जग त्यांच्या कवितेच्या प्रेमात पडले, ते 8 नोव्हेंबर 2002 रोजी जौन एलियाचा मृत्यू झाल्यानंतर. आज ते सर्वाधिक गुगल सर्च केल्या जाणाऱ्या कवींपैकी एक आहेत. परंतु तरीही, आधुनिक उर्दू कवितेतील ते एक गूढ व्यक्तिमत्त्व आहे—एक पाकिस्तानी मार्क्सवादी, एक नास्तिक आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे, परिस्थितीवर प्रश्नचिन्ह उपस्थित करणारा माणूस.
परंतु त्यांच्या कवितांची आज कितीही चर्चा असली, तरी ती त्यांच्या शोक कवितांपुरतीच मर्यादित राहिली आहे. प्रेम आणि तोटा हे त्यांच्या कवितांमधील मध्यवर्ती विषय आहेत. त्यांच्या कविता बऱ्यापैकी तीव्र भावना व्यक्त करणाऱ्या आणि ‘रॉ’ आहेत. परंतु त्या एका जटिल, बहुआयामी कवीच्या केवळ एका पैलूचे प्रतिनिधित्व करतात ज्यांचे जीवन बौद्धिक बंडखोरी आणि राजकीय सक्रियतेने व्यापलेले होते.
“जौन इलिया, माझ्या मते, ज्यांना जगाकडून चुकीच्या पद्धतीने समजून घेण्यात आले अशा कवींपैकी एक आहेत. त्यांना अनेकदा ‘शोककवी’ म्हणून चित्रित केले जाते. कारण ते आपल्या पत्नीपासून विभक्त झाल्यानंतर दुःखाने वेडेपिसे झाले होते. ”भारतीय इतिहासकार साकिब सलीम यांनी द प्रिंटला सांगितले. त्यांनी असेही सांगितले की मुशायरा (काव्यात्मक परिसंवाद) मध्ये इलियाला एका वेगळ्या शैलीत कविता वाचताना दाखवणाऱ्या यूट्यूब व्हिडिओंनी या स्टिरियोटाइपला आणखी मजबूत केले. “परंतु आपण जौन एलियाचे विचारवंत, तत्त्वज्ञ, राजकीय भाष्यकार आणि समाजवादी म्हणून पुनर्मूल्यांकन करणे महत्त्वाचे आहे.”
सलीम पुढे म्हणाले की हे एकांगी व्यक्तिचित्रण आहे. राजकारण आणि सामाजिक समस्यांमध्ये खोलवर गुंतलेला एक वचनबद्ध मार्क्सवादी म्हणून इलिया यांची एक वेगळी ओळख आहे. त्यांचे लाखो ऑनलाइन फॉलोअर्स आणि स्वत:ला पुढचा इलिया म्हणून पाहणारे तरुण कवी अनेकदा एक महत्त्वाचे तथ्य समजून घेत नाहीत. “त्यांचे लेखन (कविता तसेच गद्य) साम्यवादी संदेशांनी भरलेले आहे,” सलीम म्हणाले.
बंडखोर कवी
अनेक समीक्षक आणि काव्यप्रेमी इलियाला पारंपारिक उर्दू कवितांच्या कल्पनांना आव्हान देणारी व्यक्ती म्हणून पाहतात. “मी एलियाच्या कवितेने मोठा झालो. याने मला लहानपणापासूनच असुरक्षितता आणि मानवी भावनांच्या कच्च्या, ‘अनफिल्टर्ड’ पैलूंचा स्वीकार करायला शिकवले,” असे कवी आणि पाकिस्तानमधील एलियाचे अधिकृत इंग्रजी अनुवादक, अम्मार अझीझ म्हणाले.
जौन एलियाचा पहिला काव्यसंग्रह, ‘शायद’ 1991 मध्ये प्रकाशित झाला. प्रकाशनास उशीर झाला तरीही, संग्रहाने त्याला लोकप्रियता मिळवून दिली, विशेषत: मुशायरांमध्ये, पाकिस्तान आणि परदेशात. या उशीरा मिळालेल्या ओळखीमुळे ते प्रामुख्याने मुशायरांचे कवी म्हणून का दिसले, हे स्पष्ट होऊ शकते.
पाकिस्तानी अनुवादक रझा नईम यांनी इलियाला श्रद्धांजली देताना लिहिले आहे की, साहित्यिक समीक्षकही दीर्घकाळापर्यंत त्यांच्या कार्याकडे लक्ष देण्यास अयशस्वी ठरले. तरीही मुशायऱ्यांमध्ये त्यांची उपस्थिती, जिथे त्यांनी अनेकदा नाट्यमय सादरीकरण केले, प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केले. त्यांचा सांस्कृतिक प्रभाव कालांतराने वाढला आहे आणि सीमेच्या दोन्ही बाजूंच्या लोकांनी एलियाच्या कार्याचा उल्लेख करणे असामान्य नाही. या वर्षी ऑगस्टमध्ये, जम्मू आणि काश्मीरमधील पीपल्स डेमोक्रॅटिक पार्टीच्या सदस्यांनी विधानसभा निवडणुकीसाठी तिकीट नाकारल्यानंतर एलियाच्या कवितेतून त्यांची निराशा व्यक्त केली.
“वफा, इखलास, कुर्बानी, मोहबत, अब इन लफ्ज़ौ का पीछा क्यू करे हम (निष्ठा, प्रामाणिकपणा, त्याग, प्रेम, आता या शब्दांचा कोणी पाठलाग का करावा?),” पीडीपीचे माजी आमदार एजाज अहमद मीर यांनी एक्स वर लिहिले.
खळबळजनक जीवन
जौन इलिया कराचीचे नागरिक बनण्यापूर्वी त्यांचे घर उत्तर प्रदेशातील अमरोहा होते. 1931 मध्ये सय्यद सिब्त-ए-असगर नक्वी यांचा जन्म झाला, इलियाने नंतर वडिलांचे आडनाव धारण केले आणि फाळणीनंतर पाकिस्तानात गेले. त्यांचे दोन्ही भाऊ, रईस अमरोहवी आणि सय्यद मुहम्मद तकी हे साहित्यिक वर्तुळातील प्रसिद्ध विद्वान होते.
इलिया यांचा प्रारंभी फाळणीला विरोध होता पण अखेरीस 1957 मध्ये कराची येथे स्थलांतरित झाले, जिथे त्यांनी आपले उर्वरित आयुष्य पत्रकार आणि अनुवादक म्हणून काम करत घालवले.
त्याच्या अनेक समकालीनांनी इस्लामिक राज्य म्हणून पाकिस्तानची ओळख स्वीकारली असताना, एलियाच्या मार्क्सवादी कलामुळे त्यांचा देशाच्या वैचारिक पायांबद्दल भ्रमनिरास झाला. “जर इस्लामच्या नावावर पाकिस्तानची निर्मिती झाली असती, तर किमान कम्युनिस्ट पक्षाने त्यांच्या मागणीला कधीच पाठिंबा दिला नसता,” असे त्यांनी शायदमध्ये लिहिले आहे.
सरजमीन-ए-ख्वाब-ओ-ख्याल (स्वप्न आणि कल्पनेची भूमी) या त्यांच्या एका कवितेत, इलियाने एका क्रांतीची कल्पना केली आहे जी कम्युनिस्ट आदर्शांच्या माध्यमातून पाकिस्तानला आकार देईल. “खुश बदन! पेरहं हो सुर्ख तेरा, दिलबरा! बांकपन हो सुर्ख तेरा.” असे त्या कवितेचे शब्द आहेत. एलियाचा काव्यमय आवाज मात्र शरणागतीचा नव्हता. त्याऐवजी, त्यांच्या कविता निराशेतही, नवीन अर्थांचा अथक शोध घेतात. त्यामुळेच कदाचित अनेकांनी त्याच्याकडे ‘आमच्यावर विजय मिळवणारा पराभूत’ म्हणून पाहिले.
त्यांची बौद्धिक कठोरता आणि राजकीय सक्रियता असूनही, एलियाचे वैयक्तिक जीवन अशांततेने ग्रासलेले होते. प्रसिद्ध स्त्रीवादी, जाहिदा हिना यांच्याशी त्यांचे लग्न झाले होते मात्र त्यांचा 1992 साली घटस्फोट झाला. यांमुळे त्यांच्या कार्यात नुकसान, परकेपणा दुःख हे विषय प्रामुख्याने येऊ लागले.
2021 मध्ये, त्यांची मुलगी फैनाना फरनाम यांनी द एक्सप्रेस ट्रिब्यूनमध्ये त्यांचे अस्वस्थ बालपण आणि त्यांच्या वडिलांच्या मद्यपानाबद्दल एक खुले पत्र लिहिले.
“मला समजत नाही की लोकांना हे कसे समजले नाही की जौन इलिया त्यांचे आवडते कवी आहेत, पण ते माझे वडील आहेत. मी त्यांच्या कवितांमध्ये जीवन शोधू शकले नाही, ते माझे जीवन होते. आम्हाला आमचे वडील जौन एलिया यांची गरज होती, कवीची नाही आणि आमचे वडील कुठेतरी हरवले होते,” त्यांनी लिहिले.
Recent Comments