scorecardresearch
Monday, 17 August, 2026
घरराजनैतिकशेख हसीना यांच्या आभासी संबोधनासंदर्भात बांगलादेशकडून भारताकडे स्पष्टीकरणाची मागणी

शेख हसीना यांच्या आभासी संबोधनासंदर्भात बांगलादेशकडून भारताकडे स्पष्टीकरणाची मागणी

शेख हसीना यांच्या राजकीय हालचालींमुळे भारत-बांगला संबंधांवर ताण येऊ शकतो, असे बांगलादेशने म्हटले आहे; तसेच 'भारताने आपली भूमिका स्पष्ट केली पाहिजे,' असेही नमूद केले आहे. नवी दिल्लीतील 'फॉरेन करस्पॉन्डंट्स क्लब ऑफ साउथ एशिया'ने आयोजित केलेल्या कार्यक्रमातील हसीना यांचा नियोजित सहभाग आणि त्यांची आभासी (व्हर्च्युअल) जाहीर उपस्थिती या पार्श्वभूमीवर हे विधान आले आहे.

नवी दिल्ली: बांगलादेशच्या पदच्युत पंतप्रधान शेख हसीना यांच्या दुसऱ्या आभासी संबोधनासंदर्भात बांगलादेशने भारताकडे स्पष्टीकरण मागितले असून, भारतीय भूमीवरून त्यांच्या राजकीय हालचालींचा द्विपक्षीय संबंधांवर परिणाम होऊ शकतो, असा इशाराही दिला आहे. “आम्ही भारतासोबत दूरदर्शी दृष्टिकोन ठेवून पुढे जात आहोत. आमच्या संबंधांना धक्का लागू नये, अशी आमची इच्छा आहे आणि माझा ठाम विश्वास आहे, की भारतालाही ते नको आहे. त्यामुळे, भारत याला पाठिंबा देत आहे की नाही, हे त्याने स्पष्ट केले पाहिजे,” असे बांगलादेशच्या परराष्ट्र व्यवहार राज्यमंत्री शमा ओबैद इस्लाम यांनी सोमवारी परराष्ट्र मंत्रालयात पत्रकारांना सांगितले.

ऑगस्ट 2024 मध्ये विद्यार्थ्यांच्या नेतृत्वाखालील उठावानंतर बांगलादेशातून पळून गेलेल्या हसीना या भारतात पुन्हा एकदा आभासी (व्हर्च्युअल) माध्यमातून सार्वजनिकरीत्या उपस्थित राहण्याची शक्यता आहे. ज्यादिवशी त्या देशातून पळून गेल्या होत्या, त्याच 5 ऑगस्ट रोजी नवी दिल्लीतील ‘फॉरेन करस्पॉन्डंट्स क्लब ऑफ साउथ एशिया’ने आयोजित केलेल्या कार्यक्रमात त्या सहभागी होणार आहेत. या नियोजित कार्यक्रमाबाबत विचारलेल्या प्रश्नांना उत्तर देताना इस्लाम यांनी सांगितले की, परिस्थितीनुसार नवी दिल्लीसोबत राजनैतिक चर्चा किंवा संपर्क साधणे आवश्यक आहे की नाही, याचा निर्णय ढाका घेईल; असे वृत्त ‘ढाका ट्रिब्यून’ने दिले आहे.

कार्यक्रमापूर्वी बांगलादेश अधिकृतपणे निषेध नोंदवेल किंवा स्पष्टीकरण मागेल का, असे विचारले इस्लाम म्हणाल्या की, ‘हा कार्यक्रम भारत सरकारद्वारे आयोजित केला जात नाही, याची माहिती परराष्ट्र मंत्रालयाला देण्यात आली आहे’. इस्लाम यांनी सांगितले की, बांगलादेशात अस्थिरता निर्माण करण्याच्या उद्देशाने राजकीय हालचालींसाठी भारताच्या भूमीचा वापर करण्यास फरारी किंवा दोषी व्यक्तींना परवानगी दिली जाऊ नये, हे ढाकाने नवी दिल्लीला तोंडी आणि लेखी अशा दोन्ही प्रकारे वारंवार कळवले आहे. हसीना यांच्या या संभाव्य उपस्थितीमुळे द्विपक्षीय संबंधांना हानी पोहोचू शकते का, असे विचारले असता त्या म्हणाल्या, “तसे होऊ शकते. पण आम्हाला ते नको आहे.” वाद असूनही, इस्लाम यांनी यावर भर दिला, की बांगलादेश भारतासोबतचे संबंध दृढ करण्यासाठी कटिबद्ध आहे. “आम्हाला भारतासोबतचे संबंध सुधारावेत, असे वाटते. मला विश्वास आहे, की भारतालाही तेच हवे आहे,” असे त्या पुढे म्हणाल्या.

पंतप्रधानांचे परराष्ट्र व्यवहार सल्लागार हुमायून कबीर आणि बांगलादेशातील भारताचे नवनियुक्त उच्चायुक्त दिनेश त्रिवेदी यांची सोमवारी भेट झाली. या भेटीत कबीर यांनी सांगितले की, “फरारी हसीना यांच्यासह कोणत्याही व्यक्तीने बांगलादेशात अस्थिरता निर्माण करण्याच्या उद्देशाने राजकीय विधाने करण्यासाठी किंवा कोणतीही कृती करण्यासाठी भारताच्या भूमीचा वापर करू नये,” हे सुनिश्चित करण्यासाठी ढाका नवी दिल्लीच्या सहकार्याची अपेक्षा करते. त्यांनी पुढे नमूद केले की, अशा प्रकारच्या कृतींमुळे दोन्ही देशांमधील द्विपक्षीय संबंधांच्या सकारात्मक प्रगतीला बाधा येऊ शकते. भारतीय उच्चायुक्तांनी बांगलादेशी अधिकाऱ्यांना आश्वासन दिले की, “या प्रकरणाचा योग्य विचार केला जाईल, आवश्यक चौकशी केली जाईल आणि यासंदर्भात प्रयत्न केले जातील.”

भेटीनंतर परराष्ट्र मंत्रालयाने जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, ‘फरारी शेख हसीना 5 ऑगस्ट रोजी सार्वजनिक विधान करू शकतात, ही बाब चर्चेदरम्यान उपस्थित करण्यात आली होती. बांगलादेशला या प्रकरणात भारताच्या सहकार्याची अपेक्षा आहे; कारण बांगलादेशातील उच्चायुक्तांसह त्यांचे संपूर्ण मिशन बांगलादेशात अस्थिरता निर्माण करण्याच्या उद्देशाने कोणतीही कृती करू शकत नाही’, असे उच्चायुक्तांनी नमूद केले आहे. अशा प्रकारच्या कृतींमुळे द्विपक्षीय संबंधांमधील सकारात्मक प्रगतीला बाधा येऊ शकते, असेही त्यांनी म्हटले आहे. या मुद्द्याबाबत आवश्यक ती खबरदारी घेण्याच्या आणि सतर्क राहण्याच्या गरजेवर उच्चायुक्तांनी भर दिला,” असे त्यात पुढे म्हटले आहे.

संबंधित लेख

चुकवू नका

Recent Comments