नवी दिल्ली: मुख्यमंत्री कार्यालयातील कथित भ्रष्टाचाराच्या संदर्भात आठ ठिकाणी छापे टाकल्यानंतर दुसऱ्या दिवशी, म्हणजेच बुधवारी, सीबीआयने पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांचे ओएसडी राजबीर सिंग घुमन आणि त्यांच्या सहकाऱ्यांना चौकशीसाठी बोलावले. या तपास संस्थेने त्याचे मित्र नितीन गोहल, त्याचा भाऊ जितीन गोहल आणि बीर देविंदर यांनाही समन्स बजावले.
सीबीआयनेने पंजाबमध्ये ज्या ठिकाणांवर छापे टाकले, त्यामध्ये चंदीगडमधील मुख्यमंत्र्यांचे कॅम्प कार्यालय, घुमन यांचे संगरूर येथील निवासस्थान आणि त्यांचे बालपणीचे मित्र व वर्गमित्र, नितीन गोहल व त्याचा भाऊ जितीन गोहल, बीर देविंदर, रोमी राजा महाजन आणि आर. एस. नागरा, यांच्या ठिकाणांचा समावेश आहे.
मुख्यमंत्री कार्यालयात कथित भ्रष्टाचार होत असल्याचे संकेत देणाऱ्या ‘अंमलबजावणी संचालनालया’च्या माहितीवर कारवाई करण्यात अपयश आल्याबद्दल पंजाब आणि हरियाणा उच्च न्यायालयाने राज्य पोलिसांना फटकारले होते; त्यानंतरच्या दुसऱ्याच दिवशी या तपाससंस्थेने हे छापे टाकले. देशातील ‘आप’ शासित एकमेव राज्यात विधानसभा निवडणुका अवघ्या काही महिन्यांवर असतानाच केंद्रीय तपास यंत्रणेने केलेल्या या कारवाईवर पक्षाचे प्रमुख अरविंद केजरीवाल यांनी तीव्र प्रतिक्रिया दिली. त्यांनी आरोप केला की, या धाडी म्हणजे निवडणुकांमध्ये हे राज्य जिंकता न आल्यामुळे भाजपला आलेली निराशा दर्शवतात.
केंद्रीय तपास यंत्रणेने संबंधित तिघे आणि इतर अज्ञात सरकारी कर्मचाऱ्यांविरुद्ध ‘भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्या’च्या विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल केल्यानंतर या व्यापक धाडी टाकण्यात आल्या. “पंजाब आणि हरियाणा उच्च न्यायालयाचे आदेश आणि अंमलबजावणी संचालनालयाचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर, पंजाबच्या मुख्यमंत्र्यांचे ओएसडी आणि त्यांच्या सहकाऱ्यांवरील भ्रष्टाचाराच्या आरोपांची चौकशी करण्यासाठी सीबीआयने एफआयआर दाखल केला आहे,” अशी माहिती तपास यंत्रणेच्या प्रवक्त्याने मंगळवारी दिली; याच वेळी पंजाबमध्ये या धाडी टाकण्यात आल्या.
प्रवक्त्याने सांगितले की, त्यांच्यावरील आरोप हे आर्थिक लाभाच्या बदल्यात आयएएस आणि आयपीएस अधिकाऱ्यांसह इतर अधिकाऱ्यांच्या नियुक्त्या व बदल्यांवर प्रभाव टाकणे आणि फेरफार करणे, तसेच विभागीय कार्यवाही, धोरण निश्चिती, प्रशासकीय मंजुरी, निविदेच्या अटी, परवानाविषयक बाबी, जमिनीचा वापर बदलणे, मालमत्तेचे वाद आणि महसूल व जमिनीशी संबंधित प्रकरणांशी संबंधित होते. या घडामोडीवरून केजरीवाल यांनी केंद्रातील सत्ताधारी भाजपवर जोरदार टीका केली. “भाजपला पंजाबमध्ये निवडणूक लढवून विजय मिळवता येत नाही, त्यामुळे त्यांना ईडी-सीबीआयच्या मदतीने निवडणूक लढवायची आहे. पण पंजाबच्या जनतेने आपला निर्णय पक्का केला आहे आणि आगामी निवडणुकीत भगवंत मान यांना 100 हून अधिक जागांसह निवडून देऊन व पुन्हा मुख्यमंत्री बनवून ते भाजपच्या सीबीआय धाडीला चोख प्रत्युत्तर देतील,” असे केजरीवाल यांनी ‘एक्स’वरील एका पोस्टमध्ये लिहिले.
अधिकाऱ्यांच्या बदल्या-नियुक्त्या आणि धोरण निश्चितीमधील भ्रष्टाचाराच्या आरोपांची सीबीआयमार्फत चौकशी करण्याचे उच्च न्यायालयाने दिलेले आदेश रद्द करण्यासाठी, मान यांच्या नेतृत्वाखालील पंजाब सरकारने मंगळवारी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली. न्यायालयाने या प्रकरणावर बुधवारी किंवा गुरुवारी सुनावणी घेण्याचे संकेत दिले आहेत.

Recent Comments