scorecardresearch
Friday, 23 October, 2026
घरराजनैतिकपाकिस्तानमधील इटालियन दूतावासाचा व्हिसाबाबत विद्यार्थ्यांना सावधगिरीचा इशारा

पाकिस्तानमधील इटालियन दूतावासाचा व्हिसाबाबत विद्यार्थ्यांना सावधगिरीचा इशारा

युरोपियन युनियनमध्ये सर्वाधिक पाकिस्तानी समुदाय इटलीमध्ये वास्तव्यास आहे. पाकिस्तान आणि इटली आपल्या व्यापक द्विपक्षीय संबंधांना अधिक दृढ करण्याचा प्रयत्न करत असतानाच ही बाब समोर आली आहे.

नवी दिल्ली: पाकिस्तानमधील इटालियन दूतावासाने गुरुवारी ‘अभ्यास व्हिसा अर्जांसोबत सादर केल्या जाणाऱ्या बनावट किंवा संशयास्पद कागदपत्रांमध्ये झालेली अभूतपूर्व वाढ’ याबद्दल चिंता व्यक्त केली. तसेच, संभाव्य विद्यार्थ्यांना इशारा दिला की, अशा फसव्या कागदपत्रांमुळे केवळ अर्ज फेटाळले जाण्यापलीकडेही गंभीर परिणाम होऊ शकतात.

दूतावासाने विद्यार्थी व्हिसासाठी अर्ज करणाऱ्या पाकिस्तानी नागरिकांना अशा बनावट कागदपत्रांचे (विशेषतः आर्थिक क्षमता किंवा उदरनिर्वाहाच्या पुराव्याशी संबंधित) सादरीकरण टाळण्यास सांगितले आहे. “अभ्यास व्हिसासाठी इच्छुक असलेल्यांना सल्ला दिला जातो की त्यांनी बनावट कागदपत्रे सादर करणे कटाक्षाने टाळावे, विशेषतः उदरनिर्वाहाच्या साधनांशी संबंधित कागदपत्रे. अशा कागदपत्रांमुळे “केवळ त्यांचा सध्याचा व्हिसा अर्ज त्वरित नाकारला जाणार नाही, तर भविष्यातील अर्जांवरही त्याचा नकारात्मक परिणाम होऊ शकतो”. असे दूतावासाने म्हटले आहे.

युरोपियन युनियनमध्ये इटलीमध्ये सर्वाधिक पाकिस्तानी समुदाय (सुमारे 1 लाख 50 हजार पाकिस्तानी) वास्तव्यास आहेत. दूतावासाचा हा इशारा अशा वेळी आला आहे, जेव्हा पाकिस्तान आणि इटली आपापले द्विपक्षीय संबंध अधिक दृढ करण्याचा प्रयत्न करत आहेत. जूनमध्ये, दोन्ही देशांनी राजनैतिक पासपोर्टधारकांसाठी व्हिसाची अट रद्द करण्याबाबतच्या करारावर स्वाक्षरी केली होती. ‘डॉन’च्या वृत्तानुसार, एका अधिकृत निवेदनात म्हटले आहे की, रोममधील इटालियन परराष्ट्र मंत्रालयात आयोजित समारंभात पाकिस्तानचे इटलीतील राजदूत अली जावेद आणि इटलीचे परराष्ट्र व्यवहार सरचिटणीस राजदूत रिकार्डो गुआरिग्लिया यांनी या करारावर स्वाक्षरी केली. या करारामुळे राजनैतिक शिष्टमंडळांची देवाणघेवाण सुलभ होईल आणि पाकिस्तान व इटली यांच्यातील संबंध अधिक दृढ होतील अशी अपेक्षा आहे. या कराराकडे दोन्ही देशांमधील परस्पर विश्वास आणि दीर्घकालीन मैत्रीचे प्रतीक म्हणून पाहिले गेले असून, द्विपक्षीय सहकार्याच्या विद्यमान चौकटीत ही एक उत्तम भर असल्याचे म्हटले गेले आहे.

पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्रालयाने या घडामोडीचे स्वागत केले होते. ‘एक्स’वरील एका पोस्टमध्ये इस्लामाबाद आणि रोम यांच्यातील संबंधांची वाटचाल सकारात्मक असल्याचे वर्णन करण्यात आले आणि दोन्ही बाजूंनी या कराराच्या स्वाक्षरीचे स्वागत केल्याचे म्हटले आहे: “त्यांनी परस्पर हिताच्या सर्व क्षेत्रांमधील सहकार्य अधिक दृढ करण्याच्या आपल्या वचनबद्धतेचा पुनरुच्चार केला आणि संपर्कात राहण्याचे मान्य केले.” या दोन देशांमध्ये आधीपासूनच द्विपक्षीय सहकार्याची व्यापक चौकट अस्तित्वात आहे. पाकिस्तान आणि इटली यांच्यात पर्यटन, संस्कृती, विज्ञान आणि तंत्रज्ञान, क्रीडा, उच्च संरक्षण अभ्यास आणि अंमली पदार्थ विरोधी प्रयत्न यांसारख्या क्षेत्रांचा समावेश असलेले 15 सरकारी-स्तरावरील करार झाले आहेत. याव्यतिरिक्त, दोन्ही देशांमधील विद्यापीठे आणि ‘थिंक टँक्स’ (धोरण अभ्यास संस्था) यांच्यात 21 सामंजस्य करार करण्यात आले आहेत.

‘असोसिएटेड प्रेस ऑफ पाकिस्तान’ने दिलेल्या वृत्तानुसार, इटलीने पुढील तीन वर्षांत 10 हजार 500 पाकिस्तानी कामगारांसाठी कोटा राखीव ठेवला आहे आणि 2025-26 या शैक्षणिक वर्षासाठी 3 हजार 200 हून अधिक विद्यार्थी व्हिसा जारी केले आहेत. गेल्या वर्षी स्वाक्षरी करण्यात आलेल्या द्विपक्षीय स्थलांतरविषयक सामंजस्य करारांतर्गत, इटलीने कामगारांचा कोटा निश्चित केला आहे; तसेच कायदेशीर स्थलांतराला प्रोत्साहन देण्यासाठी आणि कामगारांचे कौशल्य सुधारण्यासाठी ‘प्रवासपूर्व प्रशिक्षण कार्यक्रम’ सुरू केले आहेत.

संबंधित लेख

चुकवू नका

Recent Comments