scorecardresearch
Wednesday, 19 August, 2026
घरराजकारणनितीन नबीन यांच्या नेतृत्वाखाली भाजपचा नवा 65 सदस्यीय संघ निर्माण

नितीन नबीन यांच्या नेतृत्वाखाली भाजपचा नवा 65 सदस्यीय संघ निर्माण

'सातत्य आणि बदल' यांच्यात समतोल साधण्याच्या उद्देशाने तयार करण्यात आलेली भारतीय जनता पक्षाचा नवा संघ, संघटनात्मक अनुभवाचे महत्त्व मान्य करण्यासोबतच तरुण पिढीच्या भावनांचेही प्रतिनिधित्व करतो, असे पक्षाच्या नेत्यांचे म्हणणे आहे.

नवी दिल्ली: ‘सातत्य आणि बदल’ यांच्यात समतोल साधण्याच्या उद्देशाने तयार करण्यात आलेली भारतीय जनता पक्षाचा नवा संघ, संघटनात्मक अनुभवाचे महत्त्व मान्य करण्यासोबतच तरुण पिढीच्या भावनांचेही प्रतिनिधित्व करतो, असे पक्षाच्या नेत्यांचे म्हणणे आहे.

भाजपच्या माहितीनुसार, 65 सदस्यांच्या या संघाचे सरासरी वय 55 वर्षांच्या आसपास आहे. तथापि, यात 40 वर्षांखालील सहा सदस्य, 40 ते 49 वयोगटातील 15 सदस्य आणि 50-59 वयोगटातील 21 सदस्यांचा समावेश आहे. “यावरून असे दिसून येते, की पक्ष पूर्णपणे तरुण नेतृत्वाकडे वळत नाहीये, तर तरुण आणि अनुभवी नेते यांच्यात समतोल साधण्याचा प्रयत्न करत आहे. नवीन चेहऱ्यांना संधी देणे आणि त्याच वेळी अनुभवी नेत्यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांना पुरेसा आधार देणे, या दृष्टीनेही हे महत्त्वाचे आहे,” असे पक्षाच्या एका वरिष्ठ नेत्याने सांगितले. “नवीन संघामध्ये आम्ही सातत्य आणि बदल यांच्यात समतोल साधण्याचा प्रयत्न केला आहे. 2029 च्या निवडणुकांच्या गरजा आणि त्या अनुषंगाने पुढील निवडणुकीत मतदान करणाऱ्या तरुण पिढीपर्यंत पोहोचण्याची आवश्यकता लक्षात घेऊन ही टीम तयार करण्यात आली आहे,” असे भाजपच्या एका वरिष्ठ नेत्याने सांगितले.

पक्षाचे अध्यक्ष नितीन नबीन हे अवघे 46 वर्षांचे असल्याने, नवीन टीममध्येही त्याचे प्रतिबिंब उमटेल अशी अनेकांना अपेक्षा होती. त्याच वेळी, तरुणांच्या, विशेषतः ‘जनरेशन झेड’च्या आकांक्षा समजून घेण्यात अपयश आल्याबद्दल पक्षावर बरीच टीका झाली होती; हीच पिढी नवी दिल्लीतील जंतरमंतर येथील आंदोलनाच्या केंद्रस्थानी होती, जे आंदोलन नंतर देशभर पसरले होते. “पक्षाचे अध्यक्ष स्वतः ‘मिलेनियल’ पिढीतील असल्याने जास्तीत जास्त तरुण चेहरे असावेत असे वाटत होते. परंतु, त्याच वेळी अनेक चर्चांदरम्यान असेही अधोरेखित करण्यात आले की मार्गदर्शनासाठी अनुभवी नेत्यांचीही गरज असते. म्हणूनच नवीन संघामध्ये तरुण आणि अनुभवी या दोन्ही वयोगटातील व्यक्तींचा समावेश करण्यात आला आहे” असे भाजपच्या एका वरिष्ठ नेत्याने सांगितले.

उदाहरणार्थ, जवाहरलाल नेहरू विद्यापीठातील ‘अखिल भारतीय विद्यार्थी परिषदे’चे माजी नेते आणि सध्या दिल्ली विद्यापीठात प्राध्यापक असलेले डॉ. स्वदेश सिंह यांची भाजपच्या नवीन संघामध्ये राष्ट्रीय सचिव म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. सिंह आणि अनिल अँटोनी (ज्यांना राष्ट्रीय सचिवपदी कायम ठेवण्यात आले आहे) हे दोघेही 40 वर्षांचे आहेत, तर संगीता यादव (उत्तर प्रदेशातील, ज्यांची राष्ट्रीय सचिव म्हणून नियुक्ती झाली आहे) आणि रितुराज सिन्हा हे 45 वर्षांचे आहेत. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे विचारवंत आणि लेखक रतन शारदा यांनी ‘द प्रिंट’ला सांगितले की, टीमचे सरासरी वय कमी करण्यात आले आहे आणि महिलांचा सहभाग वाढवण्यात आला आहे. जे.पी. नड्डा यांच्या नेतृत्वाखालील संघ हा प्रत्यक्षात नवीन यांच्या संघापेक्षा तुलनेने तरुण आहे, याबद्दल विचारले असता शारदा म्हणाले की, बहुतेक पदाधिकारी 40 ते 45 वयोगटातील आहेत.

“काहीजण अनुभवी आणि 60 वर्षांवरील असू शकतात, ज्यामुळे सरासरीवर परिणाम होतो. पण ती सरासरी मर्यादेतच आहे, त्यामुळे त्यावर फारसा भर देण्याची गरज नाही. जर तुम्ही 45 वर्षांखालील आणि 60 वर्षांवरील लोकांचे प्रमाण पाहिले, तर सरासरीची बाब वेगळी ठरू शकते; पण एकंदरीत, मला वाटते की त्या संघटनेत तरुणांचे प्रमाण खूप जास्त आहे,” असे त्यांनी स्पष्ट केले.

‘अनुभवाची गरज असते’

शारदा म्हणाले की, नवीन टीममध्ये ‘नव्याने उभारणी आणि नवचैतन्य निर्माण करण्यावर’ भर दिला जात आहे. “पण त्याच वेळी अनुभवाचीही गरज असते. तुम्हाला अरुण जेटलींसारख्या लोकांची गरज असते, जे संपूर्ण संघाला वजन प्राप्त करून देतात आणि आपल्या अनुभवाच्या जोरावर मार्गदर्शन करू शकतात. मी भाजपमधील अनेक प्रसारमाध्यम प्रतिनिधींशी बोललो आहे. ते सांगायचे की जेटलीजी संध्याकाळी त्यांच्यासोबत बसायचे, त्यांना सूचना द्यायचे, त्यांच्याशी हास्यविनोद करायचे, त्यांनी कुठे योग्य केले, ते कुठे चुकले हे सांगायचे आणि गोष्टी कशा हाताळल्या पाहिजेत, हे समजावून सांगायचे. त्यामुळे, जेव्हा काही अनुभवी लोक असतात जे या लोकांना मार्गदर्शन करू शकतात, तेव्हाच हे शक्य होते,” असे ते म्हणाले.

“एखाद्या अत्यंत शक्तिशाली पक्षात, अत्यंत प्रभावशाली मुख्यालयात आणि अतिशय शक्तिशाली पदावर बसून काम करताना—आणि या सर्व गोष्टी 10 वर्षांपूर्वीच्या परिस्थितीपेक्षा खूप वेगळ्या असताना अहंकारी किंवा बेभान होणे खूप सोपे असते. मला हे माहीत आहे, कारण मी तिथे लोकांना अचानक आपली भूमिका बदलताना आणि अहंकारी होताना पाहिले आहे. त्यामुळे त्यावर नियंत्रण ठेवणे गरजेचे आहे. म्हणूनच काही अनुभवी लोकांची आवश्यकता असते,” असे ते म्हणाले.

भाजपमधील एका वरिष्ठ नेत्याच्या मते, सरचिटणीस हे भाजपमधील सर्वात महत्त्वाच्या पदांपैकी एक मानले जातात; कारण ते पक्षाशी संबंधित धोरणात्मक निर्णय घेतात आणि विशेषतः निवडणुकांपूर्वी विविध उपक्रमांची आखणी करण्यासाठी नियमित आढावा बैठका घेतात. आठ सरचिटणीसांपैकी दोघांना कायम ठेवण्यात आले आहे, तर सहा नवीन नावांचा समावेश करण्यात आला आहे; यामध्ये स्मृती इराणी, बिप्लब देब, सतीश पुनिया आणि हरीश द्विवेदी यांचा समावेश आहे.

“विनोद तावडे आणि सुनील बन्सल या दोघांनाही राष्ट्रीय सरचिटणीस म्हणून टीममध्ये कायम ठेवण्यात आले आहे. तावडे हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या पार्श्वभूमीतून आले आहेत आणि ते दीर्घकाळापासून अभाविपचे कार्यकर्ते राहिले आहेत; ते त्यांच्या संघटनात्मक कौशल्यांसाठी ओळखले जातात. पश्चिम बंगालमध्ये अशा वेळी मोठा विजय मिळवून दिल्याबद्दल बन्सल यांना हे फळ मिळाले आहे, जेव्हा कोणालाही तशी शक्यता वाटत नव्हती. हे दोघे आणि इतर नवीन चेहरे मिळून संपूर्ण टीमला अत्यंत आवश्यक असलेला अनुभव प्रदान करतील,” असे भाजपच्या एका वरिष्ठ नेत्याने सांगितले.

याव्यतिरिक्त, आदिवासी समाजातील गजेंद्र पटेल यांच्यावर सरचिटणीसपदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. राम माधव आणि स्मृती इराणी या दोघांचेही पक्षात पुनरागमन झाले आहे आणि ते पक्षाच्या कामकाजात महत्त्वाची भूमिका बजावण्याची शक्यता आहे, असे एका पदाधिकाऱ्याने सांगितले. “गजेंद्र पटेल 51, बिप्लब देब 54, स्मृती इराणी 50 आणि हरीश द्विवेदी 52 वर्षांचे आहेत. त्यामुळे सरचिटणीसांच्या निवडीतही नेतृत्वात पिढी-बदल घडवून आणतानाच, मार्गदर्शनासाठी अनुभवी चेहरेही कायम राहतील याची काळजी घेण्यात आली आहे,” असे एका नेत्याने सांगितले.

“ज्या उत्तर प्रदेशात पुढील वर्षी निवडणुका होणार आहेत, तिथून अधिक प्रतिनिधित्व मिळेल याचीही काळजी घेण्यात आली आहे. उत्तर प्रदेशचे माजी लोकसभा सदस्य हरीश द्विवेदी हे सरचिटणीस आहेत, तर उत्तर प्रदेशातील युवा नेत्या आणि राज्यसभा सदस्य संगीता यादव यांची राष्ट्रीय सचिव म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे,” असे त्या नेत्याने सांगितले.

संबंधित लेख

चुकवू नका

Recent Comments