scorecardresearch
Sunday, 25 October, 2026
घरराजकारण'मनुस्मृती'बाबतच्या विधानावरून योगी आदित्यनाथ यांची राहुल गांधींवर टीका

‘मनुस्मृती’बाबतच्या विधानावरून योगी आदित्यनाथ यांची राहुल गांधींवर टीका

राहुल यांच्या 'मनुस्मृती मानसिकता' या विधानावर प्रतिक्रिया देताना योगी म्हणाले, "भारताच्या वारशाचा अपमान करणे हा तुमचा जन्मसिद्ध अधिकार आहे, असे तुम्हाला वाटते."

लखनऊ: उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी सोमवारी लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्यावर ‘मनुस्मृती’बाबतच्या अलीकडील विधानांवरून जोरदार टीका केली. यावेळी त्यांनी ‘शहरी नक्षलवाद्यां’चा (अर्बन नक्षल्स) उल्लेख केला आणि राहुल यांच्यावर भारताच्या संस्था व वारसा यांचा अपमान केल्याचा तसेच तरुण पिढीची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप केला.

रायबरेली (गांधी यांचा संसदीय मतदारसंघ) येथील एका कार्यक्रमात बोलताना मुख्यमंत्र्यांनी सांगितले की, त्यांना नुकतेच महाराष्ट्रातील काँग्रेस नेत्याचे एक विधान आढळले, ज्यामध्ये राहुल गांधी यांनी महिलांना ‘मनुस्मृतीच्या बेड्यांमधून’ मुक्त होण्याचे आवाहन केले होते. “संसदेतील विरोधी पक्षनेते म्हणून तुम्ही लोकशाहीला उत्तरदायी आहात. तुम्ही संविधानाची शपथ घेतली आहे. परंतु, भारताच्या वारशाचा अपमान करणे, हा तुमचा जन्मसिद्ध अधिकार आहे असे तुम्ही मानता,” असे योगी म्हणाले. “तुम्ही राज्याबाहेर जाता तेव्हा उत्तर प्रदेशचा अपमान करता आणि परदेशात जाता तेव्हा भारताचा अपमान करता. तुम्ही भारतीय लष्कराच्या सैनिकांकडे पुरावा मागता.”

दहशतवादाविरुद्धच्या भारताच्या लढ्यात, देशाच्या विरोधात असलेल्या घटकांना राहुल गांधी आणि काँग्रेस अप्रत्यक्षपणे प्रोत्साहन देत असल्याचा आरोपही मुख्यमंत्र्यांनी केला. “तुमच्या पक्षाने भगवान रामाच्या अस्तित्वावरच प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. लोकशाहीप्रती तुमची निष्ठा आणीबाणीच्या काळातील वागणुकीवरून समजून घेता येते,” असे योगी म्हणाले. मनुस्मृतीवरील राहुल गांधींच्या विधानांचा समाचार घेताना योगी म्हणाले, “जर तुम्हाला ‘मनू’ समजून घ्यायचे असतील, तर अथर्ववेद आणि मत्स्यपुराण वाचा. मला विचारायचे आहे की, आई, बहीण, पत्नी किंवा मुलगी अशा विविध रूपांत एखाद्या स्त्रीने कोणाचे आयुष्य सुरक्षित केले नाही, जोपासले नाही किंवा घडवले नाही?”

राहुल काय म्हणाले?

शनिवारी पुण्यात आयोजित ‘छात्रों की गूंज’ (विद्यार्थ्यांचा आवाज) या कार्यक्रमात बोलताना गांधी म्हणाले की, स्त्रिया या स्वतःच्या मालकीच्या असतात; त्या वडील, पती किंवा मुलांच्या मालकीच्या नसतात. आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर स्त्रीने पुरुष नातेवाईकांच्या नियंत्रणाखाली राहावे, या मनुस्मृतीतील विधानाचा त्यांनी ‘लज्जास्पद’ असा उल्लेख केला. “मला येथे मनुस्मृतीचा संदर्भ द्यायचा आहे, ज्यात स्पष्टपणे म्हटले आहे, की बालपणी स्त्री वडिलांच्या अधीन असते, तारुण्यात ती पतीच्या मालकीची असते आणि पतीच्या मृत्यूनंतर ती मुलांच्या मालकीची असते. स्त्री कधीही स्वतंत्र नसावी. हे शब्द लज्जास्पद आहेत. हे शब्द कधीच उच्चारले जायला नको होते,” असे गांधी म्हणाले.

जंतरमंतरवरील ‘जनरेशन झेड’च्या निदर्शनांचा संदर्भ देत मुख्यमंत्री आदित्यनाथ पुढे म्हणाले की, एका तरुणीने पंतप्रधानांविरुद्ध आक्षेपार्ह भाषेचा वापर केला होता आणि नंतर तिने त्याबद्दल माफी मागितली; तसेच तिच्या पालकांनीही मान्य केले की तिची चूक झाली होती. “तुम्हाला भारताची सध्याची पिढी ‘अर्बन नक्षल’च्या (शहरी नक्षलवाद्यांच्या) हातून का उद्ध्वस्त करायची आहे? तुम्हाला भारताच्या भविष्याशी का खेळायचे आहे?” असा सवाल योगींनी केला. मुख्यमंत्र्यांनी गांधी कुटुंबावरही निशाणा साधला. ते म्हणाले की, रायबरेलीने त्यांना सातत्याने पाठिंबा दिला असला, तरी या कुटुंबाने त्या भागासाठी ‘ओळख-संकट’ निर्माण केले आहे. “जेव्हा तुम्ही भारताच्या संस्थांचा अपमान करता आणि पंतप्रधानांविरुद्ध अपमानास्पद टिप्पणी करता, तेव्हा तुम्ही भारताच्या एका संस्थेचाच अपमान करत असता. पंतप्रधान ही केवळ एक व्यक्ती नसते, तर ते पद देशाच्या एका संस्थेचे प्रतिनिधित्व करते,” असे ते म्हणाले.

“जर या संस्थांना आरोपीच्या पिंजऱ्यात उभे केले, तर अखेरीस भारतातील प्रत्येक नागरिकालाच आरोपीच्या पिंजऱ्यात उभे केले जाईल. जेव्हा तुम्ही पंतप्रधानांविरुद्ध अपमानास्पद भाषेचा वापर करता, तेव्हा तुम्ही भारताचा अपमान करता आणि सध्याच्या पिढीसमोर अस्मितेचे संकट निर्माण करता,” असे योगी म्हणाले आणि त्यांनी राहुल गांधींना अशा बेजबाबदार वर्तनापासून दूर राहण्याचे आवाहन केले.

योगींचा काँग्रेसच्या उत्तरप्रदेश नेतृत्वावर निशाणा

केवळ राहुल गांधींवरच नव्हे, तर योगींनी काँग्रेसच्या उत्तर प्रदेश नेतृत्वावरही टीका केली. “हा त्यांचा इतिहास आहे, काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांचा इतिहास आहे. जेव्हा एका माफिया डॉनने (मुख्तार अन्सारीचा संदर्भ देत) त्यांच्या भावाची हत्या केली, तेव्हा या व्यक्तीने त्या गुन्हेगाराविरुद्ध साक्ष दिली नाही. त्याऐवजी, ते त्याच्यासमोर गुडघ्यावर बसले,” असे योगी म्हणाले; हा संदर्भ काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अजय राय यांचे भाऊ अवधेश राय यांच्या 1991 मधील हत्येशी संबंधित होता.

“ज्या माणसाने त्यांच्या भावाची निर्घृण हत्या केली होती, त्याच माणसासमोर ते नतमस्तक झाले. जेव्हा सरकारने हस्तक्षेप केला आणि त्या माफिया घटकाचा बीमोड केला, तेव्हाच परिस्थिती बदलली. अन्यथा, या लोकांनी राज्याला माफियांचे वर्चस्व असलेल्या प्रदेशात रूपांतरित केले होते आणि अस्मितेचे संकट निर्माण केले होते,” असेही ते म्हणाले. सोमवारी रायबरेली येथे राणा बेनी सिंग माधव यांच्या जयंतीनिमित्त 50 कोटी रुपये खर्चून बांधलेल्या सभागृहाचे उद्घाटन करण्यासाठी योगी आदित्यनाथ उपस्थित होते.

संबंधित लेख

चुकवू नका

Recent Comments