नवी दिल्ली: कॅनडातील भारताचे उच्चायुक्त दिनेश पटनायक यांनी भारतातून सूत्रे हलवणाऱ्या गुन्हेगारी टोळ्यांविरुद्ध करण्यात आलेल्या बहुराष्ट्रीय कारवाईचे स्वागत केले आहे. पटनायक यांनी बुधवारी सांगितले की, ‘अमेरिकेत करण्यात आलेल्या अटकेमुळे नवी दिल्लीचा हा दीर्घकालीन दावा सिद्ध झाला आहे की, उत्तर अमेरिकेतील सरकारे त्यांच्या सीमा ओलांडून कार्यरत असलेल्या आंतरराष्ट्रीय गुन्हेगारी टोळ्यांचा सामना करण्यात खूपच दिरंगाई करत होती’.
कॅनडातील ‘ग्लोब अँड मेल’ला दिलेल्या निवेदनात ते म्हणाले, “बऱ्याच काळापासून भारतात अशी भावना होती, की उत्तर अमेरिकेतील देश याकडे दुर्लक्ष करत आहेत. परंतु, आता तुम्ही आणि अमेरिकन अधिकारी कारवाई करत आहात, ही चांगली बातमी आहे.” तुरुंगात असलेल्या गँगस्टर लॉरेन्स बिश्नोईच्या प्रत्यार्पणासाठी अमेरिकेकडून विनंती केली जाण्याच्या शक्यतेबाबत विचारले असता, राजदूत पटनायक म्हणाले, की भारत कोणत्याही अधिकृत विनंतीचा विचार करेल, परंतु अंतिम निर्णय भारतीय न्यायालयांचा असेल. बिश्नोई सध्या गुजरातच्या साबरमती मध्यवर्ती कारागृहात बंदिस्त आहे.
अमेरिकन अधिकाऱ्यांनी बुधवारी लॉरेन्स बिश्नोई, जग्गू भगवानपुरिया आणि रविंदर सिंग धांडा यांच्या नेतृत्वाखालील गुन्हेगारी टोळ्यांशी संबंधित 37 आरोपींविरुद्ध तीन फेडरल आरोपपत्रे जाहीर केल्यानंतर पटनायक यांची ही प्रतिक्रिया आली आहे. सरकारी वकिलांनी या गटांचे वर्णन ‘आंतरराष्ट्रीय गुन्हेगारी संस्था’ असे केले आहे, ज्या उत्तर अमेरिका आणि त्यापलीकडे खंडणीखोरी, अमली पदार्थांची तस्करी, अपहरण आणि लक्ष्यित हत्या यांसारख्या गुन्ह्यांमध्ये गुंतलेल्या आहेत. ही आरोपपत्रे गुन्हेगारी नेटवर्कविरुद्धची आतापर्यंतची सर्वांत महत्त्वपूर्ण आणि समन्वित कायदेशीर कारवाई मानली जात आहे. भारतीय अधिकाऱ्यांचा असा दीर्घकाळापासून दावा आहे की, ही नेटवर्क केवळ भारतातच नव्हे, तर परदेशात राहणाऱ्या भारतीयांसाठीही धोका निर्माण करत आहेत. सर्वात गंभीर आरोपांपैकी एक म्हणजे बिश्नोई आणि त्याचा उत्तर अमेरिकेतील सहकारी सतिंदरजीत सिंग ऊर्फ गोल्डी ब्रार यांनी हरदीप सिंग निज्जरच्या हत्येचे आदेश दिले होते. कॅनडातील शीख फुटीरतावादी असलेल्या निज्जरची 18 जून 2023 रोजी ब्रिटिश कोलंबियातील सरे येथील एका शीख मंदिराबाहेर गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती.
हा आरोप 1 जुलै रोजी अमेरिकन न्यायालयात दाखल केलेल्या आणि अलीकडेच जाहीर करण्यात आलेल्या फेडरल आरोपपत्रात नमूद केला आहे; अमेरिकन फेडरल ग्रँड ज्युरीने मंजूर केलेला हा पहिलाच अधिकृत आरोप आहे. लॉस एंजेलिसमध्ये आयोजित पत्रकार परिषदेत ‘ऑपरेशन हार्ड बॉल’चे आणि इतर संस्थांच्या नेतृत्वाखालील अनेक वर्षांची तपास मोहीम) निष्कर्ष जाहीर करताना अमेरिकन अधिकाऱ्यांनी सांगितले की, ते बिश्नोई आणि त्याच्या अनेक सह-आरोपींच्या प्रत्यार्पणाची मागणी करत आहेत. सरकारी वकिलांनी असाही आरोप केला की, तुरुंगात असतानाही बिश्नोईने प्रतिबंधित मोबाईल फोन आणि इंटरनेट-आधारित संवादाचा वापर करून आपले जागतिक गुन्हेगारी साम्राज्य चालवणे सुरूच ठेवले होते. अमेरिकेच्या न्याय विभागाच्या म्हणण्यानुसार, बिश्नोईच्या टोळीने अनेक खंडांमध्ये राजकीय हत्या, खून, गोळीबार, खंडणीखोरी, अपहरण, अमली पदार्थांची तस्करी आणि मानवी तस्करी यांसारखे गुन्हे घडवून आणले. हे जाळे अमेरिका, कॅनडा, युरोप आणि इतर ठिकाणच्या साथीदारांच्या माध्यमातून कार्यरत होते, असा आरोपही सरकारी वकिलांनी केला.
एकूणच, सरकारी वकिलांनी तीन वेगवेगळ्या आरोपपत्रांद्वारे 37 आरोपींवर गुन्हे दाखल केले. अधिकाऱ्यांनी अमेरिकेत 13 संशयितांना अटक केली; यात कॅलिफोर्नियामधील 11, इंडियानामधील एक आणि जॉर्जियामधील एकाचा समावेश आहे. तसेच कॅनडामध्ये तीन आणि स्पेनमध्ये एका आरोपीला अटक करण्यात आली, तर सात जण आधीच कोठडीत होते. मात्र, या कायदेशीर प्रक्रियेत कॅनडाचे माजी पंतप्रधान जस्टिन ट्रूडो यांनी 2023 मध्ये केलेल्या त्या व्यापक आरोपाचा उल्लेख नाही, ज्यामध्ये निज्जरच्या हत्येत भारत सरकारच्या एजंट्सचा सहभाग असल्याचा दावा करण्यात आला होता. भारताने हे आरोप सातत्याने फेटाळून लावले आहेत आणि त्याऐवजी असा युक्तिवाद केला आहे की, कॅनडाने अतिरेकी संघटना आणि संघटित गुन्हेगारी टोळ्यांना अपुऱ्या देखरेखीखाली काम करण्याची मुभा दिली होती.
निज्जरच्या मृत्यूवरून निर्माण झालेल्या राजनैतिक वादामुळे भारत-कॅनडा संबंधांमध्ये गेल्या काही दशकांतील सर्वात मोठा तणाव निर्माण झाला होता. एप्रिल 2025 मध्ये पंतप्रधान मार्क कार्नी यांच्या निवडीनंतर अलीकडच्या काही महिन्यांत या संबंधांमध्ये सुधारणेची चिन्हे दिसू लागली आहेत. निज्जर प्रकरणाव्यतिरिक्त, सरकारी वकिलांनी बिश्नोई टोळीच्या सदस्यांवर रॅकेटीअरिंगचा (संघटित गुन्हेगारीचा) कट रचणे, ‘हॉब्स ॲक्ट’अंतर्गत खंडणीचा प्रयत्न करणे आणि कोकेन व मेथाम्फेटामाइनच्या वितरणाचा कट रचणे असे आरोप ठेवले. न्याय विभागाने जग्गू भगवानपुरिया आणि रविंदर सिंग धांडा यांच्या नेतृत्वाखालील गटांविरुद्धही आरोप जाहीर केले. या दोन्ही गटांचे वर्णन ‘आंतरराष्ट्रीय गुन्हेगारी टोळ्या’ असे करण्यात आले असून, त्यांचे जाळे अमेरिका, कॅनडा, ब्रिटन, युरोप, ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंडपर्यंत पसरलेले आहे.

Recent Comments