scorecardresearch
Monday, 8 September, 2025
घरप्रशासननिवडणूक आयोगाचे नवे निवडणूक आयुक्त म्हणून विवेक जोशींची नियुक्ती

निवडणूक आयोगाचे नवे निवडणूक आयुक्त म्हणून विवेक जोशींची नियुक्ती

1989 च्या बॅचचे आयएएस अधिकारी यांनी अनेक प्रशासकीय पदे भूषवली आहेत आणि मोदींचा विश्वास त्यांच्यावर असल्याचे म्हटले जाते. सुधारित नियुक्ती प्रक्रियेविरुद्धच्या याचिकांवर सर्वोच्च न्यायालयाने अद्याप सुनावणी केलेली नसतानाही निवडणूक आयोगाच्या नवीन नियुक्त्या झाल्या आहेत.

गुरुग्राम: हरियाणाचे मुख्य सचिव विवेक जोशी यांची निवडणूक आयुक्त म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे – ही एक अशी पायरी आहे ज्यामुळे 2029 मध्ये होणाऱ्या पुढील लोकसभा निवडणुकीसाठी ते मुख्य निवडणूक आयुक्त (सीईसी) होण्याची शक्यता आहे. निवडणूक आयुक्तांच्या नियुक्तीच्या सुधारित प्रक्रियेला आव्हान देणाऱ्या याचिकांवर सर्वोच्च न्यायालयाने निर्णय घेईपर्यंत विलंब करण्याची विरोधी पक्षांची मागणी असूनही जोशी यांची नियुक्ती सोमवारी झाली.

“जोशी हे मृदुभाषी अधिकारी आहेत आणि सध्याच्या भाजप (भारतीय जनता पक्ष) राजवटीसाठी त्यांनी प्रयत्न केले आहेत,” असे हरियाणातील एका वरिष्ठ आयएएस अधिकाऱ्याने सांगितले. “सोमवारी त्यांना निवडणूक आयुक्त म्हणून नियुक्त करून, केंद्र सरकारने हेदेखील सुनिश्चित केले आहे, की निवडणूक आयुक्त आणि मुख्य निवडणूक आयुक्तांच्या नियुक्तीच्या प्रक्रियेबाबत सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित असलेल्या याचिकेचा निकाल काहीही असो, 2029 मध्ये देश लोकसभा निवडणुकीला सामोरा जात असताना जोशी भारताचे मुख्य निवडणूक आयुक्त होतील.” सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे, की या याचिकांवर बुधवारी प्राधान्याने विचार केला जाईल.

नवीन नियुक्ती झालेले मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांचा कार्यकाळ 27 जानेवारी 2029 रोजी, त्यांच्या 65 व्या वर्षी संपुष्टात येईल. त्यांनतर जोशी यांना मुख्य निवडणूक आयुक्तपदाची जबाबदारी स्वीकारता येईल. दुसरे निवडणूक आयुक्त सुखबीर सिंग संधू यांचा कार्यकाळ 6 जुलै 2028 रोजी पूर्ण होईल, जो पुढील सार्वत्रिक निवडणुकीपूर्वीचा आहे. कुमार आणि संधू दोघांचीही 14 मार्च 2024 रोजी निवडणूक आयोगात नियुक्ती झाली.

मुख्य निवडणूक आयुक्तांचा कार्यकाळ जास्तीत जास्त सहा वर्षे किंवा तो/ती 65 वर्षांचे होईपर्यंत चालू राहतो. 58 वर्षे आणि नऊ महिने वयाचे जोशी निवडणूक आयोगात त्यांचा पूर्ण सहा वर्षांचा कार्यकाळ पूर्ण करतील अशी अपेक्षा आहे.

विवेक जोशी कोण आहेत?

1989 च्या बॅचचे हरियाणा केडरचे आयएएस अधिकारी, जोशी यांनी अनेक प्रमुख प्रशासकीय पदे भूषवली आहेत आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा त्यांच्यावर विश्वास असल्याचे म्हटले जाते. गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये टी.व्ही.एस.एन. प्रसाद यांच्या निवृत्तीनंतर त्यांनी हरियाणाचे मुख्य सचिव म्हणून पदभार स्वीकारला. मुख्य सचिव म्हणून नियुक्ती होण्यापूर्वी, जोशी कार्मिक, सार्वजनिक तक्रार आणि निवृत्ती वेतन मंत्रालयात कार्मिक आणि प्रशिक्षण विभागात (डीओपीटी) सचिव म्हणून काम करत होते. हरियाणा सरकारच्या विनंतीवरून त्यांना त्यांच्या मूळ राज्यात परत पाठवण्यात आले.

त्यांनी यापूर्वी केंद्रीय प्रतिनियुक्ती दरम्यान केंद्रीय अर्थ मंत्रालयात सचिव म्हणून काम केले आहे. त्यांनी केंद्रीय गृह मंत्रालयांतर्गत भारताचे रजिस्ट्रार जनरल आणि जनगणना आयुक्त म्हणूनही चार वर्षे काम केले आहे. याव्यतिरिक्त, ते रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (आरबीआय) आणि देशातील सर्वात मोठी बँक, स्टेट बँक ऑफ इंडिया (एसबीआय) चे बोर्ड सदस्य आहेत. त्यांनी 2001 ते 2006 पर्यंत वस्त्रोद्योग मंत्रालयात संचालक म्हणून काम केले. जोशी यांनी आयआयटी रुरकीमधून मेकॅनिकल इंजिनिअरिंगमध्ये पदवी मिळवली आणि स्वित्झर्लंडमधील जिनेव्हा येथील ग्रॅज्युएट इन्स्टिट्यूट ऑफ इंटरनॅशनल अँड डेव्हलपमेंट स्टडीजमधून आंतरराष्ट्रीय अर्थशास्त्रात पीएचडी केली.

त्यांचे भाऊ विनीत जोशी, 1992 च्या बॅचचे मणिपूर कॅडरचे आयएएस अधिकारी, सध्या केंद्र सरकारच्या उच्च शिक्षण विभागात सचिव आहेत. यापूर्वी त्यांनी मणिपूरचे मुख्य सचिव, भारतात प्रवेश परीक्षा आयोजित करण्यासाठी जबाबदार असलेल्या राष्ट्रीय चाचणी संस्थेचे (एनटीए) महासंचालक आणि सध्याच्या प्रशासनात केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाचे (सीबीएसई) अध्यक्ष म्हणून काम पाहिले आहे. विनीत जोशी यांनी आयआयटी कानपूरमधून मेकॅनिकल इंजिनिअरिंगचे शिक्षण घेतले आणि इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ फॉरेन ट्रेड (आयआयएफटी) मधून व्यवसाय प्रशासनात पदव्युत्तर पदवी प्राप्त केली.

“विवेक जोशी तसेच त्यांचा धाकटा भाऊ विनीत जोशी हे केंद्रातील सध्याच्या भाजप राजवटीच्या विश्वासातील आहेत,” असे वर उल्लेख केलेल्या वरिष्ठ आयएएस अधिकाऱ्याने सांगितले.

संबंधित लेख

चुकवू नका

Recent Comments