scorecardresearch
Friday, 23 October, 2026
घरराजकारण‘अदानी हे आमच्यासाठी केवळ एक कंत्राटदार’ : प्रियांक खर्गे

‘अदानी हे आमच्यासाठी केवळ एक कंत्राटदार’ : प्रियांक खर्गे

शिवकुमार यांनी घेतलेल्या 'सौजन्य भेटी'वरून भाजपने टीकास्त्र सोडले आहे. "अदानींना विरोध करणाऱ्या राहुल गांधींची शिवकुमार यांनी परवानगी घेतली आहे का?" असा सवाल करत भाजपने या भेटीवरून काँग्रेसवर दुटप्पीपणाचा आरोप केला आहे.

बेंगळुरू: ‘गौतम अदानी हे आमच्यासाठी केवळ एक कंत्राटदार आहेत. काँग्रेसशासित कर्नाटकात या अब्जाधीश व्यावसायिकाला प्रकल्प मिळणे यामुळे त्यांच्याबद्दलच्या पक्षाच्या भूमिकेत कोणताही बदल होत नाही’, असे राज्याचे मंत्री प्रियांक खर्गे यांनी सोमवारी सांगितले. अदानी यांनी बेंगळुरूमध्ये मुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांची भेट घेतल्यानंतर दुसऱ्या दिवशी हे विधान करण्यात आले.

भाजपने याबाबत दुटप्पीपणाचा आरोप केला आहे. भाजपने काँग्रेसवर आरोप केला आहे की, एका बाजूला काँग्रेस अदानी यांना ‘क्रोनी कॅपिटलिझम’चा (आप्त-भांडवलशाहीचा) चेहरा म्हणून सादर करते, तर दुसऱ्या बाजूला त्यांच्या समूहाशी व्यवसायही करते. “आमच्यासाठी ते (अदानी) केवळ एक कंत्राटदार आहेत,” असे कर्नाटकचे गृहमंत्री प्रियांक खर्गे यांनी पत्रकारांना सांगितले. त्यांनी पुढे स्पष्ट केले की, ‘अदानी समूहाला एखादा प्रकल्प मिळणे म्हणजे देशातील सर्वांत श्रीमंत व्यक्तींपैकी एक असलेल्या अदानींबद्दल काँग्रेस पक्षाच्या दृष्टिकोनात काही बदल होतो, असे नाही’. “केंद्र सरकार हे अदानी आणि अंबानींचे गुलाम आहे, असे आमचे मत आहे,” असेही खर्गे म्हणाले.

बेंगळुरू येथील मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी अदानी आणि शिवकुमार यांची संक्षिप्त भेट झाल्यानंतर दुसऱ्याच दिवशी राज्याच्या गृहमंत्र्यांची ही विधाने आली आहेत. ‘द प्रिंट’ला मिळालेल्या माहितीनुसार, अदानी ‘आर्ट ऑफ लिव्हिंग सेंटर’ला भेट देण्यासाठी बेंगळुरूमध्ये आले होते आणि त्यांनी शिवकुमार यांच्याशी भेटीबाबत विचारणा केली होती. “ही केवळ एक सौजन्य भेट होती; कारण अदानींकडे वेळ होता आणि मुख्यमंत्री घरी होते,” अशी माहिती या घडामोडींची कल्पना असलेल्या एका व्यक्तीने नाव न सांगण्याच्या अटीवर दिली. हेब्बल ते सेंट्रल सिल्क बोर्ड अशा 17 किमीच्या प्रकल्पासाठी गौतम अदानी यांच्या नेतृत्वाखालील बहुराष्ट्रीय समूहाने सर्वांत कमी बोली लावली आहे. ही बोली 20 हजार कोटी रुपयांपेक्षा जास्त आहे, जी राज्याच्या 17 हजार 698 कोटी रुपयांच्या अंदाजित खर्चापेक्षा बरीच जास्त आहे.

शिवकुमार आणि अदानी यांच्यातील भेटीवरून हे स्पष्ट होते की, भाजपशी कथित जवळीक असल्याच्या कारणावरून विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी या उद्योगपतीवर टीका केली असली, तरीही काँग्रेसशासित राज्यांनी मोठ्या पायाभूत सुविधांच्या प्रकल्पांसाठी अदानी समूहाच्या बोलींचा विचार करणे थांबवलेले नाही. भारतीय जनता पक्षाने काँग्रेसवर दुटप्पीपणाचा आरोप केला; “एका बाजूला गुंतवणुकीसाठी या उद्योगपतीला जवळ करायचे आणि दुसऱ्या बाजूला राजकीय बदनामीसाठी त्यांचा वापर करायचा”, असे भाजपने म्हटले.

“काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी देशातील नामांकित उद्योजक अदानी यांना भाजपचा एजंट म्हटले होते. इतर काँग्रेस नेतेही सार्वजनिक व्यासपीठांवर असाच युक्तिवाद करत होते. आता, मुख्यमंत्री डी.के. शिवकुमार यांनी अदानी समूहाचे स्वागत करण्यासाठी ‘रेड कार्पेट’ अंथरले आहे. असे करण्यासाठी डी.के. शिवकुमार यांनी अदानींना विरोध करणाऱ्या राहुल गांधींची परवानगी घेतली आहे का? हा काँग्रेसचा दुटप्पीपणा नाही का?” असा सवाल कर्नाटक विधानसभेतील विरोधी पक्षनेते आर. अशोक यांनी ‘एक्स’वर उपस्थित केला.

यावर प्रत्युत्तर देताना खर्गे म्हणाले की, अदानी हे इतर कोणत्याही कंत्राटदारासारखेच आहेत आणि त्यांनी मुख्यमंत्र्यांची केवळ सौजन्य भेट घेतली होती, त्यापलीकडे काहीही नाही. बोगदा प्रकल्पाला (टनेल प्रोजेक्ट) तीव्र विरोध करणाऱ्या भाजपवरही त्यांनी टीका केली; या वादग्रस्त प्रकल्पाचे कंत्राट आता अदानींना मिळण्याची शक्यता असल्याने, भाजपची यावर नेमकी काय भूमिका आहे, असा सवाल त्यांनी उपस्थित केला. “आता भाजप काय म्हणते? अदानींना कंत्राट मिळाल्यामुळे हा बोगदा रस्ता प्रकल्प उभारला जावा की नाही? त्यांच्याच नातेवाईकाला हे कंत्राट मिळाले आहे,” असे खर्गे म्हणाले.

संबंधित लेख

चुकवू नका

Recent Comments