scorecardresearch
Wednesday, 19 August, 2026
घरदेशराममंदिर ट्रस्टकडून मुख्य कार्यकारी अधिकारी पदाच्या भरतीची घोषणा

राममंदिर ट्रस्टकडून मुख्य कार्यकारी अधिकारी पदाच्या भरतीची घोषणा

अयोध्येतील राममंदिर ट्रस्ट 'मुख्य कार्यकारी अधिकारी' या पदासाठी भरती करत आहे आणि हे पद 50 ते 70 वयोगटातील हिंदू व्यक्तींसाठी खुले आहे. 'श्री राम जन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्ट'ने 'एक्स'वरील (पूर्वीचे ट्विटर) एका पोस्टद्वारे या पदासाठी भरतीची घोषणा केली आहे.

नवी दिल्ली: अयोध्येतील राममंदिर ट्रस्ट ‘मुख्य कार्यकारी अधिकारी’ या पदासाठी भरती करत आहे आणि हे पद 50 ते 70 वयोगटातील हिंदू व्यक्तींसाठी खुले आहे. ‘श्री राम जन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्ट’ने ‘एक्स’वरील (पूर्वीचे ट्विटर) एका पोस्टद्वारे या पदासाठी भरतीची घोषणा केली आहे. यासाठी व्यवस्थापकीय पदांवर किमान 20 वर्षांचा अनुभव असलेल्या उमेदवाराची आवश्यकता आहे. सीईओ हे ट्रस्टच्या सरचिटणीसांना अहवाल देतील आणि त्यांच्याकडे मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी असणे आवश्यक आहे.

मुख्य प्रशासकीय अधिकारी (सीएओ) म्हणून अनुभव असलेल्या किंवा मंदिर अथवा ‘हिंदू धार्मिक संस्थे’च्या व्यवस्थापनात सहभागी असलेल्या उमेदवारांना प्राधान्य दिले जाईल, असेही त्यात नमूद करण्यात आले आहे. पोस्टनुसार, ‘उमेदवार हा धर्माचे पालन करणारा हिंदू असावा आणि वैष्णव परंपरेतील रामभक्त असणे इष्ट मानले जाईल’.

राममंदिराला मिळालेल्या देणगीच्या कथित चोरीची चौकशी करण्याची मागणी करणाऱ्या याचिकांवर सर्वोच्च न्यायालयात सोमवारी सुनावणी झाली, त्याच पार्श्वभूमीवर ही भरती प्रक्रिया सुरू झाली आहे. विरोधी पक्षाच्या नेत्यांनी मंदिराच्या देणगी निधीत अफरातफर झाल्याचा आरोप केल्यानंतर या याचिका दाखल करण्यात आल्या होत्या. यामध्ये ‘सेंट्रल ब्युरो ऑफ इन्व्हेस्टिगेशन’द्वारे चौकशी करण्याची आणि तपासादरम्यान इलेक्ट्रॉनिक पुरावे जतन व सुरक्षित ठेवण्यासाठी उपाययोजना करण्याची मागणी करण्यात आली आहे. राष्ट्रीय जनता दलाचे खासदार सुधाकर सिंह यांनीही ट्रस्टचा संपूर्ण आर्थिक तपशील — ज्यामध्ये परदेशी देणग्यांचाही समावेश आहे — सार्वजनिक करण्याबाबत याचिका दाखल केली आहे. जनतेच्या रोषानंतर, ट्रस्टने 6 जुलै रोजी सरचिटणीस चंपत राय आणि विश्वस्त अनिल मिश्रा यांचे राजीनामे स्वीकारले. भारतीय वन सेवेतील निवृत्त अधिकारी कृष्ण मोहन यांची ट्रस्टचे हंगामी सरचिटणीस म्हणून नियुक्ती करण्यात आली, तर सीईओची निवड करण्यासाठी तीन सदस्यांची समिती नेमण्यात आली आहे. संस्थेच्या ‘सर्व वैधानिक, प्रशासकीय आणि आर्थिक जबाबदाऱ्या पार पाडणे’ ही मुख्य जबाबदारी असेल. ट्रस्टच्या सर्व आर्थिक व्यवहारांमध्ये पारदर्शकता राखण्याची जबाबदारीही सीईओंची असेल.

शिवाय, पोस्टमध्ये नमूद केल्याप्रमाणे, नियुक्त सीईओला एक प्रभावी सुरक्षा व्यवस्था निर्माण करावी आणि ती कायम ठेवावी लागेल, तसेच ट्रस्ट आणि मंदिराची प्रतिष्ठा वाढवावी लागेल.

संबंधित लेख

चुकवू नका

Recent Comments