नवी दिल्ली: जुन्या वाहनांमध्ये ई- 20 इथेनॉल-मिश्रित पेट्रोलच्या वापराबाबत सुरू असलेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर, आम आदमी पक्षाचे राष्ट्रीय संयोजक आणि दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी बुधवारी 29 वाहन उत्पादक कंपन्यांना पत्र लिहिले. 2023 पूर्वी उत्पादित केलेल्या वाहनांसाठी या इंधनाच्या उपयुक्ततेबाबत कंपन्यांनी घेतलेल्या परस्परविरोधी भूमिकांवर त्यांनी लेखी स्पष्टीकरण मागितले आहे.
बुधवारी दुपारी येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत केजरीवाल म्हणाले की, कंपन्यांच्या प्रतिनिधींनी सार्वजनिकरीत्या असे म्हटले होते की या इंधनामुळे इंजिनचे नुकसान होणार नाही, तर दुसरीकडे वाहनांच्या ‘ओनर मॅन्युअल’मध्ये (वाहन वापरकर्ता मार्गदर्शिकेत) मात्र वेगळा सल्ला देण्यात आला आहे. त्यामुळे, जुन्या वाहनांचे मालक ई- 20 पेट्रोल सुरक्षितपणे वापरू शकतात का, यावर सात दिवसांत स्पष्टीकरण देण्यास कंपन्यांना सांगण्यात आले आहे. त्यांनी मारुती सुझुकी, टोयोटा किर्लोस्कर आणि हिरो मोटोकॉर्प यांना स्वतंत्र पत्रे लिहिली आहेत; या कंपन्यांच्या प्रतिनिधींनी 4 जुलै रोजी सरकारी पत्रकार परिषदेत सांगितले होते की, जुन्या वाहनांमध्ये ई- 20 पेट्रोल वापरल्यास इंजिनचे नुकसान होत नाही आणि इंधन कार्यक्षमतेत (मायलेजमध्ये) केवळ किरकोळ घट होते.
“टोयोटा किर्लोस्कर, मारुती आणि हिरो या तीन कंपन्यांना हे पत्र लिहिले आहे. पत्रात नमूद केले आहे की, 4 तारखेच्या सरकारी पत्रकार परिषदेत तुम्ही म्हणाला होतात, की जुन्या वाहनांमध्ये ई-20 वापरता येते, मायलेजमध्ये 4-5 टक्क्यांनी थोडी घट होते, पण वाहनाचे नुकसान होत नाही. मात्र, तुमच्या ‘ओनर मॅन्युअल’मध्ये असे म्हटले आहे की, कोणत्याही परिस्थितीत 2023 पूर्वीच्या वाहनांमध्ये 10 टक्क्यांपेक्षा जास्त इथेनॉल-मिश्रित पेट्रोल वापरू नये. त्यामुळे, तुमच्या या दोन भूमिकांमध्ये विसंगती आहे,” असे ते म्हणाले. केजरीवाल यांनी दावा केला की, 2023 पूर्वी उत्पादित वाहनांच्या ‘युजर मॅन्युअल’मध्ये 10 टक्क्यांपेक्षा जास्त इथेनॉल असलेल्या पेट्रोलचा वापर न करण्याचा सल्ला दिला आहे. “तुमचे प्रकाशित ‘ओनर मॅन्युअल’ – जे ग्राहक आणि कंपनी यांच्यातील कराराचा एक भाग आहे – एक गोष्ट सांगते, तर सरकारी पत्रकार परिषदेत तुमचे प्रतिनिधी पूर्णपणे वेगळी गोष्ट सांगतात. ही काही किरकोळ चूक किंवा तफावत नाही. म्हणूनच, मी त्यांना त्यांची वास्तविक भूमिका लेखी स्वरूपात सार्वजनिकरीत्या स्पष्ट करण्यास सांगितले आहे,” असे ते म्हणाले.
केजरीवाल यांच्या मते, लेखी उत्तरांमुळे जुन्या वाहनांसाठी ई-20 पेट्रोलच्या उपयुक्ततेबाबत कंपन्यांची अधिकृत भूमिका स्पष्ट होण्यास आणि ग्राहकांना परस्परविरोधी माहिती मिळाली होती का, हे ठरवण्यास मदत होईल. केजरीवाल यांनी नरेंद्र मोदी सरकारवर, ‘ई-10’ इंधनासाठी डिझाइन केलेल्या वाहनांमध्ये ‘ई- 20’ पेट्रोलच्या वापराचे समर्थन करण्यासाठी वाहन उत्पादकांवर दबाव आणल्याचा आरोप केल्यानंतर दुसऱ्याच दिवशी ही पत्रे पाठवण्यात आली. त्यांनी असा आरोप केला की, ‘ओनर्स मॅन्युअल’मध्ये (वाहन मालकांच्या मार्गदर्शक पुस्तिकेत) 10 टक्क्यांहून अधिक इथेनॉल असलेले पेट्रोल वापरू नये असा इशारा दिलेला असतानाही, केंद्र सरकारने उत्पादकांना असे जाहीर करण्यास सांगितले होते, की ‘ई-20’ इंधनामुळे जुन्या वाहनांचे नुकसान होणार नाही. देशभरात ‘ई-20’ इंधनाचा वापर सुरू केल्यामुळे वाहनांचे नुकसान झाल्यास ग्राहकांना त्याची भरपाई कोण देईल, याबद्दल स्पष्टीकरण मागण्यासाठी आपण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहिणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
केजरीवाल यांच्या या ताज्या आरोपांवर वाहन उत्पादक किंवा केंद्र सरकारकडून तत्काळ कोणतीही प्रतिक्रिया आली नाही.

Recent Comments