नवी दिल्ली: पुण्याच्या सिया गोयलला तिच्या होणाऱ्या पतीची हत्या केल्याप्रकरणी तिच्या प्रियकरासह अटक करण्यात आली आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, सियाने तिच्या कुटुंबीयांना सांगितले होते, की तिला ‘ज्या व्यक्तीशी तिचा साखरपुडा झाला होता, त्याच्याशी लग्न करायचे नाही’. 18 जून रोजी त्याला मारण्यात यश मिळण्यापूर्वी तिने त्याला संपवण्याचे किमान दोनदा प्रयत्न केले होते. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार चौकशीदरम्यान असे समोर आले, की सिया आणि तिचा होणारा पती केतन अग्रवाल 31 मे रोजी लोहगड किल्ल्यावर ट्रेकिंगसाठी गेले होते; तेव्हाच तिने तिचा प्रियकर चेतन चौधरी याच्या संगनमताने केतनला संपवण्याचा निर्णय घेतला.
“तिने आपल्या प्रियकरासोबत हा कट रचला. (31 मे रोजी). तिला माहीत होते, की जर केतनला किल्ल्यावरून खाली ढकलले, तर ती घटना अपघात असल्याचे भासवता येईल,” असे या प्रकरणाचा तपास करणाऱ्या अधिकाऱ्याने बुधवारी सांगितले. सखोल चौकशीदरम्यान सियाने या कटाचा खुलासा केला. “तिने 4 जून रोजी तिला किल्ल्यावर नेण्यासाठी केतनचे मन वळवले, परंतु त्याच्या कुटुंबीयांनी त्याला न जाण्यास सांगितले. तिने वाट पाहणे सुरूच ठेवले. त्यानंतर, 14 जून रोजी तिने पुन्हा एकदा केतनला तिला तिथे नेण्यास राजी केले आणि तो गेला. मात्र, जेव्हा तो किल्ल्यावरून पडता-पडता वाचला, तेव्हा संशय टाळण्यासाठी तिने आरडाओरडा केला, साप दिसल्याचे सांगितले आणि त्याला मिठी मारली. नक्की काय घडले होते, याचा केतनला पत्ताही लागला नाही,” असे अधिकाऱ्याने सांगितले. पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार,4 ते 14 जून या काळात तिने त्याला किल्ल्यावर नेण्यासाठी अनेकदा प्रयत्न केले.
पहिला प्रयत्न योजनेनुसार का यशस्वी झाला नाही, यावर सिया आणि चेतन यांनी चर्चा केली. त्यानंतर चेतनने सियाला सांगितले की केतनला 18 जून रोजी पुन्हा किल्ल्यावर घेऊन यावे. यावेळी सर्व काही त्यांच्या योजनेनुसार घडले: केतनला कथितरीत्या कड्यावरून 400 फूट खोल दरीत ढकलण्यात आले आणि त्यात त्याचा मृत्यू झाला. सिया, तिचा होणार असलेला पती केतन आणि प्रियकर चेतन हे तिघेही व्यावसायिक कुटुंबातील आहेत. घटनेनंतर सियाने पोलिसांना फोन करून सांगितले की, बाहेर फिरताना आणि फोटो काढत असताना जोराच्या वाऱ्यामुळे केतन पाय घसरून पडला. पोलिसांनी सांगितले की, घटनेच्या वेळी सियाने दिलेल्या माहितीच्या आधारे या प्रकरणाकडे ‘अपघाती मृत्यू’ म्हणून पाहिले गेले होते. परंतु, आरोपीच्या जबाबात अनेक विसंगती आढळल्याने पोलिसांनी अधिक सखोल तपास सुरू केला आणि तेव्हा या कथित कटाचा पर्दाफाश झाला. मंगळवारी सिया आणि चेतन यांना अटक करण्यात आली. अटकेनंतरच्या सखोल चौकशीदरम्यान, सियाने पोलिसांना सांगितले, की तिने आपल्या कुटुंबीयांना केतनशी लग्न न करण्याची इच्छा बोलून दाखवली होती, परंतु त्यांनी तिचे म्हणणे ऐकले नाही.
उन्हाळ्याच्या दिवसात ‘हुडी’
दरम्यान, केतनच्या वडिलांनी पोलिसांना सांगितले, की त्यांचा मुलगा गिर्यारोहक (ट्रेकर) होता आणि तो सहजपणे पाय घसरून खाली पडून मरण पावला असेल, यावर त्यांचा विश्वास बसत नव्हता. पोलिसांनी किल्ल्यावरील सीसीटीव्ही फुटेज तपासण्यास सुरुवात केली. तपास अधिकाऱ्यांनी सांगितले की, त्यांना किल्ल्यावर एक व्यक्ती फिरताना दिसली. त्याने ‘हुडी’ आणि शॉर्ट्स घातले होते आणि त्याचा चेहरा झाकलेला होता. पोलिसांच्या तपासातील हा एक अत्यंत महत्त्वाचा दुवा ठरला. “आम्ही 18 जूनचे तापमान तपासले असता, त्या दिवशी सकाळी तापमान 33 अंश सेल्सिअस होते. घटनास्थळावरील सीसीटीव्ही फुटेज तपासताना आम्हाला तो माणूस दिसला; त्याने डोक्यावर हुडी घातली होती आणि कानात हेडफोन्सही लावले होते. इतक्या उन्हात कोणी हुडी का घालेल?” असे अधिकाऱ्याने सांगितले. तपासादरम्यान, कुटुंबीय आणि मित्रांचे जबाब तपासले असता, सियाचे चेतनसोबत प्रेमसंबंध असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले.
“18 जूनच्या घटनेनंतर सियाने फारसे कोणाशी संपर्क ठेवला नाही, पण इन्स्टाग्रामवर ‘स्टोरीज’ पोस्ट केल्या. त्यात तिने केतन तिच्या वाढदिवसाच्या आदल्या दिवशीच तिला कसे सोडून गेला, याबद्दल खंत व्यक्त केली होती. तिने सांगितले की दोघांनी महाबळेश्वरला जाण्याचे नियोजन केले होते. त्याने तिच्यासाठी भेटवस्तूही आणल्या होत्या. ही घटना अपघाती मृत्यू वाटावा, अशी परिस्थिती तिने निर्माण केली होती,” असेही अधिकाऱ्याने सांगितले. पोलिसांच्या म्हणण्यानुसार, चौकशीदरम्यान सियाने कबूल केले, की तिला केतनशी लग्न करायचे नव्हते आणि चेतनसोबतच्या तिच्या नात्यात केतन हा अडथळा वाटत होता. म्हणूनच दोघांनी मिळून केतनच्या हत्येचा कट रचला. दरम्यान, केतनच्या कुटुंबीयांनी ‘द प्रिंट’ला सांगितले की, गोयल कुटुंबाला सिया आणि चेतन यांच्यातील प्रेमसंबंधांची कल्पना होती. तरीही, त्यांनी या लग्नासाठी आग्रह धरला, असे केतनच्या वडिलांनी सांगितले. “सियाचा भाऊ, आई आणि मावशी यांच्यासह तिच्या कुटुंबाला या नात्याबद्दल माहिती होती. मात्र, सियाच्या लग्नासाठी ‘अग्रवाल’ हे कुटुंब अधिक योग्य आहे, याची त्यांना जाणीव होती. जर त्यांनी तिला तिच्या इच्छेनुसार लग्न करू दिले असते, तर माझा मुलगा आज जिवंत असता.” असे केतनचे वडील विशाल अग्रवाल यांनी ‘द प्रिंट’ला सांगितले.
त्यांनी सांगितले की, त्यांचे कुटुंब गोयल कुटुंबाला 35 वर्षांहून अधिक काळापासून ओळखत होते आणि त्यांना त्यांच्या वागणुकीत कधीही काहीही संशयास्पद आढळले नव्हते. “तिचे कुटुंब त्यांच्या नात्यात खूप हस्तक्षेप करायचे. तिने माझ्या मुलाचा जीव का घेतला, हे मला समजत नाही. ती फक्त ‘नाही’ म्हणू शकली असती किंवा आमच्याशी बोलू शकली असती.” असे विशाल म्हणाले. तसेच, ‘या हत्येच्या कटात सहभागी असलेल्या प्रत्येकाला पोलिसांनी अटक केली पाहिजे’, अशी मागणीही त्यांनी केली.

Recent Comments