scorecardresearch
Friday, 23 October, 2026
घरराजकारणराहुल गांधी यांची मणिपुरी संगीतकार चोंगथम विक्रम सिंग यांच्या श्रद्धांजली सभेला हजेरी

राहुल गांधी यांची मणिपुरी संगीतकार चोंगथम विक्रम सिंग यांच्या श्रद्धांजली सभेला हजेरी

दक्षिण-पूर्व दिल्लीतील किलोकारी येथे आपल्या घराबाहेर गोंगाट करणाऱ्या काही जणांवर आक्षेप घेतल्यामुळे झालेल्या हल्ल्यात चोंगथम विक्रम सिंग यांचा मृत्यू झाला.

नवी दिल्ली: लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी मणिपुरी संगीतकार चोंगथम विक्रम सिंग यांच्या स्मरणार्थ गुरुवारी आयोजित कार्यक्रमाला हजेरी लावली. सिंग यांच्या हत्येचा निषेध करताना गांधी म्हणाले की, ही घटना हिंसा, द्वेष आणि अहंकार दर्शवते; तसेच, अशा प्रकारचे वर्तन आजकाल एक ‘फॅशन’ बनले आहे.

दक्षिण दिल्लीतील किलोकारी येथे 7 सप्टेंबर रोजी, काही जणांच्या मोठ्या आवाजातील गोंगाटावर आक्षेप घेतल्यामुळे झालेल्या मारहाणीत सिंग यांचा मृत्यू झाला होता. येथील डॉ. आंबेडकर इंटरनॅशनल सेंटरमध्ये आयोजित या श्रद्धांजली सभेला जयराम रमेश आणि सुप्रिया श्रीनेत यांच्यासह काँग्रेसचे वरिष्ठ नेते तसेच मणिपुरी समुदायातील सदस्य उपस्थित होते. सिंग यांच्या स्मृतीप्रित्यर्थ संगीत सादरीकरणही करण्यात आले. उपस्थितांना संबोधित करताना गांधी म्हणाले, “एका तरुणाची हत्या होणे ही एक शोकांतिका आहे. केवळ तो कुठल्या भागातून आला होता, या कारणास्तव त्याच्यावर हल्ला झाला, हीदेखील एक शोकांतिकाच आहे. मणिपूरच्या लोकांसाठी ही एक दुर्दैवी घटना आहे. अर्थात, मणिपूरच्या लोकांना ज्या शोकांतिकांचा सामना करावा लागत आहे, त्यापैकी ही एकमेव घटना नाही.” ते पुढे म्हणाले, “त्याची (सिंगची) हत्या झाली असो वा नसो, या कृतीमध्ये हिंसा होती. यात हिंसा होती, द्वेष होता आणि अहंकारही होता. आणि आजकाल एक प्रकारचा पायंडाच पडला आहे की, जर तुम्ही शक्तिशाली असाल, तर तुम्ही हिंसक वागू शकता. अशा घटनेला दिलेला प्रतिसाद हा राग किंवा द्वेषाच्या स्वरूपात नसावा”.

राहुल यांनी सिंग यांचे वर्णन ‘प्रेम आणि आपुलकीचे प्रतीक’ असे केले. “राजकारणात आणि आयुष्यात प्रतीकांना खूप महत्त्व असते. ते प्रेम आणि आपुलकीचे प्रतीक आहेत,” असे ते म्हणाले. “सिंग यांच्यावरील हल्ल्याकडे इतर समुदायांशी संबंधित घटनांच्या पार्श्वभूमीवरही पाहिले पाहिजे. ही काही एकमेव घटना नाही. असे वारंवार घडत आले आहे. नेहमीच त्याचा शेवट हत्येत होतो असे नाही; कधी अपमान केला जातो, तर कधी हिंसाचार होतो.” “अनेक समुदायांच्या बाबतीत असे घडत आहे,” असे ते म्हणाले.

सिंग हे मणिपूरमधील एक ख्यातनाम संगीतकार होते आणि ‘अल्ट्रा व्हायरस’, ‘फीनिक्स’ व ‘ईस्टर्न डार्क’ यांसारख्या अनेक बँड्सशी ते जोडलेले होते. नंतर ते दिल्लीला स्थायिक झाले आणि तिथे संगीत शिक्षक म्हणून काम करत होते. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सोमवारी रात्री साडेअकराच्या सुमारास आग्नेय दिल्लीतील किलोकारी येथील आपल्या घराबाहेर पडले असता, रस्त्यावर उभ्या असलेल्या काही तरुणांना त्यांनी मोठ्याने आवाज न करण्याची विनंती केली. यावरून त्यांच्यात वाद झाला; त्यानंतर, त्यांचा पाठलाग करून इमारतीमध्ये त्यांच्यावर हल्ला करण्यात आला. सिंग यांच्या मुलाने त्यांना रुग्णालयात नेले, परंतु दुसऱ्या दिवशी सकाळी त्यांचा मृत्यू झाला.

दिल्ली पोलिसांनी या घटनेच्या संदर्भात आठ जणांना अटक केली असून, या हल्ल्यामागे वांशिक द्वेषाचा काही संदर्भ आहे का, याचा तपास केला जात आहे.

संबंधित लेख

चुकवू नका

Recent Comments