scorecardresearch
Tuesday, 18 August, 2026
घरराजकारण'लुंगीवाला' या टिपण्णीवरून राज्यसभेत गदारोळ

‘लुंगीवाला’ या टिपण्णीवरून राज्यसभेत गदारोळ

बुधवारी सकाळी राज्यसभेत गदारोळ झाला. सीपीआय(एम)चे खासदार जॉन ब्रिटास यांनी भाजप खासदार सुष्मिता देव यांच्यावर आरोप केला की, त्यांनी ब्रिटास यांचा 'लुंगीवाला' असा उल्लेख करून त्यांच्याबद्दल अपमानास्पद टिप्पणी केली. सेन यांच्या कथित टिप्पणीनंतर सीपीएमने प्रत्युत्तर दिले आणि याला दक्षिण भारतीयांचा अपमान असल्याचे म्हटले.

नवी दिल्ली: बुधवारी सकाळी राज्यसभेत गदारोळ झाला. सीपीआय(एम)चे खासदार जॉन ब्रिटास यांनी भाजप खासदार सुष्मिता देव यांच्यावर आरोप केला की, त्यांनी ब्रिटास यांचा ‘लुंगीवाला’ असा उल्लेख करून त्यांच्याबद्दल अपमानास्पद टिप्पणी केली. सेन यांच्या कथित टिप्पणीनंतर सीपीएमने प्रत्युत्तर दिले आणि याला दक्षिण भारतीयांचा अपमान असल्याचे म्हटले. ब्रिटास यांनी सभागृहात देव यांचे नाव घेतले नाही, परंतु प्रसारमाध्यमांशी बोलताना त्यांनी त्यांचा उल्लेख केला.

राज्यसभेत केरळचे प्रतिनिधित्व करणारे ब्रिटास यांनी सांगितले की, त्यांनी सुष्मिता देव यांच्या विरोधात विशेषाधिकार हक्कभंग प्रस्ताव मांडला आहे. ही कथित घटना 1 ऑगस्ट रोजी राज्यसभेत ‘कर आणि इतर कायदे (सुधारणा) विधेयक, 2026’ वरील चर्चेदरम्यान घडली. राज्यसभेत हा मुद्दा उपस्थित करण्यात आला आणि अध्यक्षांनी स्पष्ट केले, की कोणाचाही अनादर होऊ नये. ब्रिटास यांच्याबद्दल सुष्मिता देव यांनी केलेल्या कथित अवमानकारक टिप्पणीवरून झालेल्या गदारोळामुळे राज्यसभेचे कामकाज दुपारी 2 वाजेपर्यंत तहकूब करण्यात आले.

“महोदय, अत्यंत जड अंतःकरणाने मी हा विषय मांडत आहे, कारण हा या सभागृहाची प्रतिष्ठा आणि सन्मानाचा प्रश्न आहे. आणि हा दोन्ही पक्षांशी संबंधित (द्विपक्षीय) मुद्दा आहे. सुरुवातीलाच मला हे सांगू द्या, की मी एक अभिमानी भारतीय, दक्षिण भारतीय आणि अर्थातच एक अभिमानी मल्याळी आहे, महोदय. मल्याळी असण्याचा प्रत्येक क्षण मी जपतो; आपली भाषा, संस्कृती, खाद्यसंस्कृती आणि अर्थातच आपली राज्यघटना आपल्या विविधतेचा गौरव करते,” असे ब्रिटास यांनी राज्यसभेत सांगितले.

“महोदय, जर तुम्ही मला विचारले की जेव्हा मी हे सभागृह सोडेन – जे कदाचित लवकरच घडू शकेल – तेव्हा या सभागृहातून मी काय सोबत घेऊन जाईन? तर मी नक्कीच सांगेन की, सर्वांत महत्त्वाची गोष्ट म्हणजे ही अद्भुत विविधता, जी या राष्ट्राच्या एकतेला एका अद्वितीय प्रकारे टिकवून ठेवते. तीच माझी शिदोरी असेल. महोदय, काही दिवसांपूर्वी, ज्या सदस्यांचा मी खूप आदर करतो, त्या सदस्यांनी मी एका ठरावाचा (स्टॅच्युट ऑफ रिझोल्यूशन) प्रस्तावक म्हणून माझे कर्तव्य बजावत असताना त्या कामात व्यत्यय आणला. शाब्दिक वाद ठीक आहे, आपण एकमेकांशी वाद-संवाद करतोच. पण त्यांनी मला वारंवार ‘लुंगीवाला, लुंगीवाला’ असे संबोधले,” असेही त्यांनी नमूद केले.

ब्रिटास यांनी प्रसारमाध्यमांना सांगितले की, त्यांनी सुष्मिता देव यांच्या विरोधात विशेषाधिकार भंगाची नोटीस दिली आहे. “काही दिवसांपूर्वी, मी सभागृहात बोलत असताना त्यांनी माझ्याबद्दल ‘लुंगीवाला’ अशी अवमानकारक टिप्पणी केली. मी धोतर परिधान केले होते आणि मला मल्याळी असल्याचा, तसेच दक्षिण भारतीय असल्याचा अभिमान आहे. आणि या सर्व गोष्टी आपल्या संस्कृतीचा भाग आहेत. परंतु अशा प्रकारच्या रूढ प्रथा जेव्हा अवमानकारक पद्धतीने वापरल्या जातात, तेव्हा ते स्वीकारार्ह नसते,” असे त्यांनी प्रसारमाध्यमांना सांगितले. “आणि मला वाटते, की सभागृहाने यावर भूमिका घेतली पाहिजे, कारण आम्ही त्यांच्या विरोधात विशेषाधिकार भंगाची नोटीस दिली आहे. अर्थात, त्यांच्याबद्दल माझ्या मनात कोणताही द्वेष नाही,” असेही त्यांनी पुढे सांगितले. मात्र, राज्यसभेत बोलताना केंद्रीय संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजिजू यांनी सांगितले की, ब्रिटास नेमका कशाचा उल्लेख करत होते हे त्यांना ऐकू आले नाही.

“महोदय, या प्रतिष्ठित सभागृहात प्रत्येक सन्माननीय सदस्य समान आहे; आपण सर्वजण समान भारतीय आहोत. होय महोदय, जर काही आक्षेपार्ह असेल किंवा जे देशाच्या चारित्र्याला किंवा सभागृहाच्या प्रतिष्ठेला साजेसे नसेल, तर मी सन्माननीय सभापतींना विनंती करेन, की त्यांनी त्या सदस्याला आपल्या दालनात बोलावून काय घडले ते ऐकून घ्यावे. कारण, सन्माननीय सदस्य जे काही सांगत आहेत, त्याचा मी प्रत्यक्ष साक्षीदार नाही,” असे रिजिजू म्हणाले. सुष्मिता देव यांच्या टिप्पणीचा संदर्भ देत ब्रिटास यांनी प्रसारमाध्यमांना सांगितले: “हे आपपरभावाच्या प्रक्रियेचेच एक संक्षिप्त रूप आहे. त्यांनी केलेली टिप्पणी एका खासदाराला शोभणारी नाही आणि मला विश्वास आहे, की सन्माननीय सभापती व विशेषाधिकार समिती याची दखल घेतील.” सभापतींनी आपल्या निर्णयात असे नमूद केले की, सर्व सदस्यांनी आपल्या सहकारी सदस्यांच्या भावना दुखावल्या जाणार नाहीत याची काळजी घेतली पाहिजे.

“सन्माननीय सदस्यांनो, सभागृहात इतर सदस्यांच्या भाषणात व्यत्यय आणताना असभ्य आणि अशोभनीय टिप्पणी केल्याच्या काही घटना माझ्या निदर्शनास आल्या आहेत. आपली संस्कृती अद्वितीय आहे. सहकाऱ्यांच्या भावना दुखावल्या जाणार नाहीत याची काळजी घ्यावी, असा सल्ला मी सन्माननीय सदस्यांना देईन,” असे सभापती म्हणाले.

या वादावर प्रतिक्रिया देताना काँग्रेसचे खासदार ख्रिस्तोफर तिलक यांनी ब्रिटास यांचे समर्थन केले आणि म्हटले: “हा दक्षिण भारतीय संस्कृतीचा भाजपद्वारे केलेला अपमान होता. हा केवळ पेहरावाचा प्रश्न नाही. काल, राज्यसभेतील ज्येष्ठ खासदार जॉन ब्रिटास आपला प्रश्न मांडत असताना, पश्चिम बंगालमधील एका सदस्याने त्यांना अपमानजनकपणे ‘लुंगीवाला, लुंगीवाला’ असे संबोधले. इतकी विविधता असलेल्या देशात ही अत्यंत दुर्दैवी बाब आहे. यावरून बिगर-हिंदी भाषिक क्षेत्राबाबत भाजपचा दृष्टिकोन स्पष्टपणे दिसून येतो.”

संबंधित लेख

चुकवू नका

Recent Comments