नवी दिल्ली: सत्य निकेतनमध्ये इमारत कोसळून किमान सात जणांचा मृत्यू झाल्याच्या दुसऱ्या दिवशी, दिल्ली महानगरपालिकेने (एमसीडी) दक्षिण विभागाच्या उपायुक्तांसह पाच अधिकाऱ्यांना निलंबित केले आहे.
पोलिसांनी ‘द प्रिंट’ला सांगितले, की इमारतीचे मालक हरिराम बन्सल यांना राजस्थानमधील भिवाडी येथून अटक करण्यात आली आहे. ‘द प्रिंट’च्या हाती आलेल्या एमसीडीच्या आदेशानुसार, दक्षिण विभागाचे उपायुक्त राकेश कुमार यांना ‘डीएमसी सर्व्हिसेस (नियंत्रण आणि अपील) नियम, 1959’ आणि इतर लागू नियमांनुसार तात्काळ प्रभावाने निलंबित करण्यात आले आहे. रणवीर सिंग (अधीक्षक अभियंता, दक्षिण विभाग), ललित कुमार गोयल (कार्यकारी अभियंता – इमारत विभाग), सुनील चौहान (सहाय्यक अभियंता) आणि आशिष कुमार (कनिष्ठ अभियंता) यांनाही निलंबित करण्यात आले आहे. दिल्लीच्या मुख्यमंत्री कार्यालयाने ‘एक्स’वर एक पोस्ट करून प्रशासनाने घेतलेल्या या निर्णयाची माहिती दिली.
दरम्यान, दिल्लीचे मंत्री मनजिंदर सिंग सिरसा यांनी प्रसारमाध्यमांना सांगितले की, प्राथमिक निष्कर्षांवरून असे दिसून येते की जुन्या इमारतीमध्ये तळघराचे (बेसमंटचे) काम सुरू असताना ही इमारत कोसळली असावी. आतापर्यंत 12 जणांची सुटका करण्यात आली आहे. या प्रकरणाची दखल घेत दिल्ली पोलिसांनी बन्सल आणि इतरांविरुद्ध ‘भारतीय न्याय संहिता’ च्या कलम 105 (सदोष मनुष्यवध – जो खुनाच्या श्रेणीत येत नाही), 290 (निष्काळजीपणाने केलेले बांधकाम) आणि 125(अ) (जीव किंवा वैयक्तिक सुरक्षितता धोक्यात आणणारी कृती) अन्वये एफआयआर दाखल केला आहे.
यापूर्वी, इमारतीच्या फरार मालकाविरुद्ध ‘लुकआउट नोटीस’ जारी करण्यात आली होती. संबंधित घडामोडीत, एमसीडीने घटनास्थळाजवळील धोकादायक इमारतींना पाडण्याबाबतच्या नोटिसा बजावण्यास सुरुवात केली आहे. सत्य निकेतन येथील इमारत क्रमांक 13 ला नोटीस बजावण्यात आली; त्यात म्हटले आहे की, ही इमारत रहिवासी, अभ्यागत, ये-जा करणारे लोक आणि शेजारील इमारतींसाठी धोकादायक ठरत आहे. “जर मालक किंवा ताबाधारकाने आदेश मिळाल्यापासून तीन दिवसांच्या आत इमारत पाडली नाही, तर एमसीडी ती इमारत पाडेल आणि त्याचा खर्च मालकाकडून कराची थकबाकी म्हणून वसूल करेल,” असे त्या नोटीसमध्ये नमूद केले आहे.
ही नोटीस एमसीडीच्या दक्षिण विभागातील कार्यकारी अभियंता (इमारत)-1 यांनी ‘दिल्ली महानगरपालिका कायदा, 1957’ च्या कलम 491 सह वाचल्या जाणाऱ्या कलम 348 अन्वये जारी केली आहे.

Recent Comments