scorecardresearch
Monday, 17 August, 2026
घरराजकारणशुद्ध पेट्रोलच्या कमतरतेवरून विरोधी पक्षांच्या टीकेला भाजप खासदार मिश्रा यांचे प्रत्युत्तर

शुद्ध पेट्रोलच्या कमतरतेवरून विरोधी पक्षांच्या टीकेला भाजप खासदार मिश्रा यांचे प्रत्युत्तर

इथेनॉल-मिश्रित पेट्रोलच्या वापरावरून विरोधी पक्षांनी मोदी सरकारवर टीकास्त्र सोडले. रीवा खासदार जनार्दन मिश्रा यांनी टिप्पणी केली, की 'पंतप्रधानांना भारताला स्वावलंबी बनवायचे आहे, तर 'देशद्रोही घटक' अडथळे निर्माण करत आहेत'.

नवी दिल्ली: सरकारच्या ‘इथेनॉल-मिश्रित पेट्रोल’ धोरणाविरुद्ध वाढत्या विरोधाच्या पार्श्वभूमीवर, भारतीय जनता पक्षाच्या (भाजप) एका खासदाराने उपरोधिक टिप्पणी करत वादात आणखी भर घातली आहे. “शुद्ध पेट्रोल काय कोणाच्या बापाच्या घरून येणार आहे का?” असा सवाल त्यांनी उपस्थित केला.

इथेनॉल-मिश्रित पेट्रोलच्या वापरावरून काँग्रेस आणि इतर विरोधी पक्षांनी मोदी सरकारवर टीका तीव्र केली असतानाच, रेवाचे खासदार जनार्दन मिश्रा यांच्या या विधानांनी या वादात एका अयोग्य आणि वादग्रस्त घटकाची भर घातली आहे. रेवा विमानतळावरील एका कार्यक्रमात, इथेनॉल-मिश्रित पेट्रोलला विरोध करणाऱ्यांवर निशाणा साधताना मिश्रा म्हणाले की, इथेनॉलचा उपयोग होणार नाही आणि केवळ ‘शुद्ध’ पेट्रोलच वापरले जावे, असा दावा करत विरोध केला जात आहे. धोरणावर टीका करणाऱ्यांना उद्देशून ते म्हणाले, “देशात शुद्ध पेट्रोल उपलब्धच नाही, मग ते काय तुमच्या बापाच्या घरून येणार आहे का?”

रेवा शहराला भोपाळ आणि कोलकाताशी जोडणाऱ्या नवीन विमान सेवांच्या उद्घाटन समारंभात मिश्रा सहभागी झाले होते. यावेळी त्यांनी देशाची आर्थिक स्थिती आणि इथेनॉल धोरणाबाबतही भाष्य केले. ते म्हणाले की, पंतप्रधान मोदी देशाला आत्मनिर्भर बनवू पाहत असताना काही ‘राष्ट्रविरोधी घटक’ त्यात अडथळे निर्माण करत आहेत. मिश्रा पुढे म्हणाले की, जेव्हा पंतप्रधान देशाच्या विकासासाठी काम करत आहेत, अशा वेळी संपूर्ण जग त्यांना अस्थिर करण्याचा प्रयत्न करत आहे.

इथेनॉल मिश्रणाच्या धोरणाचा बचाव करताना खासदार म्हणाले की, भारत आपल्या एकूण कच्च्या तेलापैकी केवळ 20 टक्के उत्पादन करतो आणि उर्वरित तेल आयात करावे लागते. “गॅस आणि तेलाचा विचार करता, आपण वापरत असलेल्या तेलापैकी केवळ 20 टक्के तेल देशांतर्गत उत्पादित होते. आपल्याला 80 टक्के तेल परदेशातून आयात करावे लागते. युद्ध सुरू झाले आहे. होर्मुझची सामुद्रधुनी बंद आहे आणि देशाला तेल 18 हजार किलोमीटरचा वळसा घालून आणावे लागत आहे,” असे ते म्हणाले. “तरीही, जेव्हा पंतप्रधान मोदी म्हणतात, की पेट्रोलमध्ये 20 टक्के इथेनॉल मिसळावे लागेल, तेव्हा विरोध होतो आणि लोक म्हणतात, ‘इथेनॉल नको – आम्हाला फक्त शुद्ध पेट्रोल द्या.’ शुद्ध पेट्रोल काय तुमच्या बापाच्या घरून येणार आहे का? देशात जेव्हा शुद्ध पेट्रोल उपलब्धच नाही, तेव्हा ते कुठून येणार?”

त्यानंतर मिश्रा यांनी ब्राझीलसारख्या इतर देशांची उदाहरणे दिली, जिथे वाहने 100 टक्के इथेनॉलवर चालतात. “ब्राझील हा जगातील सर्वांत मोठा इथेनॉल उत्पादक देश आहे. तिथे वाहने कोणत्याही समस्येशिवाय 100 टक्के इथेनॉलवर चालतात. ऑटोमोबाईल तज्ञ आणि मेकॅनिक्स मान्य करतात, की इथेनॉलमुळे वाहनांच्या इंजिनचे नुकसान होत नाही, तरीही भारतात त्याला अनावश्यक विरोध केला जातो.” ते म्हणाले. मिश्रा यांच्यासाठी वाद काही नवीन नाहीत. नोव्हेंबर 2022 मध्ये, रेवा येथील जलसंधारण कार्यशाळेत केलेल्या एका विधानामुळे ते चर्चेत आले होते. ते म्हणाले होते: “जमिनी कोरड्या पडत आहेत, पाणी वाचवले पाहिजे. दारू प्या, तंबाखू चघळा, गांजा ओढा किंवा थिनर आणि सोल्युशनचा वास घ्या, पण पाण्याचे महत्त्व समजून घ्या.”

मिश्रा यांच्या ताज्या विधानांचा व्हिडिओ शेअर करताना काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या सुप्रिया श्रीनेत म्हणाल्या: “हे मध्य प्रदेशातील रेवा येथील भाजप खासदार जनार्दन मिश्रा आहेत. ई 20 मुळे लोकांची वाहने खराब होत आहेत, पण त्यांची अरेरावी तर पहा.”

काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी गेल्या आठवड्यात ई 20 (इथेनॉल-मिश्रित पेट्रोल) चा मुद्दा ‘मोठ्या प्रमाणावर’ उचलून धरण्याची शपथ घेतली होती. त्यांनी एक्सवर एक व्हिडिओ पोस्ट केला, ज्यात म्हटले आहे, की हा एक ‘मोठा मुद्दा’ आहे आणि काँग्रेस तो ‘मोठ्या प्रमाणावर’ उचलून धरेल, कारण त्यामुळे लोकांच्या गाड्या, स्कूटर आणि त्यांचे आयुष्य ‘उध्वस्त’ होत आहे. “दाल में काला नहीं, पूरी दाल ही काली है (यात काहीतरी संशयास्पद नाही, तर हा संपूर्ण मुद्दाच संशयास्पद आहे),” असेही ते हिंदीत म्हणाले. इथेनॉल धोरणावरून विरोधी पक्षांनी मोदी सरकारवर टीका केली आहे. इतकेच नाही तर, आम आदमी पार्टीने (आप) वाहन मालकांशी संवाद साधण्यासाठी आणि इथेनॉल-मिश्रित पेट्रोलमुळे निर्माण होणाऱ्या समस्यांवर अभिप्राय गोळा करण्याच्या उद्देशाने, ई-20 इंधनाविरोधात देशव्यापी ‘टाऊन हॉल’ सभांची मालिका सुरू केली आहे.

संबंधित लेख

चुकवू नका

Recent Comments