नवी दिल्ली: “मला एकच दुःख आहे: मला धर्माच्या विरोधात असल्याचे म्हटले गेले, पण ज्यांनी इतके वाईट कृत्य केले आणि लोकांची घरे उद्ध्वस्त केली, त्यांना मात्र ‘हुतात्मा’ मानले जाते,” असे फरार दहशतवादी सतिंदरजीत सिंग ऊर्फ गोल्डी ब्रार शीख फुटीरतावादी परमजीत सिंग पम्माशी फोनवर बोलत असल्याचे रेकॉर्ड झाले आहे. या संभाषणाची ध्वनिफीत सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे.
त्यानंतर पम्मा असे म्हणाला आहे, की हरदीप सिंग निज्जर हा खरोखरच ‘हुतात्मा’ ठरेल, कारण त्याला सरकारने आणि त्यांच्या आदेशावरून मारले गेले होते. फोनवरील संभाषणादरम्यान, ब्रारने हरदीप सिंग निज्जरची हत्या केल्याची कबुली दिली. निज्जर हा त्याच्याप्रमाणेच दहशतवादी म्हणून घोषित केलेला आणि ‘खलिस्तान टायगर फोर्स’ (केटीएफ) या दहशतवादी संघटनेचा प्रमुख होता.
जून 2023 मध्ये कॅनडातील ब्रिटिश कोलंबिया येथे एका गुरुद्वाराबाहेर निज्जरची हत्या झाली होती. या घटनेनंतर कॅनडाचे तत्कालीन पंतप्रधान जस्टिन ट्रूडो यांनी भारतीय सरकारच्या हस्तकांनी हा हल्ला केल्याचा आरोप केला, ज्यामुळे ओटावा आणि नवी दिल्ली यांच्यात मोठा राजनैतिक तणाव निर्माण झाला. भारताने हे आरोप फेटाळून लावले आणि निज्जरच्या हत्येवरून वाढलेल्या राजनैतिक संघर्षात दोन्ही देशांनी एकमेकांच्या उच्चायुक्तांची हकालपट्टी केली होती. “ज्यांनी 16-17 वर्षांच्या मुलांना अंमली पदार्थांची विक्री करण्यासाठी तयार केले आणि प्रवृत्त केले. ज्यांनी तरुणांना ब्लॅकमेल करून अंमली पदार्थांची विक्री करायला आणि खबऱ्या बनायला भाग पाडले. निज्जरने अशा लोकांना तयार केले आणि बळकट केले जेणेकरून गरज पडल्यास तो त्यांचा वापर करू शकेल. चांगल्या माणसालाही वाईट कृत्यांचे परिणाम भोगावेच लागतात.” असे ब्रार त्या क्लिपमध्ये म्हणतो. “ब्रार कधीही हेरॉईनच्या व्यापारात सामील होता, असे कोणीही म्हणू शकत नाही. जर कोणी हे सिद्ध करू शकले, की मी अशा कोणत्याही कृत्यात सामील होतो, तर मी माझे मुंडन करून घेईन.” तो म्हणाला.
‘पम्मा’सोबतच्या संभाषणादरम्यान ब्रारने स्वतःला आणि तुरुंगात असलेल्या गँगस्टर लॉरेन्स बिश्नोईला वेगळे दर्शवण्याचा प्रयत्न केला. तो म्हणाला की, तो हे सर्व स्पष्टीकरण देत आहे, कारण त्याला या गोष्टीची खंत होती, की त्याला समाजाचा खलनायक मानले गेले, तर निज्जरला हुतात्मा म्हणून गौरवण्यात आले. “लॉरेन्सचे हेतू कदाचित वेगळे असतील, पण मी तुम्हाला माझे हेतू सांगत आहे. तो स्वतःच त्याचे स्पष्टीकरण देऊ शकतो. एकाच कामासाठी एकाच कारमध्ये बसलेल्या पाच लोकांचे हेतू वेगवेगळे असू शकतात. मी सरकारचा हस्तक नाही, अन्यथा माझे कुटुंब तुरुंगात का असते?” असे ब्रार पम्माला सांगतो, जो किमान तीन दशकांपासून युनायटेड किंगडममध्ये राहत आहे.
त्या दोघांनी केटीएफचा प्रमुख अर्शदीप सिंग ऊर्फ अर्श डल्ला याच्याबद्दलही चर्चा केली. ब्रार म्हणाला की, डल्ला आणि सुखदूल सिंग गिल या जोडीने पंजाबमधील अनेक तरुणांचे ब्रेनवॉशिंग केले आणि त्यांना ब्लॅकमेल केले. ब्रारने 2021-22 मधील एका घटनेचा उल्लेख केला, जेव्हा त्याच्या मूळ जिल्ह्यातील (मोगा) एका तरुणाचा ‘स्नॅपचॅट’वर ‘दल्ला’शी संपर्क आला. “अर्श दल्लाने त्या तरुणाला सांगितले की त्याला ‘प्रोटीन पावडर’ असलेले एक पार्सल मिळेल आणि ते फरीदकोट तुरुंगातील एका व्यक्तीला सोपवण्यास सांगितले,” असे ब्रार पम्माला सांगतो. “त्याने त्या तरुणाला व्हिडिओ कॉलवर ते बॉक्स उघडायला सांगितले आणि दल्लाने त्या कॉलचे स्क्रीनशॉट्स घेतले. जेव्हा त्या तरुणाला समजले, की पॅकेजमध्ये प्रोटीन नसून ‘ग्रेनेड’ (बॉम्ब) आहे आणि त्याने या योजनेला विरोध केला, तेव्हा दल्लाने त्याला ब्लॅकमेल करण्यास सुरुवात केली; तसेच त्याने त्या तरुणाचा उल्लेख त्या भागातील ‘सीआयए’ प्रभारी असा केला,” असे ब्रार म्हणतो.
ब्रारच्या म्हणण्यानुसार, त्या तरुणाचा वापर वर्षभर अनेक बेकायदेशीर कामांसाठी केला गेला; अखेरीस पोलिसांकडून त्याला अटक करण्यात आली आणि तो अजूनही तुरुंगात आहे. “हे लोक समाजाचे हुतात्मे ठरू शकत नाहीत,” असे ब्रार पम्माला म्हणतो. “निज्जर पंजाब आणि काश्मीरमध्ये किती प्रमाणात अमली पदार्थ आणि शस्त्रे-दारूगोळा पाठवत होता, याची खात्री करा. माझा धाकटा भाऊ बेकायदेशीर कारवायांमध्ये सामील होता, हे मी मान्य करतो. पण त्याने कोणाचीही हत्या केली नाही किंवा कोणालाही इजा पोहोचवली नाही,” असे ब्रार पम्माला सांगतो. त्याचा हा धाकटा भाऊ गुरलाल ब्रार 2020 मध्ये चंदीगडमध्ये मारला गेला होता. ब्रार पुढे सांगतो की, तो ऑगस्ट 2017 मध्ये कॅनडाला गेला होता आणि ऑक्टोबर 2020 पर्यंत त्याने कोणताही गुन्हा केला नाही.
“एका टोळीचा भाग असूनही, इथे उदरनिर्वाहासाठी मी फरशी पुसण्याचे काम केले आहे. मी कोणत्याही गुन्ह्यात किंवा खंडणीच्या प्रकरणात सामील होतो, असे कोणीही म्हणू शकत नाही. पण जेव्हा कोणी माझ्या भावाची हत्या करते, तेव्हा संतापाने रक्त उसळते; अशा वेळी सारासार विचार करण्याची क्षमता उरत नाही आणि माझ्या शत्रूंना आश्रय देणाऱ्यांना जीवे मारावेसे वाटते,” असे ब्रार म्हणतो.

Recent Comments