scorecardresearch
Wednesday, 10 June, 2026
घरदेशविशाखापट्टणम येथील आरआयएनएल स्टील प्लांटमध्ये स्फोट, आठ जणांचा मृत्यू

विशाखापट्टणम येथील आरआयएनएल स्टील प्लांटमध्ये स्फोट, आठ जणांचा मृत्यू

सोमवारी संध्याकाळी विशाखापट्टणम स्टील प्लांट लिमिटेडमध्ये लागलेल्या आगीच्या दुर्घटनेत किमान आठ कामगारांचा मृत्यू झाला असून, अन्य सहा जण मृत्यूशी झुंज देत आहेत. ही दुर्घटना दुपारी 4:15 च्या सुमारास घडली.

हैदराबाद: सोमवारी संध्याकाळी विशाखापट्टणम स्टील प्लांट लिमिटेडमध्ये लागलेल्या आगीच्या दुर्घटनेत किमान आठ कामगारांचा मृत्यू झाला असून, अन्य सहा जण मृत्यूशी झुंज देत आहेत. ही दुर्घटना दुपारी 4:15 च्या सुमारास घडली. वितळलेले लोह (मोल्टन आयर्न) वाहून नेणाऱ्या एका मोठ्या पात्रातून लोहगळती होऊन ते एका क्रेनवर पडले. यामुळे ‘स्टील मेल्ट शॉप (एसएमएस)-1’ आणि ‘कंटिन्यूअस कास्टिंग डिपार्टमेंट’च्या (सीसीडी) ‘एसटीसी-3’ विभागात अचानक स्फोट झाला.

1 हजार 500 अंश सेल्सिअस तापमानाचे वितळलेले लोह सांडले, तेव्हा भट्टीजवळ सुमारे 14 लोक होते. या घटनेमुळे शॉप फ्लोअरचे मोठे नुकसान झाले आणि कामगारांमध्ये घबराट पसरली. सुमारे 10 हजार लोकांना रोजगार देणाऱ्या या 43  वर्षे जुन्या स्टील प्लांटमधील आग विझवण्याचा आणि परिस्थिती नियंत्रणात आणण्याचा अग्निशमन दलाने प्रयत्न केला. आठ कामगारांचे मृतदेह, ज्यामध्ये पाच कायमस्वरूपी कर्मचारी आणि तीन कंत्राटी कामगारांचा समावेश होता. पूर्णपणे जळलेल्या अवस्थेत आढळले. पोलाद आणि अवजड उद्योग राज्यमंत्री भूपती राजू श्रीनिवास वर्मा यांनी ‘द प्रिंट’ला दुजोरा दिला की, जखमी सहा कामगारांपैकी चौघांची प्रकृती उपचारांना चांगला प्रतिसाद देत आहे. ते म्हणाले, “आम्ही अनाकापल्ली जिल्ह्यातील (जिथे हा स्टील प्लांट आहे) पोलीस आणि महसूल अधिकाऱ्यांच्या संपर्कात आहोत आणि आम्हाला दर तासाला माहिती दिली जात आहे. दोन कामगारांची प्रकृती अजूनही गंभीर आहे, परंतु त्यांना सर्वोत्तम उपचार मिळतील याची आम्ही खात्री करत आहोत.”

स्टील प्लांटवर सर्वप्रथम पोहोचणाऱ्यांमध्ये विझागचे खासदार माथुकुमिली श्रीभारत आणि आंध्रप्रदेशच्या गृहमंत्री वंगलापुडी अनिता यांचा समावेश होता. स्थानिक प्रसारमाध्यमांच्या वृत्तानुसार, त्यांनी कामगारांशी संवाद साधला आणि त्यांना सुरक्षिततेची व मदतीची ग्वाही दिली. मंत्री परिस्थितीचा आढावा घेत असतानाच, संतप्त कामगारांनी त्यांना घेराव घातला. राष्ट्रीय इस्पात निगम लिमिटेड (आरआयएनएल) किंवा विझाग स्टील प्लांटमध्ये सुरक्षा लेखापरीक्षण प्रलंबित असल्याचा आरोप कामगारांनी केला. शेजारील प्लांटमधील कामगारांच्या एका गटाने शॉप फ्लोअरवरील कमी झालेली मनुष्यबळ संख्या आणि कर्मचाऱ्यांच्या अचानक कपातीमुळे वाढलेला कामाचा ताण यांकडे लक्ष वेधले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री एन. चंद्राबाबू नायडू आणि एचआरडी मंत्री एन. लोकेश यांनी या दुर्घटनेबद्दल तीव्र दुःख व्यक्त केले. पंतप्रधान मोदींनी मृतांच्या कुटुंबीयांना ‘पंतप्रधान राष्ट्रीय मदत निधी’तून 2 लाख रुपयांची अनुग्रह रक्कम जाहीर केली. जखमींना 50 हजार रुपयांची मदत दिली जाईल, असेही मोदींच्या कार्यालयाने नमूद केले. ‘एक्स’वर आपली व्यथा व्यक्त करताना नायडू म्हणाले, “विशाखापट्टणम स्टील प्लांटमधील अपघातामुळे मला मोठा धक्का बसला आहे. या अपघातात अनेक कामगारांचा मृत्यू झाल्याचे समजून मला अत्यंत दुःख झाले आहे. मी संबंधित अधिकाऱ्यांशी चर्चा केली असून, सर्व सरकारी विभागांच्या समन्वयाने मदतकार्य हाती घेण्याचे निर्देश त्यांना दिले आहेत.”

संबंधित लेख

चुकवू नका

Recent Comments