scorecardresearch
Saturday, 13 June, 2026
घरराजकारणएनडीएच्या बैठकीदरम्यान पंतप्रधान मोदींचा 'सामूहिक विजया'चा संदेश, अणुऊर्जेतील आत्मनिर्भरतेचे आवाहन

एनडीएच्या बैठकीदरम्यान पंतप्रधान मोदींचा ‘सामूहिक विजया’चा संदेश, अणुऊर्जेतील आत्मनिर्भरतेचे आवाहन

केंद्रातील सत्तेची 12 वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त नवी दिल्लीत आयोजित राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या (एनडीए) एका महत्त्वपूर्ण बैठकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 'सामूहिक विजया'चा संदेश दिला.

नवी दिल्ली: केंद्रातील सत्तेची 12 वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त नवी दिल्लीत आयोजित राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या (एनडीए) एका महत्त्वपूर्ण बैठकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘सामूहिक विजया’चा संदेश दिला. तसेच, अणुऊर्जेच्या क्षेत्रात स्वावलंबनाकडे वाटचाल करण्यापासून ते ‘ट्रिलियन-डॉलर अर्थव्यवस्था’ बनण्याच्या शर्यतीत राज्यांमध्ये निकोप स्पर्धा निर्माण करण्यापर्यंतच्या भविष्यातील वाटचालीचा आराखडाही त्यांनी मांडला.

ही बैठक अशा वेळी होत आहे, जेव्हा पंतप्रधान मोदी यांनी भारताचे सर्वाधिक काळ सलग सेवा बजावणारे निवडून आलेले पंतप्रधान म्हणून माजी पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांचा विक्रम मोडला आहे. बैठकीला संबोधित करताना मोदींनी एनडीएच्या मित्रपक्षांचे आभार मानले. या मित्रपक्षांनी मोदींच्या 12 वर्षांच्या कार्यकाळाचे आणि ‘सर्वाधिक काळ सलग सेवा बजावणारे निवडून आलेले पंतप्रधान’ बनण्याच्या टप्प्याचे कौतुक करणारा ठरावही मंजूर केला. हा केवळ आपला वैयक्तिक विजय नसून तो सर्वांचा ‘सामूहिक विजय’ असल्याचे त्यांनी सांगितले. ‘पक्षाहून देश मोठा’ यावर भर देत ते म्हणाले की, जेव्हा सरकार ‘राष्ट्र प्रथम’ या भावनेने काम करते, तेव्हा कोणताही निर्णय घेणे कठीण नसते.

“पूर्वीची सरकारे कलम 370 वर चर्चा करण्यासही घाबरत असत. आम्ही ते रद्द केले आणि संपूर्ण देशात एकच संविधान लागू केले. ईशान्य भारतात पूर्वी बॉम्बस्फोट, बंदुका आणि नाकेबंदी (ब्लॉकडेड्स) या गोष्टी नित्याच्या होत्या; आम्ही तिथे शांतता आणि स्थिरता प्रस्थापित केली. दहशतवादी हल्ल्यानंतर भारत पूर्वी मूकपणे सहन करत असे; आम्ही मात्र दहशतवाद्यांविरुद्ध सर्जिकल स्ट्राईक आणि एअर स्ट्राईक केले,” असे मोदी म्हणाले. त्यांनी ‘ऑपरेशन सिंदूर’मध्ये जगाने भारताची ताकद अनुभवल्याचाही उल्लेख केला. “नक्षलवाद आणि माओवाद कधीच संपणार नाहीत आणि ते संपूच शकत नाहीत, असे पूर्वी मानले जात असे. आम्ही देशाला नक्षलवाद आणि माओवादाच्या विषापासून मुक्त केले आहे. महिलांसाठी आरक्षण, तिहेरी तलाकविरोधी कायदा, सीएए, भारतीय दंड संहिता (आयपीसी) आणि सैनिकांसाठी ‘वन रँक-वन पेन्शन’ योजना. एनडीए सरकारने राष्ट्रहितासाठी कोणतीही कृती करण्यास कधीच संकोच केला नाही आणि आम्हाला याचा अभिमान आहे,” असेही पंतप्रधानांनी नमूद केले.

गेल्या 12  वर्षांतील एनडीएच्या कामगिरीची एक उल्लेखनीय बाब म्हणजे, ही कामगिरी जागतिक अस्थिरता आणि अशांततेच्या काळात साध्य करण्यात आली, असे ते म्हणाले. हा काळ स्थिर सरकार असण्याचे फायदे दर्शवणारा पुरावा आहे, असेही त्यांनी सांगितले. भविष्याचा विचार करता, देशाने लवकरात लवकर 500 गिगावॅट अक्षय ऊर्जेचे उद्दिष्ट पूर्ण केले पाहिजे, असा ठाम विश्वास पंतप्रधान मोदींनी व्यक्त केला. “सौरऊर्जेच्या क्षेत्रातील काम वेगाने पुढे जात असतानाच, आता आपल्याला अणुऊर्जेबाबतची आपली उद्दिष्टे साध्य करण्याच्या दिशेनेही गती वाढवावी लागेल. ‘फास्ट ब्रीडर रिअॅक्टर’ तंत्रज्ञानामध्ये भारताने किती मोठी प्रगती केली आहे, हे आपण जगाला दाखवून दिले आहे. हे तंत्रज्ञान आपल्याला अणुऊर्जेच्या क्षेत्रात स्वावलंबनाकडे घेऊन जाईल. ‘ग्रीन हायड्रोजन’ आणि ‘ग्रीन अमोनिया’च्या क्षेत्रातही भारत वेगाने प्रगती करत आहे. नजीकच्या काळात, ही तंत्रज्ञाने भारताला जागतिक हरित ऊर्जा नकाशावर एक प्रमुख देश म्हणून प्रस्थापित करतील आणि ही ओळख मिळणे निश्चित आहे.” नागरिक लवकरच ‘मेड-इन-इंडिया’ (भारतात बनलेल्या) प्रवासी विमानातून प्रवास करतील, तो दिवस आता दूर नाही”, असेही ते म्हणाले.

‘कोणते राज्य सर्वात वेगाने ‘ट्रिलियन-डॉलर अर्थव्यवस्था’ बनते आणि कोणते शहर ‘इनोव्हेशन’चे (नवनिर्मितीचे) सर्वात मोठे केंद्र बनते, यांबाबत राज्यांमध्ये स्पर्धा व्हावी’, असे आवाहनही पंतप्रधानांनी केले.

‘काँग्रेस विकास दर’

एनडीए सरकारच्या 12 वर्षांच्या कार्यकाळात 25 कोटींहून अधिक लोकांना गरिबीतून बाहेर काढण्याचे श्रेय पंतप्रधान मोदींनी एनडीए सरकारच्या धोरणांना दिले. ‘काँग्रेसच्या विश्वासघातानंतर देशातील जनतेने एनडीएवर विश्वास टाकला’, असे ते म्हणाले. “जे लोक काल गरीब होते आणि आता ‘नव-मध्यमवर्गीय’ बनले आहेत, त्यांना आपण पुन्हा मागे पडू देऊ नये, असे मला वाटते. म्हणूनच, सरकार आणि लोकप्रतिनिधी म्हणून आपण रात्रंदिवस काम केले पाहिजे. 1.4 अब्ज लोकसंख्येच्या या देशाने आपल्याकडून ज्या अपेक्षा ठेवल्या आहेत, त्या पूर्ण करण्याच्या निर्धाराने आपण अतोनात प्रयत्न केले आहेत. भारताचे तरुण, महिला, मध्यमवर्ग आणि शेतकरी यांच्या आकांक्षा आपण पूर्ण केल्या पाहिजेत,” असे ते म्हणाले. देशाला ‘काँग्रेसच्या कारस्थानांच्या जाळ्यातून’ मुक्त करण्याचे श्रेय त्यांनी एनडीएच्या 12 वर्षांच्या काळाला दिले. काँग्रेसने देशाला असा विश्वास दिला होता, की जलद विकास दर आणि प्रगती शक्यच नाही, असा आरोपही त्यांनी केला.

“त्यांनी अत्यंत चलाखीने याला ‘हिंदू विकास दर’ असे नाव दिले. देशातील मोठ्या हिंदू लोकसंख्येवर हा डाग लावला गेला, वास्तविक याला ‘काँग्रेस विकास दर’ म्हणायला हवे होते,” असे ते म्हणाले. त्यांनी देशातील विमानतळ आणि मेट्रोची वाढलेली संख्या तसेच संरक्षणक्षेत्रातील निर्यात इत्यादींची तुलनात्मक माहिती दिली. डिजिटल व्यवहारांच्या बाबतीत भारत आता ‘प्रथम क्रमांकाचा देश’ बनला आहे, याकडेही त्यांनी लक्ष वेधले. “2014 मध्ये, भारताला आवश्यक असलेल्या बहुतांश मोबाईल फोन्सची आयात करावी लागत असे. आज भारत देशांतर्गत 33 कोटींहून अधिक मोबाईल हँडसेट्सचे उत्पादन करत आहे. 2014 मध्ये सौरऊर्जा क्षमता केवळ 2.5 गिगावॅट होती; आज ती 150 गिगावॅटपेक्षा जास्त झाली आहे. 2014 मध्ये इथेनॉल मिश्रणाचे प्रमाण केवळ 1.5% होते, तर आज ते 20% पर्यंत पोहोचले आहे. 2014 मध्ये देशात एकही सेमीकंडक्टर युनिट नव्हते; आज 10 हून अधिक सेमीकंडक्टर युनिट्सची उभारणी सुरू असून ती भारताला आधुनिकतेकडे नेत आहेत,” असे पंतप्रधान म्हणाले.

“मुद्दा असा आहे की, जर 12 वर्षांत इतकी प्रगती होऊ शकते, तर त्याआधीच्या दशकांमध्ये ती का झाली नाही? यावरून काँग्रेसच्या काळातील विकासदर आणि एनडीएच्या काळातील विकासदर यांमधील फरक स्पष्ट होतो,” असेही त्यांनी नमूद केले.

मध्यमवर्गीयांसाठी संदेश

देशातील मध्यमवर्गीयांना संबोधित करताना पंतप्रधान मोदी म्हणाले की, 2014 पूर्वी मध्यमवर्गीयांना अनेकदा कायदेशीर आणि नोकरशाहीशी संबंधित गुंतागुंतीच्या समस्यांचा सामना करावा लागत असे.

“मात्र, आम्ही मध्यमवर्गीयांचे संघर्ष आणि त्यांच्या आकांक्षा समजून घेतल्या; म्हणूनच आज 12 लाख रुपयांपर्यंतचे उत्पन्न पूर्णपणे करमुक्त आहे. देशात आता करप्रणाली सुलभ झाली आहे आणि भक्कम पायाभूत सुविधांमुळे जीवन अधिक सुलभ झाले आहे. गेल्या 12 वर्षांत मध्यमवर्गीय कुटुंबांतील मुलांसाठी विविध क्षेत्रांत नवीन संधी निर्माण झाल्या आहेत. मध्यमवर्गीयांचे स्वतःचे घर घेण्याचे स्वप्न पूर्ण करण्यासाठीही सरकार मदत करत आहे,” असे सांगत त्यांनी आयुष्मान भारत योजना आणि जीएसटी सुधारणांसारख्या इतर उपाययोजनांचाही उल्लेख केला.

संबंधित लेख

चुकवू नका

Recent Comments