नवी दिल्ली: आयएसआय समर्थित शहजाद भट्टी टोळीच्या 253 सदस्यांना अटक केल्याची घोषणा गृहमंत्री अमित शहा यांनी केल्यानंतर काही दिवसांतच, भट्टीने सोशल मीडियावर धमकी दिली आहे की, त्याचे आणखी 3 हजार साथीदार मोकळे फिरत आहेत.
“अमित शहा यांनी ट्विट केले की, ‘आम्ही शहजाद भट्टीच्या 200 हून अधिक साथीदारांना पकडले आहे.’ तुम्हाला हेच दाखवले जात आहे आणि प्रसारमाध्यमेही याचेच प्रसारण करत आहेत, पण वास्तव तसे नाही. हे लोक ‘कॉकरोच जनता पार्टी’चे आहेत. जे लोक जंतरमंतरवर गेले होते, तिथेही तुमचे फोटो आणि व्हिडिओ काढले गेले होते,” असे भट्टीने सोशल मीडियावरील एका व्हिडिओमध्ये म्हटले आहे. ‘द प्रिंट’ला या सोशल मीडिया व्हिडिओची स्वतंत्रपणे पडताळणी करता आली नाही. भट्टी याने मोदी-शहा सरकारला त्या कथित साथीदारांचे चेहरे आणि त्यांच्याकडून जप्त केलेली शस्त्रे दाखवण्याचे आव्हान दिले. “मी मोदी सरकारला आव्हान देतो की, त्यांनी पकडलेल्या या लोकांचे चेहरे आणि त्यांच्याकडून जप्त केलेली शस्त्रे, तसेच ती शस्त्रे कुठे बनवली गेली होती, हे टीव्हीवर थेट दाखवावे,” तो म्हणाला.
भट्टीच्या म्हणण्यानुसार त्याचे नेटवर्क गेल्या 5-6 वर्षांपासून सक्रिय आहे. “तुम्हाला ही मोहीम आताच का सुरू करावी लागली? त्याआधी तुमच्या यंत्रणा आणि पोलीस झोपले होते का?” असा सवाल त्यांनी केला. जर तुम्ही 300 जणांना अटक केली असेल, तर माझ्याकडे 3 हजार लोक आहेत, जे रस्त्यांवर मोकळेपणाने फिरत आहेत,” असेही भट्टीने नमूद केले. सध्याचे सरकार प्रत्येक गोष्टीसाठी पाकिस्तानला दोष देते. कधी मते मिळवण्यासाठी तुम्ही पाकिस्तानला दोष देता; तर कधी मते मिळवण्यासाठी शीखांनाच एकमेकांविरुद्ध उभे करता. तुम्ही हे किती काळ करत राहणार?” तो म्हणाला.
प्रत्येक गोष्टीसाठी पाकिस्तानला दोष देण्यापूर्वी भारत सरकारने आपल्या स्वतःच्या तुरुंगांकडेही पाहिले पाहिजे, असेही ते म्हणाले. “आधी तुमच्या तुरुंगांमध्ये तुम्ही ज्या गुंडांना बळ दिले आहे, त्यांच्याकडे पहा. तुम्ही या गुंडांना कॅनडाला पाठवता आणि त्यांच्याकडून शीखांची हत्या करवता, पण त्याबद्दल तुम्ही आजवर एक शब्दही काढला नाही, कारण त्याचा वापर करून मते मिळवता येत नाहीत,” असेही तारे त्याने तोडले. “मी मागे हटणार नाही; तुम्ही अटक केलेल्या या लोकांच्या प्रकरणांकडे मी लक्ष देईन आणि त्यांना कायदेशीर मदत देईन. जरी ते सीजेपीचे लोक असले आणि त्यांना माझी गरज असेल, तर ते माझ्याशी संपर्क साधू शकतात; मी त्यांनाही पाठिंबा देईन,” असेही म्हणणे त्याने मांडले.
या आठवड्याच्या सुरुवातीला, सुरक्षा यंत्रणांनी गृह मंत्रालयाकडे भट्टीला ‘दहशतवादी’ म्हणून घोषित करण्याचा प्रस्ताव पाठवला होता. एनआयएने भट्टीवर ‘बेकायदेशीर व्यवहार प्रतिबंधक कायदा’ (यूएपीए) आणि ‘स्फोटक पदार्थ कायदा’ यांन्वये गुन्हे दाखल केले आहेत. तसेच, पंजाब, दिल्ली आणि उत्तरप्रदेश पोलिसांकडूनही त्याच्यावर अनेक गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

Recent Comments