नवी दिल्ली: गेल्यावर्षी दिल्लीतील लाल किल्ल्याबाहेर झालेल्या स्फोटातील दोन मुख्य आरोपींनी भविष्यातील हल्ल्यांसाठी नवीन लक्ष्ये शोधण्याच्या उद्देशाने उत्तर प्रदेशातील लखनौमधील विधान सभा, बापू भवन आणि लोक भवन यांसारख्या प्रमुख सरकारी इमारतींची पाहणी केली होती, असा आरोप राष्ट्रीय तपास संस्थेने (एनआयए) आपल्या आरोपपत्रात केला आहे. लक्ष्य करण्यासाठी नवीन ठिकाणे शोधण्याचे काम डॉ. मुझम्मिल शकील गनी आणि त्यांची पत्नी डॉ. शाहीन सईद यांनी केले होते, अशी माहिती या संस्थेने राजधानीतील विशेष एनआयए न्यायालयात दिली.
‘लोक भवन’ येथे उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचे कार्यालय आहे. दुसरीकडे, ‘बापू भवन’मध्ये राज्य सरकारच्या अनेक विभागांची कार्यालये आहेत. तपासी यंत्रणेने असाही आरोप केला आहे की, या प्रकरणातील 13 आरोपींपैकी डॉ. उमर उन नबी (आत्मघातकी बॉम्बस्फोट घडवणारा आणि नंतर मारला गेलेला), गनी आणि सईद ही त्रिकुटे आपल्या दहशतवादी गटाचा (मॉड्युलचा) विस्तार करण्याच्या आणि विद्यार्थी व डॉक्टरांमधून नवीन सदस्यांची भरती करण्याच्या प्रयत्नात सतत होते. नबी व्यतिरिक्त, आरोपपत्रात नमूद केलेल्या व्यक्तींमध्ये अल-फलाह मेडिकल कॉलेजचे प्राध्यापक डॉ. मुझामिल शकील आणि त्यांची पत्नी डॉ. शाहीन सईद, शोपियान येथील धर्मगुरू मुफ्ती इरफान अहमद वागे आणि नूह येथील रहिवासी सोयब यांचा समावेश आहे. नबीला आश्रय दिल्याबद्दल सोयबला अटक करण्यात आली होती.
10 नोव्हेंबर 2025 रोजी लाल किल्ला मेट्रो स्टेशनजवळ स्फोटकांनी भरलेली जी कार स्फोटात उडाली, त्यात नबी होता. या गटाच्या सदस्यांनी अनेक नवीन सदस्यांची भरती केली होती आणि स्फोटके व रसायनांचा वापर करून प्रयोग केले होते, असे एनआयएच्या तपासात निष्पन्न झाले. तपासयंत्रणेच्या मते, या गटाचे सदस्य ‘अन्सार गझवत-उल-हिंद'(एजीयूएच) या संघटनेपासून प्रेरित होते आणि आता निष्क्रिय झालेल्या या संघटनेला पुन्हा सक्रिय करण्याच्या प्रयत्नात होते. “तपासातून असे समोर आले की, ए-1 (नबी) आणि ए-4 (गनी) हे त्यांच्या ‘एजीयूएच’च्या हंगामी गटाला बळकट करण्यासाठी संभाव्य व्यक्तींचे ब्रेनवॉशिंग करून त्यांना कट्टरपंथी बनवण्याच्या प्रयत्नात होते. ए-1, ए-4 आणि ए-6 (सईद) यांनी या उद्दिष्टाच्या पूर्ततेसाठी विद्यार्थी आणि सहकारी डॉक्टरांमधील संभाव्य व्यक्तींना लक्ष्य केले होते,” असे यंत्रणेने आरोपपत्रात म्हटले आहे.
एनआयएच्या म्हणण्यानुसार, याच उद्दिष्टाचा भाग म्हणून गनीने त्याच्या एका जवळच्या ओळखीच्या व्यक्तीला त्यांच्या ‘सिग्नल’ चॅट ग्रुपमध्ये सामील करून घेतले. “हरियाणातील धौज व्यतिरिक्त उत्तर प्रदेशातील लखनौपर्यंत एजीयूएचचा विस्तार करण्यासाठी त्याने (गनीने) त्या सदस्याची मदत घेतली. लखनौमध्ये, ए-4 (गनी) आणि ए-6 (सईद) यांनी त्या व्यक्तीसोबत मिळून भविष्यातील हल्ल्यांसाठी संभाव्य लक्ष्य म्हणून विधानसभा, बापू भवन आणि लोक भवन यांची पाहणी (रेकी) केली होती,” असा आरोपही यंत्रणेने केला आहे. तपासादरम्यान, गनीने लखनऊमध्ये कच्च्या मालाच्या उपलब्धतेबाबत चौकशी करण्यासाठी भेट दिलेल्या ठिकाणांची माहिती उघड केल्याची नोंद एजन्सीने केली आहे.
आपल्या तपासात, एजन्सीने या स्फोटात वापरलेले स्फोटक म्हणून ‘ट्रायएसीटोन ट्रायपेरऑक्साइड’ (टीएटीपी) ची ओळख पटवली होती. टीएटीपी हे अत्यंत संवेदनशील प्राथमिक स्फोटक असून, इतर रसायनांशी संयोग झाल्यास ते अधिक अस्थिर बनते. गनीने लखनौमध्ये टीएटीपी तयार करण्याचे प्रयोग करण्याचा प्रयत्न केला होता आणि त्यासाठी विविध दुकानांतून कच्चा माल मिळवण्याचा प्रयत्न केला होता, असा आरोप एजन्सीने केला आहे. “लखनौमध्ये असताना, त्यांनी टीएटीपी तयार करण्यासाठी ॲसीटोनसारखी व्यावसायिकरित्या उपलब्ध रसायने आणि इतर कच्च्या मालाचा शोध घेतला; याच उद्देशाने ‘ए-4’ ने लखनौमधील अनेक रासायनिक दुकानांमध्ये हायड्रोजन पेरऑक्साइड आणि ॲसीटोनच्या उपलब्धतेबाबत चौकशी केली,” असे एजन्सीने आरोपपत्रात म्हटले आहे.
फरीदाबादमधील अल फलाह युनिव्हर्सिटी येथील तळाप्रमाणेच लखनऊमध्ये ‘एजीयूएच’चा आणखी एक तात्पुरता तळ उभारण्याच्या उद्देशाने हे कृत्य करण्यात आले होते, असा आरोप एजन्सीने आरोपपत्रात केला आहे.
दिल्ली न्यायालयाने ‘भारतीय न्याय संहिता’ 2023 च्या कलम 103(1) (हत्या), 109(1) (हत्येचा प्रयत्न) आणि 61(2) (गुन्हेगारी कट) तसेच ‘बेकायदेशीर कृत्ये (प्रतिबंध) कायदा’ 1967 च्या कलम 16 व 18 (दहशतवादी कृत्य करणे आणि त्यामागील कट रचणे यांशी संबंधित गुन्हे) अंतर्गत दाखल करण्यात आलेल्या आरोपपत्राची दखल घेतली आहे. याव्यतिरिक्त, तपास यंत्रणेने ‘स्फोटक पदार्थ कायदा’ 1908 मधील तरतुदींचाही यात समावेश केला असून, हे प्रकरण आता ‘आरोपांवरील युक्तिवादाच्या’ टप्प्यावर आले आहे. या तपासादरम्यान अटक करण्यात आलेले सर्व आरोपी न्यायालयीन कोठडीत आहेत.

Recent Comments