scorecardresearch
Wednesday, 17 June, 2026
घरदेशमोहन भागवत यांची अमेरिकेच्या 'अमेरिका फर्स्ट' धोरणावर टीका

मोहन भागवत यांची अमेरिकेच्या ‘अमेरिका फर्स्ट’ धोरणावर टीका

केवळ स्वतःच्या स्वार्थाला प्राधान्य देण्याच्या अमेरिकेच्या दृष्टिकोनावर टीका करताना, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी सोमवारी म्हटले की, "जर संपूर्ण जगाने अमेरिकन जीवनशैलीचा स्वीकार केला, तर मानवजातीच्या अस्तित्वासाठी पृथ्वीसारखे अनेक ग्रहही पुरेसे पडणार नाहीत.

नवी दिल्ली: केवळ स्वतःच्या स्वार्थाला प्राधान्य देण्याच्या अमेरिकेच्या दृष्टिकोनावर टीका करताना, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी सोमवारी म्हटले की, “जर संपूर्ण जगाने अमेरिकन जीवनशैलीचा स्वीकार केला, तर मानवजातीच्या अस्तित्वासाठी पृथ्वीसारखे अनेक ग्रहही पुरेसे पडणार नाहीत. भारताचा ‘विश्वगुरू’ म्हणून होणारा उदय हा आपल्या सांस्कृतिक मूल्यांवर आधारित असावा आणि त्याचे उद्दिष्ट जगात शांतता व समृद्धी आणणे हे असावे. त्यांनी नमूद केले की, आर्थिक समृद्धीला संयम, नैतिक आचरण आणि इतरांच्या कल्याणाची जाणीव यांची जोड असायला हवी”.

भारताने इतर राष्ट्रांचे अनुकरण करू नये यावर भर देत भागवत म्हणाले, “जर भारत महासत्ता बनला आणि अमेरिका व चीनसारखा वागू लागला, तर तो भारत राहणार नाही. जेव्हा भारत जागा होतो आणि समर्थ बनतो, तेव्हा जगात शांतता आणि आनंद येतो. लोकांचे परस्पर संबंध अधिक सामंजस्यपूर्ण आणि शांततापूर्ण होतात.”

नवी दिल्ली येथे ‘हिरो एंटरप्राइझ’तर्फे आयोजित 18 व्या ‘बीएमएल मुंजाल पुरस्कार’ सोहळ्यात मुख्य भाषण करताना भागवत यांनी ही मते मांडली. ते म्हणाले की, भारत ही केवळ एक भौगोलिक संकल्पना नसून ती एक चिरंतन संस्कृती आहे, जिने आक्रमणे, परकीय राजवट आणि ऐतिहासिक उलथापालथींचा सामना करून आपले अस्तित्व टिकवून ठेवले आहे. अमेरिकेच्या अति-उपभोगवादी विकास प्रारूपावर (मॉडेलवर) टीका करताना ते म्हणाले: “सर्वोत्तम जीवनमानाचा संबंध अनेकदा अमेरिकेशी जोडला जातो. पण जर आपण, म्हणजे 142 कोटी भारतीयांनी अमेरिकेसारखे जगणे सुरू केले, तर एक पृथ्वी पुरेशी ठरणार नाही; त्यासाठी सहा पृथ्वींची गरज लागेल. संसाधनांवर इतरांचाही हक्क आहे, याचा विचार न करता ते पृथ्वीवरील संसाधनांचा इतका अविचारी वापर करत आहेत.” भागवत पुढे म्हणाले की, इतर देशांशी असलेले संबंध अनेकदा ‘अमेरिकन हितसंबंधांना प्राधान्य’ या एकाच अटीवर ठरवले जातात.

त्यांनी एका घटनेचा उल्लेख केला, ज्यात एका अमेरिकन व्यक्तीने सांगितले होते की, आर्थिक तसेच संरक्षण आणि लष्करी क्षेत्रांसारख्या विविध आघाड्यांवर भारत आणि अमेरिका ‘नैसर्गिक मित्र’ बनू शकतात, अट एवढीच की, अमेरिकेच्या हितसंबंधांचे रक्षण झाले पाहिजे.” स्वार्थावर आधारित जागतिक व्यवस्थेच्या पार्श्वभूमीवर भारताच्या सांस्कृतिक मूल्यांचे महत्त्व अधोरेखित करताना भागवत म्हणाले की, देश अनेकदा तेव्हाच मैत्री आणि सहकार्य करतात जेव्हा त्यांचे धोरणात्मक किंवा आर्थिक हितसंबंध साधले जातात. “ते (अमेरिका) इतके श्रीमंत आहेत की, उर्वरित जगाला काही देण्याचा ते विचारही करत नाहीत. असे का? कारण त्यांना याची जाणीव नाही आणि त्यांनी याचा अनुभवही घेतलेला नाही. त्यांच्यात ‘आपलेपणाची’ भावना नाही,” असे ते म्हणाले.

कर्तव्य आणि सद्भावनेवर आधारित वेगळ्या दृष्टिकोनाचे उदाहरण म्हणून त्यांनी संकटाच्या काळात भारताने शेजारील देशांना केलेल्या मदतीचा उल्लेख केला; यात मालदीवला पाणीपुरवठा करणे आणि श्रीलंकेला आधार देणे यांचा समावेश होता. “आपण कदाचित प्रत्येकाला मदत करण्याइतके श्रीमंत नसू, पण जेव्हा शेजारी संकटात असतात, तेव्हा आपण त्यांच्या पाठीशी उभे राहतो. इतरांप्रमाणे केवळ वैयक्तिक संपत्तीचा साठा करण्याऐवजी भारताने ऐतिहासिकदृष्ट्या समृद्धीकडे सामूहिक कल्याणाचे साधन म्हणून पाहिले आहे. तसेच, चारित्र्याविना असलेली सत्ता विनाशकारी ठरू शकते, असा इशारा देत त्यांनी आर्थिक सामर्थ्य निर्माण करण्याचे आवाहनही केले. “जेव्हा भारत प्रगती करतो, तेव्हा केवळ भारताचाच फायदा होत नाही. जेव्हा भारताची वाढ होते, तेव्हा जगभरात शांतता आणि आनंद पसरतो. एकाच प्रयत्नात तीन उद्देश साध्य होतात: व्यक्तीचे कल्याण, राष्ट्राचे कल्याण आणि भावी पिढ्यांचे कल्याण,” असे ते म्हणाले.

भारताच्या भविष्याबद्दल विश्वास व्यक्त करताना भागवत म्हणाले की, आगामी दशकांमध्ये देश जागतिक नेता म्हणून उदयास येऊ शकतो; तसेच त्यांनी स्पष्ट केले, की त्यांची संघटना तंत्रज्ञानाच्या विरोधात नाही. “माझा विश्वास आहे, की पुढील 20 ते 30 वर्षांत भारत जगातील प्रथम क्रमांकाचा देश बनेल. भारत ‘विश्वगुरू’ बनेल. तो शक्तिशाली होईल, पण त्या शक्तीचा वापर जगाच्या कल्याणासाठी करेल. भारत मानवतेचा मार्गदर्शक बनेल. हेच आमचे स्वप्न (दृष्टिकोन) आहे,” असे ते म्हणाले. “जग शक्तिशाली लोकांचे म्हणणे ऐकते आणि म्हणूनच भारताला सर्व प्रकारच्या सामर्थ्याची गरज आहे. परंतु शक्तीसोबतच चांगला हेतू आणि चारित्र्य असणे आवश्यक आहे”. असे म्हणणे त्यांनी मांडले. त्यांनी श्रमप्रतिष्ठा, समृद्धीचे समान वाटप, नैतिक मार्गाने संपत्तीची निर्मिती आणि राष्ट्रनिर्माणात तरुण पिढीची भूमिका यांवरही भर दिला.

“गंगा नदी हजारो वर्षांपासून वाहत आहे. ती प्राचीन आहे, तरीही त्यातील वाहणारे पाणी नेहमीच नवीन असते. गंगा ही शाश्वत आणि सतत नूतनीकरण होणारी आहे. भारतही तसाच शाश्वत आणि सतत नूतनीकरण होणारा आहे. भारत हे केवळ एका भौगोलिक प्रदेशाचे नाव नाही. भारत हे एका अस्तित्वाचे, एका सांस्कृतिक-सभ्यताविषयक ओळखीचे नाव आहे. भारत हा सनातन आणि सतत नूतनीकरण होणारा देश आहे. पिढ्या येतात आणि जातात, पण त्या एकाच मार्गावरून चालत राहतात. सर्व काही ‘जनरेशन झेड’ला अनुसरून आणि पूर्णपणे वेगळ्या स्वरूपात दिसत असले, तरी तिथेही भारत अस्तित्वात आहे. तुम्ही तुमच्या संकल्पनेत म्हटल्याप्रमाणे, खरी संपत्ती ही इथली माणसे आहेत,” असेही त्यांनी नमूद केले.

भागवत म्हणाले, की “भारताच्या प्रगतीचा लाभ केवळ देशालाच नाही, तर संपूर्ण जगाला होईल. सेवा, देशभक्ती आणि चारित्र्य ही मूल्ये पुढे नेण्यासाठी भारताने आपल्या तरुण पिढीला तयार केले पाहिजे. भारताकडे पर्यावरण ऱ्हास आणि अयोग्य उपभोग पद्धतींसारख्या जागतिक आव्हानांवर उपाय सुचवणारे विचार आहेत आणि जागतिक आव्हानांचा सामना करण्यात भारत एक अद्वितीय भूमिका बजावू शकतो. जग आपल्या अनेक समस्यांवर उपाय शोधत आहे. काही समस्यांवर इतरत्र यशस्वीरीत्या उपाययोजना केल्या गेल्या आहेत, परंतु अशी काही अपूर्ण कामे आहेत जी केवळ भारतच आपल्या प्राचीन संस्कृतीतील ज्ञानाच्या बळावर पूर्ण करू शकतो,” असे प्रतिपादन त्यांनी केले.

त्यांनी संपत्ती आणि संधींच्या न्याय्य वाटपाचे आवाहन करतानाच, समृद्धी केवळ काही मोजक्या लोकांच्या हातात केंद्रित राहू नये, यावरही जोर दिला. “आपण विपुल प्रमाणात समृद्धी निर्माण केली पाहिजे. आपण अतिरिक्त उत्पादन (सरप्लस) निर्माण केले पाहिजे. परंतु ती समृद्धी प्रत्येकापर्यंत पोहोचली पाहिजे. मोठ्या प्रमाणावरील उत्पादन (मास प्रॉडक्शन) महत्त्वाचे आहेच, पण लोकांचा सहभाग असलेले उत्पादन (प्रॉडक्शन बाय द मासेस) हे तितकेच महत्त्वाचे आहे. राष्ट्राची खरी संपत्ती ही तिथली नैसर्गिक संसाधने आणि लोकांची कष्टाळू वृत्ती यातच असते,” असे ते म्हणाले.

संबंधित लेख

चुकवू नका

Recent Comments