scorecardresearch
Monday, 17 August, 2026
घरराजकारणबांकीपूर विधानसभा पोटनिवडणुकीत प्रशांत किशोर यांची सरशी

बांकीपूर विधानसभा पोटनिवडणुकीत प्रशांत किशोर यांची सरशी

प्रशांत किशोर यांनी भाजपच्या नीरज कुमार यांचा 18 हजार 953 मतांनी पराभव केला. नितीन नबिन यांची राज्यसभेवर निवड झाल्यामुळे बिहारमधील या जागेसाठी पोटनिवडणूक घ्यावी लागली होती.

नवी दिल्ली: ‘जनसुराज पक्षा’चे (जेएसपी) संस्थापक प्रशांत किशोर यांनी बांकीपूर विधानसभा पोटनिवडणुकीतून आपल्या राजकीय कारकिर्दीची सुरुवात करताना भाजपचे उमेदवार नीरज कुमार सिन्हा यांचा सुमारे 19 हजार मतांनी पराभव केला.

निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, किशोर यांना 63 हजार 203 मते मिळाली, तर या चुरशीच्या लढतीत सिन्हा यांना 44 हजार 205 मते मिळाली. ‘राजद’च्या रेखा गुप्ता तिसऱ्या स्थानावर असून त्या बऱ्याच मागे आहेत.

संपूर्ण पाटण्यात जेएसपी कार्यकर्त्यांनी जल्लोष केला. किशोर यांनी बांकीपूरच्या मतदारांचे आभार मानले आणि सांगितले की, विजय आणि पराभव हे होतच असतात. “मी जनतेचा ऋणी आहे. ज्यांनी ‘जन सुराज’ आणि माझ्यावर विश्वास व निष्ठा दाखवली, त्या सर्वांचे मी मनापासून आभार मानतो. ज्यांनी आमच्या राजकीय विरोधकांना मतदान केले, त्यांचेही मी आभार मानू इच्छितो आणि त्यांना खात्री देऊ इच्छितो की निवडणुकीनंतर, ज्यांनी आम्हाला मतदान केले आणि ज्यांनी केले नाही, ते सर्वजण आमचेच आहेत,” असे त्यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले. एप्रिलमध्ये राज्यसभेवर निवडून आल्यानंतर आमदारकीचा राजीनामा दिल्याने भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन यांची बांकीपूरची जागा रिक्त झाली होती. या जागेसाठी 30 जुलै रोजी मतदान झाले. या जागेसाठीच्या प्रक्रियेत काही नाट्यमय घडामोडीही पाहायला मिळाल्या; बांकीपूरमधून अभिषेक बंटी यांना उमेदवारी जाहीर केल्यानंतर अवघ्या 24 तासांतच भाजपने पोटनिवडणुकीसाठी त्यांच्या जागी नीरज कुमार सिन्हा यांना उमेदवारी दिली.

मतदारांवर दबाव टाकण्यासाठी आणि स्थानिक कार्यकर्त्यांना बेकायदेशीरपणे ताब्यात घेण्यासाठी पोलीस अधिकारांचा गैरवापर केल्याचा आरोप किशोर यांनी पाटण्याचे वरिष्ठ पोलीस अधीक्षक कार्तिकेय कुमार शर्मा यांच्यावर केला. पत्रकार परिषदेत बोलताना किशोर यांनी सांगितले, की अनेक लोकांच्या घरांवर छापेही टाकण्यात आले होते, व त्यांच्या पक्षाने हा मुद्दा निवडणूक आयोगाकडे मांडला आहे.

भाजपसाठी बांकीपूरची लढत प्रतिष्ठेची आहे. ‘हाय-प्रोफाइल’ मानली जाणारी ही जागा भाजपचा बालेकिल्ला आहे. यापूर्वी हा मतदारसंघ ‘पाटणा पश्चिम’ विधानसभा मतदारसंघ म्हणून ओळखला जात असे. नबीन यांचे वडील किशोर प्रसाद सिन्हा यांनी 1995 पासून ते 2006 मध्ये त्यांच्या निधनापर्यंत अनेकदा ही जागा जिंकली होती. या मतदारसंघातील 25 टक्क्यांहून अधिक मतदार ‘कायस्थ’ समाजातील आहेत, ज्या समाजाचे नबीन स्वतः प्रतिनिधित्व करतात. तसेच, या मतदारसंघात ‘भूमिहार’ या उच्चवर्णीय समाजाचेही लक्षणीय प्रमाण आहे. वडिलांच्या निधनानंतर नबीन यांनी निवडणूक राजकारणात प्रवेश केला आणि 2006 च्या पोटनिवडणुकीत ही जागा पहिल्यांदा जिंकली. गेल्यावर्षी झालेल्या विधानसभा निवडणुकीत त्यांनी सलग पाचव्यांदा विजय मिळवला आणि ‘राजद’च्या उमेदवाराचा जवळपास 50 हजार मतांच्या फरकाने पराभव केला.

गेल्या वर्षीच्या बिहार निवडणुकीत नबीन यांनी सलग पाचव्यांदा ही जागा जिंकली होती आणि ‘राजद’ उमेदवाराचा जवळपास 50 हजार मतांच्या फरकाने पराभव केला होता. विजयाचे अंतर वाढवण्याचे उद्दिष्ट भाजपने ठेवले होते; त्यासाठी पक्षाध्यक्षांनी मतदारसंघात अनेक बैठका घेतल्या आणि जोरदार प्रचार केला. ‘जन सुराज पदयात्रा’ या नावाने संपूर्ण बिहारभर दोन वर्षे चाललेल्या पदयात्रेनंतर, किशोर यांनी 2 ऑक्टोबर 2024 रोजी ‘जन सुराज पक्ष’ स्थापन केला. 2021 मध्ये राजकीय सल्लागार म्हणून आपली कारकीर्द थांबवल्यानंतर त्यांनी हे पाऊल उचलले. जन सुराज पक्षाच्या एका पदाधिकाऱ्याने सांगितले की, या संपूर्ण मोहिमेचे व्यवस्थापन व्यावसायिकांकडून केले गेले. पक्षाच्या प्रमुख कार्यकर्त्यांवर प्रत्येकी चार मतदान केंद्रांची (बूथची) जबाबदारी सोपवण्यात आली होती आणि त्यांना त्यासंबंधीचे अहवाल सादर करावे लागत असत. किशोर यांच्यासोबत दररोज रात्री आढावा बैठक घेतली जात असे, असेही त्यांनी सांगितले. “यासाठी बूथ समित्याही स्थापन करण्यात आल्या होत्या आणि त्यातील काही सदस्य हे त्या-त्या भागातील स्थानिक प्रतिनिधी असतील याची काळजी घेतली गेली. प्रत्येक गोष्टीचे अत्यंत बारकाईने नियोजन करण्यात आले होते आणि आम्हाला ही जागा जिंकण्याची आशा आहे.” ते म्हणाले.

गेल्यावर्षीच्या बिहार निवडणुकीत किशोर यांनी 243 पैकी 238 जागांवर उमेदवार उभे केले होते, परंतु त्यांनी स्वतः निवडणूक लढवली नाही. या निवडणुकीत पक्षाला एकही जागा मिळाली नाही आणि त्यांना केवळ 3.4 टक्के मते मिळाली.

संबंधित लेख

चुकवू नका

Recent Comments