scorecardresearch
Saturday, 24 October, 2026
घरदेशशहजाद भट्टीच्या इन्स्टाग्रामवरील भरती-प्रक्रियेवर दिल्ली पोलिसांची कारवाई

शहजाद भट्टीच्या इन्स्टाग्रामवरील भरती-प्रक्रियेवर दिल्ली पोलिसांची कारवाई

आयएसआय समर्थित भट्टी याला '333' या क्रमांकाचे विशेष आकर्षण असल्याचे दिसते; त्याच्या अनेक प्रोफाइल्सच्या युजरनेममध्ये या क्रमांकाचा समावेश आहे.

नवी दिल्ली: भारतात गणवेशधारी कर्मचाऱ्यांना लक्ष्य करणारे नेटवर्क चालवल्याचा आरोप असलेल्या आणि आयएसआयसमर्थित पाकिस्तानी गँगस्टर शहजाद भट्टीशी संबंधित सोशल मीडिया प्रोफाइल्स हटवण्यासाठी दिल्ली पोलिसांनी गेल्या 10 महिन्यांत ‘मेटा’ला 100 हून अधिक नोटीसा पाठवल्या आहेत. भट्टीच्या एका सहकाऱ्याला अटक केल्यानंतर प्रत्येक वेळी अशी नोटीस पाठवण्यात आली. भट्टी आणि त्याच्या टोळीने अलीकडच्या काही महिन्यांत गणवेशधारी कर्मचारी तसेच पोलीस आणि सुरक्षा यंत्रणांच्या आस्थापनांना लक्ष्य केले आहे.

दिल्ली पोलिसांच्या ‘स्पेशल सेल’ने ऑक्टोबर 2025 मध्ये त्याच्या टोळीविरुद्ध कारवाई सुरू केली होती. शस्त्र तस्करी किंवा विविध स्तरांवरील दहशतवादी कारवायांचे नियोजन केल्याप्रकरणी पोलिसांनी भट्टीच्या सहकाऱ्यांना अटक केली आहे. “ऑक्टोबर आणि नोव्हेंबर 2025 दरम्यान अटक करण्यात आलेल्या भट्टीच्या साथीदारांची सखोल चौकशी केल्यानंतर, आम्ही काही सोशल मीडिया प्रोफाइल्सची ओळख पटवली ज्यांच्या माध्यमातून ते संवाद साधत होते,” अशी माहिती या प्रकरणाची माहिती असलेल्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली. त्यानंतर, दिल्ली पोलिसांनी ‘मेटा’कडे या प्रोफाइल्सबाबत तक्रार नोंदवण्यास किंवा त्या निदर्शनास आणून देण्यास सुरुवात केली. भट्टी वापरत असलेल्या अनेक प्रोफाइल्सच्या युजरनेममध्ये ‘333’ हा क्रमांक होता. “Shehzadbhatti333, shehzad.bhatti.official333, originalshehzadbhatti333, ही काही अशी प्रोफाइल्स आहेत जिथे भट्टीशी संबंधित मजकूर आढळू शकतो.

“भारतातील ज्या तरुणांची त्याला भरती करायची आहे, त्यांच्यापर्यंत पोहोचण्यासाठी भट्टी ‘इन्स्टाग्राम’ या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मचा मोठ्या प्रमाणावर वापर करतो; त्यामुळे कोणती प्रोफाइल्स सक्रिय आहेत हे समजून घेणे गरजेचे झाले होते,” असे त्या अधिकाऱ्याने सांगितले. पोलिस सूत्रांनुसार, भट्टीच्या नावाने अनेक सोशल मीडिया प्रोफाइल्स चालवली जातात—काही तो स्वतः वापरतो, तर काही ‘फॅन’ अकाउंट्स आहेत जी त्याचे कट्टर समर्थक चालवतात. या अकाउंट्सवरून भट्टीच्या मूळ प्रोफाइल्सवरील व्हिडिओ पुन्हा पोस्ट केले जातात. “भट्टी इन्स्टाग्रामद्वारे बेरोजगार तरुणांना सक्रियपणे आपल्या जाळ्यात ओढतो आणि विविध ग्रुप्स व वैयक्तिक चॅट्सच्या माध्यमातून त्यांना गुन्हेगारी कृत्यांसाठी सूचना देतो. सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सवर संभाव्य लक्ष्यांबद्दल चर्चा होत असल्याचे ठोस पुरावे तपासादरम्यान पोलिसांना मिळाले आहेत,” असे त्या अधिकाऱ्याने सांगितले.

त्यामुळे, भट्टीचे अटक केलेले किंवा ताब्यात घेतलेले साथीदार कोणत्या प्रोफाइल्सवरून संवाद साधतात हे समजताच, पोलिस ती प्रोफाइल्स त्वरित संबंधित प्लॅटफॉर्मच्या निदर्शनास आणून देतात (फ्लॅग करतात), जेणेकरून आणखी तरुणांना जाळ्यात ओढले जाऊ नये. उत्तर भारतातील दहशतवादाशी संबंधित प्रकरणांमध्ये भट्टीचे नाव वारंवार समोर आल्यानंतर त्याच्या हालचालींवर बारकाईने लक्ष ठेवण्यास सुरुवात झाली. भट्टीच्या नेटवर्कचा (मॉड्युलचा) मोठा विस्तार या वर्षी 12 ऑगस्ट रोजी दिसून आला, जेव्हा सुरक्षा यंत्रणांनी त्याच्याशी संबंधित 200 हून अधिक जणांना अटक केली. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी सांगितले की, विविध यंत्रणांनी केलेल्या छापेमारीत 14 राज्यांतून 253 जणांना ताब्यात घेण्यात आले.

देशभरातील अनेक दहशतवादी कारवायांमध्ये असलेला सहभाग आणि वाढत चाललेला प्रभाव लक्षात घेऊन, गृहमंत्रालयाने त्याला ‘दहशतवादी’ म्हणून घोषित करण्याचा प्रस्तावही मांडला आहे. सूत्रांनुसार, भट्टी आपली संपत्ती आणि ‘डॉन’सारखा रुबाब दाखवून, तसेच परदेशात आयुष्य घडवण्याचे आमिष दाखवून सर्व धर्मांतील तरुणांना आपल्या जाळ्यात ओढत असे. “त्याच्या बहुतेक सहकाऱ्यांची गुन्हेगारी पार्श्वभूमी नाही. या नेटवर्कमध्ये परदेशी विद्यापीठांतून एमबीए पदवी घेतलेल्यांपासून ते मजूर, सुतार, डिलिव्हरी बॉईज आणि पूर्णपणे अशिक्षित अशा विविध लोकांचा समावेश आहे; हे लोक केवळ 10 हजार ते 15 हजार रुपयांच्या मोबदल्यात कामे करण्यास तयार असतात,” अशी माहिती एका सूत्राने दिली.

जेव्हा ‘द प्रिंट’ने भट्टीची एखादी प्रोफाईल पाहण्याचा प्रयत्न केला, तेव्हा असे दिसून आले, की ‘कायदेशीर विनंती’वरून प्लॅटफॉर्मने त्यातील अनेक प्रोफाईल्स काढून टाकल्या होत्या. “हे खाते भारतात उपलब्ध नाही. कारण, ही सामग्री मर्यादित करण्याबाबतच्या कायदेशीर विनंतीची आम्ही पूर्तता केली आहे,” असा संदेश त्याच्या इन्स्टाग्राम खात्यावर दिसत होता. अलीकडील घडामोडीनुसार, मेटाने आपले प्लॅटफॉर्म – फेसबुक आणि इंस्टाग्राम, सहयोग पोर्टलसोबत एकीकृत केले आहेत. सहयोग पोर्टल हे माहिती तंत्रज्ञान कायद्याच्या कलम 79 (3) (ब) अंतर्गत मजकूर काढून टाकण्याच्या विनंत्यांमध्ये समन्वय साधण्यासाठी, भारतीय सायबर गुन्हे समन्वय केंद्राने (I4 सी) विकसित केलेले एक भारतीय सरकारी प्लॅटफॉर्म आहे. सूत्रांनुसार, या एपीआय एकीकरणामुळे अधिकृत कायदा अंमलबजावणी आणि सरकारी एजन्सींना मेटाच्या कोणत्याही वैयक्तिक मानवी पुनरावलोकनाशिवाय स्वयंचलित, रिअल-टाइम ब्लॉकिंग निर्देश जारी करता येतात.

मात्र, अशा प्रयत्नांनंतरही, भट्टी सोशल मीडिया प्लॅटफॉर्मद्वारे आपल्या साथीदारांना कामावर ठेवणे आणि त्यांच्याशी संपर्क साधणे सुरूच ठेवत आहे. “त्याच्या ऑनलाइन हालचालींवर सतत लक्ष ठेवून आणि भारतातील त्याची प्रोफाइल काढून टाकल्यानंतरही, अनेक वापरकर्ते – मग ते त्याचे साथीदार असोत किंवा अजून कामावर न ठेवलेले लोक असोत, व्हीपीएन वापरून त्याच्याशी संपर्क साधत आहेत,” असे अधिकाऱ्याने सांगितले.

संबंधित लेख

चुकवू नका

Recent Comments