारी माहिती प्रसारित होण्याची शक्यता वाढते. सत्यापनाशिवायच प्रसारित झालेली माहिती वाचकांमध्ये गैरसमज पसरवू शकते, ज्याची परिणती दंगलीत, अराजकतेत होऊ शकते.
- प्रभावशाली गटांचे नियंत्रण: एआय प्रणालीला नियंत्रित करणारे शक्तिशाली गट किंवा सरकारे आपली विचारधारा जनतेवर लादण्यासाठी वृत्तपत्रांचा वापर करू शकतात, करतात. त्यामुळे लोकशाहीला धोका निर्माण होऊ शकतो.
- विविधतेचा अभाव: मानवी संपादकांची भूमिका नसल्यास, विविध मतप्रवाह आणि विचारसरणींना कमी जागा मिळण्याची शक्यता असते. एआय विशिष्ट विचारधारा किंवा पूर्वग्रहांनुसारच माहिती प्रसारित करू शकते, त्यामुळे लोकांची मते चुकीची आणि एककल्ली होऊ शकतात.
- मानवी दृष्टिकोनाचा अभाव: एआयमध्ये माणसाप्रमाणे संवेदनशीलता आणि नैतिक समज नसते. त्यामुळे सामाजिक, सांस्कृतिक किंवा राजकीयदृष्ट्या संवेदनशील विषयांवर अपुरी किंवा असंवेदनशील मांडणी होऊ शकते, जी समाजाला हानिकारक ठरू शकते. हे भविष्याततले धोके नसून वर्तमानातील वास्तव आहे. उदाहरणार्थ, ग्रोकवर (GROK) वर सध्या जे चालू आहे, ती सर्व एका ‘माणसाचीच’ निर्मिती आहे.
याबद्दल अधिक जाणून घेण्यासाठी कलिम अहमद यांचा लेख जरूर वाचा. मस्कच्या एआय टूलने, ग्रोकने, प्रचंड खळबळ उडवून दिली आहे. जगातील बदलत्या सांस्कृतिक आणि राजकीय वातावरणाचं अचूक प्रतिबिंब दाखवलं आहे. त्यामध्ये राजकीयदृष्ट्या योग्य किंवा तटस्थ उत्तरांसाठी नेहमीचे बंधनकारक नियम जवळपास नाहीत. त्यामुळे ग्रोक सहजपणे अश्लील, भडक आणि वादग्रस्त उत्तरे देतो. जे विचार पूर्वी विघातक मानले जात होते, ते आता स्वीकारले जात आहेत. पण सध्या सुरू असलेले सांस्कृतिक आणि भू-राजकीय बदल पुढच्या पिढ्यांवर परिणाम करतील, विशेषतः टेस्ला आणि स्टारलिंक भारतात पाय रोवू लागतील तसतसे ते अजूनच ठळकपणे लक्षात येईल.
- गोपनीयतेचा धोका: एआय सतत डेटा गोळा करत असल्यामुळे वाचकांच्या वाचनसवयी, आवडीनिवडी आणि वैयक्तिक माहितीचा गैरवापर होण्याची शक्यता असते. यामुळे गोपनीयतेला धोका निर्माण होतो.
- नोकऱ्यांना धोका: जर वृत्तपत्र निर्मिती पूर्णतः एआयवर अवलंबून राहणार असेल, तर पत्रकार, संपादक आणि प्रकाशनाशी संबंधित अनेक नोकऱ्यांवर परिणाम होईल. मानवी हस्तक्षेप कमी झाल्यास पत्रकारितेच्या मूल्यांचे काय? हा प्रश्न ऐरणीवर येतो.
- नकली बातम्या (Deepfakes) आणि propaganda: एआयचा वापर करून वास्तवासारख्या दिसणाऱ्या खोट्या बातम्या किंवा छायाचित्रे तयार केली जाऊ शकतात. त्यामुळे वाचकांची फसवणूक होऊ शकते आणि समाजात संभ्रम आणि अस्थिरता निर्माण होऊ शकते.
- नैतिक जबाबदारीचा अभाव: एआयनिर्मित बातम्या प्रसारित झाल्यावर चुकीची माहिती दिल्यास जबाबदारी कोणाची, हे ठरवणे कठीण ठरते. त्यामुळे नैतिक जबाबदारीची कुणाची? चुकीबद्दल शिक्षा कुणाला?
एकूणच समाजामध्ये कृत्रिम बुद्धिमत्तेबद्दल जागरूकता निर्माण करणे, त्यातले धोके, फायदे याविषयी जनजागृती करणे, लोकांना प्रशिक्षित करणे हे अतिशय महत्त्वाचे ठरते.
Recent Comments