नवी दिल्ली: जंतर मंतर येथे कॉकरोच जनता पार्टीच्या (सीजेपी) आंदोलनाच्या एक दिवस आधी, आगामी आंदोलन आणि त्याच्या कार्यक्रमाबद्दल माहिती दिल्याबद्दल दिल्ली पोलिसांनी एका तरुण विद्यार्थिनीवर कथितरीत्या दबाव आणून तिचा मानसिक छळ केला. या प्रकरणाची दखल घेत, डाव्या नेत्या वृंदा करात यांनी दिल्ली विद्यापीठाची (डीयू) पदव्युत्तर विद्यार्थिनी असलेल्या आहाना सिंग कैथ यांच्याशी संबंधित या प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी करत दिल्ली पोलीस आयुक्त सतीश गोलचा यांना पत्र लिहिले.
“राजिंदर नगर पोलीस ठाण्याच्या बेकायदेशीर कारवाईत तातडीने हस्तक्षेप करण्याची मागणी करत मी तुम्हाला पत्र लिहित आहे. संबंधित पोलीस अधिकाऱ्यांवर आणि ज्यांनी एका तरुण महिलेचा छळ, दहशत, भीती दाखवणे आणि तिच्यावर दबाव टाकण्याचे बेकायदेशीर आदेश दिले, त्यांच्यावर कारवाई झालीच पाहिजे,” असे त्यांनी शहर पोलीस प्रमुखांना लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे. आहानाच्या म्हणण्यानुसार, 5 जून रोजी दुपारी 12.15 च्या सुमारास ती राजिंदर नगरमधील तिच्या जिममध्ये पोहोचली होती, तेव्हा रिसेप्शनिस्टने तिला सांगितले, की पोलीस तिचा शोध घेत आहेत. “चार-पाच पोलिसांनी मला पटकन घेरले आणि श्रीराम आयएएस यांच्या तळघरात नेले, जिथे त्यांनी माझ्यावर प्रश्नांचा भडीमार केला,” असे तिने ‘द प्रिंट’ला सांगितले.
“तुम्ही सीजेपीचा भाग आहात. आम्हाला सांगा, त्यात आणखी कोण कोण आहेत? उद्याची तुमची योजना काय आहे? इथून आणखी कोण जाणार आहेत? सध्याच्या सरकारबद्दल तुमचे काय मत आहे? तुमचा राजकीय कल काय आहे?” असे प्रश्न तिला विचारले गेल्याचे आहानाने सांगितले. जंतर मंतर येथील सीजेपीचे आंदोलन 6 जून रोजी झाले. जेव्हा तिने सीजेपीशी कोणताही संबंध नाकारला, तेव्हा पोलिसांनी कथितरित्या ‘ती सीजेपीमध्ये आहे हे मान्य करण्यासाठी तिच्यावर दबाव टाकला’. “जेव्हा मी पक्षाशी कोणताही संबंध असल्याचे मान्य केले नाही, तेव्हा त्यांनी माझा फोन तपासण्यास सांगितले, पण मी नकार दिला. मी त्यांना सांगितले, की त्यांच्याकडे वॉरंट नसल्यामुळे, मी माझ्या उपस्थितीतच त्यांना माझा फोन पाहू देईन,” असे ती म्हणाली. यानंतर, पोलिसांनी कथितरित्या तिच्यासमोरच तिचे कॉल रेकॉर्ड आणि व्हॉट्सॲप चॅट्स तपासले.
“तिथे एक भारतीय पोलीस सेवा (आयपीएस) अधिकारी, शिवम, उपनिरीक्षक रीटा आणि इतर काही अधिकारी होते. त्यानंतर त्या अधिकाऱ्यांनी मला व्हॉट्सॲपवर माझे लाईव्ह लोकेशन शेअर करण्यास सांगितले आणि कळवले, की माझ्यासाठी एक अधिकारी नेमण्यात आला आहे, जो माझ्या निवासस्थानाजवळ तैनात असेल,” असे ती म्हणाली. संध्याकाळी सुमारे साडेसात वाजता जेव्हा आहानाला अनोळखी नंबरवरून एकापाठोपाठ दोन फोन आले, तेव्हा तिने तात्काळ पोलिसांना याची माहिती दिली. “फोन करणाऱ्यांनी मला विचारले, की सीजेपीच्या आंदोलनात सामील होण्यासाठी त्यांनी उद्या (शनिवारी) काय करावे? मी त्यांना सांगितले, की मी सीजेपीची नेती नाही आणि मला त्याबद्दल काहीही माहिती नाही,” असे तिने सांगितले. पदव्युत्तर पदवीच्या अंतिम वर्षात शिकणारी ही विद्यार्थिनी यापूर्वी स्टुडंट्स फेडरेशन ऑफ इंडिया (एसएफआय) चा भाग होती आणि जुलै 2024 मध्ये राजेंद्रनगर येथील तळघरात तीन नागरी सेवा उमेदवार बुडून मरण पावल्यानंतरच्या आंदोलनात तिने सहभाग घेतला होता.
त्यानंतर, गेल्या ऑगस्टमध्ये तिने राजधानीत झालेल्या कर्मचारी निवड आयोगाच्या (एसएससी) आंदोलनात भाग घेतला होता. “गेल्या वर्षभरापासून मी कोणत्याही आंदोलनात सहभागी झालेली नाही आणि नागरी सेवा परीक्षेची तयारी करत आहे, तरीही कोणताही पुरावा नसताना माझा छळ आणि पाळत ठेवण्यात आली आहे,” असे तिने ‘द प्रिंट’ला सांगितले. या दिल्ली विद्यापीठाच्या विद्यार्थिनीने आरोप केला आहे की, उपनिरीक्षक रितू जाखर यांनी 5 जून (शुक्रवार) ते 6 जून (शनिवार) दुपारपर्यंत तिच्यावर पाळत ठेवली. “त्यांनी मला सांगितले की, जोपर्यंत आंदोलन संपत नाही तोपर्यंत त्या माझ्यावर नजर ठेवतील.” तिने पुढे सांगितले की, जेव्हा तिच्या मोबाईलमधील ‘लाइव्ह लोकेशन’ फीचर आपोआप बंद झाले, तेव्हा जाखर कथितरित्या तिच्या अपार्टमेंटमध्ये गेल्या आणि सतत बेल वाजवत राहिल्या. “मी त्यांना सांगितले की, लाइव्ह लोकेशन काही तासांनंतर आपोआप बंद होते आणि मी झोपलेली असल्यामुळे त्यांचा फोन घेऊ शकले नाही,” असे ती म्हणाली.
आहानाने असाही आरोप केला आहे की, सीजेपीच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर, पूर्वी विविध विद्यार्थी आंदोलनांमध्ये सहभागी झालेल्या अनेक विद्यार्थ्यांना बोलावून त्यांच्या ठिकाणाबद्दल चौकशी करण्यात आली, परंतु केवळ तिच्यावरच इतक्या मोठ्या प्रमाणात पाळत ठेवण्यात आली. डीसीपी (मध्य) रोहित राजबीर सिंग यांनी ‘द प्रिंट’ला सांगितले की, या परिसरात यापूर्वी अनेक आंदोलने झाल्यामुळे, तशाच प्रकारचे आंदोलन पुन्हा होणार असल्याची माहिती पोलिसांना होती. “त्यामुळे या परिसरात काही आंदोलने होतील का आणि ती कोणत्या स्वरूपाची असतील, याचा अंदाज पोलीस घेत होते,” असे ते म्हणाले. “पाळत ठेवण्या”बद्दल औपचारिक तक्रार प्राप्त झाल्यास, “या प्रकरणाची सखोल चौकशी केली जाईल,” असेही त्यांनी सांगितले.

Recent Comments