scorecardresearch
Wednesday, 19 August, 2026
घरदेश‘देशात समलिंगी सहजीवनासाठी कायद्यांची गरज’: मोहन भागवत

‘देशात समलिंगी सहजीवनासाठी कायद्यांची गरज’: मोहन भागवत

भागवत यांच्या मते, समलिंगी विवाह पद्धतीमुळे विवाहसंस्थेला बाधा पोहोचेल. आरक्षणाच्या मुद्द्यावर त्यांनी असे नमूद केले की, 'जोपर्यंत समाजात भेदभाव अस्तित्वात आहे, तोपर्यंत आरक्षण आवश्यक राहील'.

मुंबई: राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रमुख मोहन भागवत यांनी गुरुवारी सांगितले की, ‘भारतात समलिंगी सहजीवनासाठी निर्णायक नियम आणि कायद्यांची गरज आहे’, परंतु त्यांनी समलिंगी विवाहाला विरोध केला. त्यांच्या मते, यामुळे विवाहसंस्थेच्या मूळ तत्त्वांनाच धक्का पोहोचेल. “एलजीबीटी समुदायाचे सदस्यदेखील आपल्या समाजाचा एक भाग आहेत, आणि समाजाने त्यांना स्थान दिले पाहिजे,” असे भागवत यांनी मुंबईत इंडिया इंटरनॅशनल मूव्हमेंट टू युनाईट नेशन्स (आयआयएमयूएन) द्वारे आयोजित एका कार्यक्रमात सांगितले.

‘संघ एलजीबीटीक्यू प्लस विवाहांना पाठिंबा का देत नाही’, असे विचारले असता, भागवत म्हणाले की, ‘असे केल्याने विवाहाच्या पारंपरिक संस्थेचे महत्त्व कमी होईल’. “भारतीय समाजात, विवाहाचा उद्देश केवळ दोन व्यक्तींनी एकत्र राहणे हा नाही. विवाह ही संस्था सुसंततीचे संगोपन करण्यासाठी आणि एक मजबूत समाज घडवण्यासाठीदेखील ओळखली जाते,” असे त्यांनी नमूद केले. “जर आपण सध्याची व्यवस्था विस्कळीत केली, तर त्यातून संघर्ष निर्माण होईल. या दृष्टिकोनातून पाहता, समलिंगी विवाहाला ‘विवाह’ मानले जाऊ नये.” असेही प्रतिपादन त्यांनी केले. भारत आणि त्याचे शेजारी देश, पाकिस्तान व चीन, यांच्यातील संघर्षाबाबत विचारले असता भागवत म्हणाले की, संघर्षाच्या काळात लोकांनी सरकारच्या सूचनांचे पालन केले पाहिजे.

“सामंजस्य आणि शांतता राखणे हाच भारतीय दृष्टिकोन आहे. कायमस्वरूपी द्वेष किंवा शत्रुत्व नसावे, कारण मानवता एकच आहे. परंतु संघर्षाच्या काळात, सरकारने दिलेल्या सूचनांचे पालन केले पाहिजे.” ते म्हणाले. भागवत यांनी आरक्षणाच्या मुद्द्यावरही भाष्य केले आणि सांगितले की, सामाजिक कारणांमुळे ते आवश्यक ठरले आहे. “जोपर्यंत सामाजिक भेदभाव अस्तित्वात आहे, तोपर्यंत आरक्षणाची गरज कायम राहील. आरक्षण हा राजकारणाचा विषय बनता कामा नये. जर सर्व सुधारणावादी उपाय प्रामाणिकपणे आणि प्रभावीपणे राबवले गेले, तर कालांतराने आरक्षणाची गरज कदाचित संपू शकेल,” असे ते म्हणाले. समाजात आणि संघटनेत महिलांच्या भूमिकेकडे राष्ट्रीय स्वयंसेवक संघ कशा प्रकारे पाहतो, यावरही भागवत यांनी भाष्य केले. ‘महिलांची भूमिका ही समान आणि पूरक मानली गेली पाहिजे’, असे ते म्हणाले.

त्यांच्या मते, सुमारे 100 वर्षांपूर्वी जेव्हा संघाची सुरुवात झाली, तेव्हा जर त्याचे नेतृत्व महिलांनी केले असते, तर संघाची इतकी प्रगती झाली नसती. त्यांनी सांगितले की, म्हणूनच महिलांसाठी एक स्वतंत्र समांतर संघटना स्थापन करण्यात आली, जेणेकरून त्या पुरुषांच्या संघटनेच्या कारभारात हस्तक्षेप करणार नाहीत आणि पुरुष त्यांच्या कार्यात हस्तक्षेप करणार नाहीत. “संघात महिलांना स्थान नाही, हा समज चुकीचा आहे,” असे भागवत म्हणाले.

संबंधित लेख

चुकवू नका

Recent Comments