लखनौ: बहुजन समाज पक्षाच्या प्रमुख मायावती यांनी त्यांचे पुतणे आकाश आनंद यांची पक्षातून हकालपट्टी केली आहे. ‘एक्स’वरील एका पोस्टमध्ये त्यांनी याचे कारण देताना म्हटले की, आकाश यांनी पक्षापेक्षा आपले सासरे अशोक सिद्धार्थ यांना अधिक महत्त्व दिले आणि सिद्धार्थ यांच्याशी संबंधित मायावतींची एक पोस्ट त्यांनी ‘रीपोस्ट’ केली नाही.
मायावती यांनी ऑगस्टमध्येच माजी राज्यसभा खासदार सिद्धार्थ यांची बसपमधून हकालपट्टी केली होती. बसपच्या एका वरिष्ठ पदाधिकाऱ्याने ‘द प्रिंट’ला सांगितले, “गेल्या दोन वर्षांपासून पक्ष कौटुंबिक नाट्यात अडकला आहे. ‘बहनजी’ (मायावती) आकाश यांना पक्षात घेतात आणि नंतर त्यांना पदावरून दूर करतात किंवा शिक्षा करतात. त्या आता त्यांना पुन्हा पक्षात घेणार नाहीत, याची काहीच शाश्वती नाही.
“निवडणुकीला अवघे काही महिने उरले असतानाही आपण अजूनही या कौटुंबिक राजकारणातच अडकलो आहोत. अशा परिस्थितीत आपण भाजप आणि समाजवादी पक्षाचा सामना कसा करणार?” असेही ते म्हणाले. 3 सप्टेंबर रोजी मायावतींनी आकाश यांना बसपच्या राष्ट्रीय समन्वयकपदावरून हटवल्यानंतर आठवडाभरातच त्यांच्यावर ही कारवाई करण्यात आली. आता त्यांनी त्यांचे बसपचे प्राथमिक सदस्यत्वही रद्द केले असून, पक्षाशी असलेला त्यांचा संबंध पूर्णपणे तोडून टाकला आहे.
गेल्या दोन वर्षांत मायावतींनी आकाश यांच्यावर केलेली ही तिसरी मोठी कारवाई आहे. यापूर्वी मे 2024 आणि मार्च 2025 मध्ये त्यांनी त्यांना पक्षातील महत्त्वाच्या जबाबदाऱ्यांतून मुक्त केले होते. मात्र, नंतर आकाश यांना पक्षात पुन्हा सामावून घेण्यात आले आणि राष्ट्रीय समन्वयक बनवण्यात आले. आपल्या निर्णयाचे स्पष्टीकरण देताना मायावतींनी गुरुवारी सांगितले की, सिद्धार्थ यांनी राजकारणातून निवृत्ती घेण्यास खूप उशीर केला. जर त्यांनी आधीच निवृत्ती घेतली असती, तर आकाश, बसप आणि व्यापक बहुजन चळवळीला वारंवार कठीण व प्रतिकूल परिस्थितीचा सामना करावा लागला नसता, असे त्या म्हणाल्या. ‘एक्स’वरील आपल्या पोस्ट्सना आकाशने दिलेल्या प्रतिसादाबद्दलही मायावतींनी नाराजी व्यक्त केली. त्या म्हणाल्या की, तो नियमितपणे त्यांच्या पोस्ट्स ‘रीपोस्ट’ करायचा, पण या आठवड्यात जेव्हा त्यांनी सिद्धार्थ यांच्याबद्दल पोस्ट केली, तेव्हा त्याने तसे केले नाही. मायावतींच्या मते, आकाश पक्षापेक्षा कौटुंबिक संबंधांना अधिक महत्त्व देत असल्याचे हे स्पष्ट संकेत होते. ‘दुहेरी मनस्थिती’ने काम करणारी व्यक्ती बसपाच्या हिताचे रक्षण कसे करू शकेल, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.
त्यांनी सिद्धार्थ यांच्या हेतूंवरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले; त्या म्हणाल्या की, जर त्यांना खरोखरच आकाशचे राजकीय भविष्य आणि बहुजन चळवळीची काळजी असती, तर त्यांनी खूप आधीच राजकारणातून निवृत्ती घ्यायला हवी होती. बसपा प्रमुख आता कार्यकर्त्यांना 2027 च्या उत्तरप्रदेश विधानसभा निवडणुकीची तयारी करण्यास आणि राजकीय विरोधकांच्या खेळींना प्रत्युत्तर देण्यास सांगत आहेत. ‘सर्वजन हिताय, सर्वजन सुखाय’ (सर्वांचे कल्याण आणि सुख) या तत्त्वाचे पालन करत पूर्ण बहुमताचे सरकार स्थापन करण्यासाठी काम करण्याचे आवाहन त्यांनी बसपा कार्यकर्त्यांना केले. बुधवारी मायावतींनी ‘एक्स’वर संकेत दिले होते की, जर अशोक सिद्धार्थ यांनी राजकारणातून निवृत्ती घेतली, तर त्यामुळे जावई आकाशचे राजकीय करिअर वाचण्यास मदत होऊ शकेल. त्या संध्याकाळी उशिरा सिद्धार्थ यांनी राजकारणातून निवृत्तीची घोषणा केली. परंतु, त्याचा आकाश यांना काहीही फायदा झाला नाही. बसपच्या एका सूत्राने ‘द प्रिंट’ला सांगितले की, सिद्धार्थ यांच्या ‘कौटुंबिक राजकारणा’मुळे मायावतींना खूप दुःख झाले आहे.
बसप प्रमुखांचे असे मानणे आहे की, सिद्धार्थ आणि आकाशच्या जवळच्या व्यक्ती पक्षाच्या आणि बहुजन चळवळीच्या व्यापक हितापेक्षा कौटुंबिक हिताला अधिक प्राधान्य देतात, असे त्या सूत्राने सांगितले.
ईशान आनंद हे नवे ‘राजकीय वारसदार’?
बसपच्या वरिष्ठ नेतृत्वामध्ये झालेल्या मोठ्या फेरबदलांच्या पार्श्वभूमीवर ही नवीन घडामोड समोर आली आहे. आकाश यांना ‘राष्ट्रीय समन्वयक’ पदावरून हटवल्यानंतर चार दिवसांनी, सोमवारी मायावतींनी त्यांचे धाकटे भाऊ ईशान आनंद यांची पक्षाचे ‘मुख्य क्षेत्र प्रभारी’ म्हणून नियुक्ती केली. 27 वर्षीय ईशान हे उत्तर प्रदेश आणि उत्तराखंड व्यतिरिक्त इतर राज्यांमधील पक्षाच्या संघटनात्मक कामाचा आढावा घेतील. बसपच्या पदाधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, ते या राज्यांमधील संघटनात्मक अहवाल त्यांचे वडील आणि बसपचे राष्ट्रीय उपाध्यक्ष आनंद कुमार यांच्याकडे सादर करतील. यापूर्वी ‘मुख्य राष्ट्रीय समन्वयक’ म्हणून आकाश ही जबाबदारी सांभाळत होते.
बसपच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले की, लखनौमध्ये झालेल्या पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीनंतर, ज्यामध्ये ईशानही उपस्थित होते, त्यांच्या वाढत्या भूमिकेबाबतच्या चर्चांना अधिक जोर आला. ईशान हे मायावतींचे नवे उत्तराधिकारी म्हणून समोर येऊ शकतात, असेही त्यांनी नमूद केले.

Recent Comments