scorecardresearch
Friday, 23 October, 2026
घरदेशमणिपूरमध्ये दोन कुकी महिलांची गोळ्या झाडून हत्या

मणिपूरमध्ये दोन कुकी महिलांची गोळ्या झाडून हत्या

कुकी-झो कौन्सिलने सर्व कुकी-झो नागरी संस्थांना सूचित केले आहे की, नागा सशस्त्र गटांकडून राज्यात मारल्या गेलेल्या कोणत्याही कुकी-झो व्यक्तीवर पुढील सूचना मिळेपर्यंत दफनविधी केला जाऊ नये.

नवी दिल्ली: पोलिसांच्या माहितीनुसार, मंगळवारी मणिपूरच्या तामेंगलोंग जिल्ह्यात ‘अज्ञात बंदूकधाऱ्यांनी’ दोन कुकी महिलांची हत्या केली. तामेंगलोंग आणि नोनी जिल्ह्यांमध्ये नागा बंडखोरांनी कथितरीत्या चार कुकी नागरिकांची हत्या केल्यानंतर दोन दिवसांनी ही घटना घडली.

पोलिसांनी मृतांची ओळख फल्नेइचोंग ऊर्फ चोंगा सिथलौ (वय 78) आणि किमजालहिंग ऊर्फ किमनिओ सिंगसन (वय 28) अशी पटवली आहे. दुपारी 3 च्या सुमारास सितल्होू जळाऊ लाकडे गोळा करत असताना हल्लेखोरांनी तिच्यावर गोळीबार केला. नर्सिंगचा अभ्यासक्रम पूर्ण करून शेतीच्या कामात पालकांना मदत करण्यासाठी घरी परतत असताना सिंगसन हिचाही त्याच ठिकाणी मृत्यू झाला. त्यानंतर काही तासांनी, रात्री 10.30 च्या सुमारास, सशस्त्र बंडखोरांनी कांगपोकपी जिल्ह्यातील चावांगकिनींग नागा गावावर हल्ला केला; यात किमान दोन घरे जाळण्यात आली आणि सुरक्षा दलांशी त्यांची चकमक झाली.

यापूर्वी, 27 ऑगस्ट रोजी, कुकी-बहुल कांगपोकपी जिल्ह्यात कुकी सशस्त्र गटांनी कथितरीत्या चार नागा नागरिकांची हत्या केली होती. मंगळवारच्या हल्ल्याचा निषेध करताना ‘कुकी-झो कौन्सिल’ने म्हटले की, कुकी-झो नागरिकांच्या वारंवार होणाऱ्या हत्यांचे स्वरूप आता ‘अस्वीकारार्ह आणि चिंताजनक’ बनले आहे आणि या घटनांकडे केवळ  ‘स्वतंत्र घटना’ म्हणून दुर्लक्ष करता येणार नाही.

“मणिपूरमधील कुकी-झो नागरिकांवर होणाऱ्या वाढत्या हल्ल्यांचा एक भाग म्हणून कुकी-झो कौन्सिल या हत्यांकडे पाहते; यात नॅशनल सोशलिस्ट कौन्सिल ऑफ नागालिम (इसक-मुइवा)] आणि झेलियांग्रोंग युनायटेड फ्रंट (कामसन) यांचा सहभाग असल्याचे समजते. नागरिकांना सातत्याने लक्ष्य करण्यामुळे कुकी-झो समुदायांमध्ये दहशत पसरवून त्यांना त्यांच्या वस्त्यांमधून हुसकावून लावण्याच्या प्रयत्नांबाबत गंभीर चिंता निर्माण झाली आहे,” असे कौन्सिलने एका निवेदनात म्हटले आहे. तसेच, असुरक्षित नागरिकांचे संरक्षण करावे, गुन्हेगारांना शिक्षा मिळवून द्यावी आणि नागरिकांवर हल्ले करणाऱ्या सशस्त्र गटांविरुद्ध कठोर कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणीही त्यांनी राज्य आणि केंद्र सरकारकडे केली.

निषेध म्हणून, कुकी-झो कौन्सिलने सर्व कुकी-झो नागरी समाज संघटनांना कळवले की, मणिपूरमध्ये नागा सशस्त्र गटांकडून मारल्या गेलेल्या कोणत्याही कुकी-झो व्यक्तीवर पुढील सूचना मिळेपर्यंत दफनविधी केला जाणार नाही. पुढील आदेश येईपर्यंत अशा प्रत्येक बळीचे पार्थिव जवळच्या उपलब्ध कोल्ड-स्टोरेज सुविधेत जतन करून ठेवले जाईल, असेही त्यांनी सांगितले.

संबंधित लेख

चुकवू नका

Recent Comments