दररोज आपण कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) ही आधुनिक तंत्रज्ञानाची देणगी माणसासाठी किती फायदेशीर ठरते आहे हे वाचतो, ऐकतो आणि पाहतो, आणि यावर चर्चासुद्धा होत असते.
परंतु त्याचवेळी, ‘विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर आणि शिकण्याच्या प्रक्रियेवर ‘एआय’चा प्रभाव’ हा जगभरच्या संशोधकांसाठी चिंतेचा विषय बनला आहे. नुकताच ‘सायन्स डायरेक्ट’ या ऑनलाइन जर्नलमध्ये ‘Computers and Education: Artificial Intelligence’ नावाचा एक महत्त्वपूर्ण संशोधन अहवाल प्रसिद्ध झाला आहे. या अहवालानुसार, विद्यार्थी मोठ्या प्रमाणावर चॅटजीपीटीसारख्या एआय टूल्सचा वापर शैक्षणिक कामासाठी करू लागले आहेत. परिणामी, त्यांच्या अभ्यासातील त्यांचा स्वतःचा सहभाग, स्वअभ्यास कमी होत आहे आणि बौद्धिक गुंतवणूक कमी झाल्याचे चित्र दिसत आहे.
एआयचा वापर करताना, त्याचे उत्तर हे आपल्या अपेक्षा आणि गरजांशी जुळते आहे का, याची खात्री करून घेणे आवश्यक आहे. ‘चॅटजीपीटी’सारखं एखादं टूल तुम्हाला म्हणेल, ‘हे तपासा’, पण आपण खरंच जाणतो का की नेमकं काय तपासायचं आहे? जे उत्तर आपल्याला मिळालंय, ते खरंच अचूक आहे का हे ओळखता येतं का आपल्याला? ‘एआय’सारखं तंत्रज्ञान हे शिक्षणासाठी पूरक असावे. पण जेव्हा ते त्वरित आणि सोपी उत्तरं देतं, तेव्हा विद्यार्थी त्याच्यावर संपूर्ण अवलंबून राहू लागतात. हा अहवाल स्पष्टपणे दाखवतो की ‘एआय’ हे फक्त टूल न राहता विद्यार्थ्यांसाठी एक कुबडी बनू लागले आहे की काय, असा प्रश्न पडत आहे.
एआय म्हणजे एक शॉर्टकट आहे, पण दीर्घकालीन फायद्यासाठी तो उपयुक्त ठरेलच असं नाही. हळूहळू माणसाचं स्वतःचं विचार करणं, कल्पना करणं आणि व्यक्त होणं कमी होत चाललं आहे. गेल्यावर्षी ऑक्सफर्ड डिक्शनरीत ‘ब्रेन रॉट’ हा नवीन शब्द म्हणूनच सामील करण्यात आला, जो या परिस्थितीचं अगदी अचूकपणे वर्णन करतो. जर विद्यार्थ्यांनी आपली बौद्धिक वाढ आणि वास्तव जीवनातील आव्हानांना सामोरे जाण्याची क्षमता गमावली, तर आपलं भविष्य काय असेल? का हे सगळं आधीच सुरू झालं आहे? एआय माणसाच्या बुद्धिमत्तेला पर्याय नसून त्याचा सहाय्यक असावा.
एआय वापरण्याच्या सुलभतेचं गंभीर मूल्यांकन करणं आवश्यक आहे, विशेषतः भारतासारख्या देशात जिथे शिक्षणव्यवस्थेत आधीच अनेक त्रुटी आहेत. त्यात एआयमुळे उद्भवणाऱ्या नव्या गुंतागुंतींची भर ही कल्पनेपलीकडची आहे.
आजच्या एआयशासित जगात, वैयक्तिक आणि सार्वजनिक जीवनात मोठे बदल होत आहेत. समाज म्हणून आपण या बदलांना सामोरं जाण्यास तयार आहोत का? ‘आपण’ म्हणताना यामध्ये दोन गट येतात:
- पहिला गट म्हणजे ज्यांना एआय म्हणजे काय हे माहिती आहे, जे या बदलांना ओळखतात आणि त्यानुसार त्याच्याशी जुळवून घेत आहेत.
- पण दुसरा गट असा आहे ज्यांना एआयविषयी काहीही माहिती नाही—त्यांना त्याचं अस्तित्वही माहीत नाही, मग त्याचा परिणाम जाणण्याचा किंवा त्यासाठी तयार होण्याचा प्रश्नच येत नाही!
भारतामध्ये या दोन्ही गटांची गरज लक्षात घेऊन विचार करायला हवा. कदाचित ‘Computers and Education: Artificial Intelligence’ चा अहवाल लिहिणाऱ्यांनी त्यांच्या देशात अशा परिस्थितीचा विचारही केला नसेल, त्यांना तशी गरजही वाटली नसेल. कधी कधी एआय फसवते. ते चुकीची किंवा भ्रामक माहिती तयार करते, कधी कधी काल्पनिक गोष्टीही तयार करते. त्यामुळे विद्यार्थ्यांना हे शिकवणं गरजेचं आहे, की एआयने दिलेली माहिती कशी तपासायची आणि तिचा विश्वासार्हतेने उपयोग कसा करायचा. एआयचा वापर स्वतःचं लेखन सुधारण्यासाठी करणे आणि पूर्णपणे एआयकडून लिहून घेणे यामध्ये खूप महत्वाचा फरक आहे.
खरं शिक्षण म्हणजे हात, मेंदू आणि मन यांचं समन्वयित कार्य- शारीरिक, बौद्धिक आणि भावनिक सहभाग. एआयचा गैरवापर विद्यार्थ्यांना फक्त एक निष्क्रीय प्रेक्षक बनवितो, ज्यामध्ये एआय जे काही पुरवतं ते विचार न करता विद्यार्थी स्वीकारतात. जर एआयमुळे माणसे वास्तव जीवनातील प्रसंगांना शारीरिक, बौद्धिक आणि भावनिक स्तरावर सामोरे जाण्याची क्षमता गमवत असतील, तर हे इशारा म्हणून गांभीर्याने घ्यायला हवं. लवकरच (किंवा आजच) एआय स्वतःची भावनिक बुद्धिमत्ता विकसित करू शकत असेल आणि जर माणसांनी तीच क्षमता गमावली, तर माणसाच्या जगण्याला अर्थच काय उरेल?
विकसित राष्ट्रांमध्ये सुखसुविधा वाढत चालल्या आहेत, पण त्याचवेळी एकटेपणाही वाढतो आहे. त्यामुळे आत्महत्यांचे प्रमाणही वाढले आहे. डेन्मार्कमधील माझा एक मित्र त्याच्या समाजाला ‘मृत समाज’ म्हणतो. आपणही तशीच अवस्था गाठतोय का- बुद्धीने आणि मनानेही मृत समाज? जीवनाचं खरेपण, जिवंतपण टिकवून ठेवण्यासाठी आपल्याला थोडी अपूर्णता हवी, थोडी अनिश्चितता हवी, अपयशाची चव हवी, नकार देता यावा, नकार सहन करण्याची ताकद हवी.
तुम्हाला नाही वाटत असं? म्हणूनच एआय ही केवळ एक सहाय्यभूत गोष्ट असावी, ती आपल्याला झपाटून टाकणारी नसावी.
Recent Comments