scorecardresearch
Sunday, 8 November, 2026
घरराजकारणउत्तरप्रदेशातील भाजपच्या 6 विधान परिषद जागा कायम

उत्तरप्रदेशातील भाजपच्या 6 विधान परिषद जागा कायम

वाराणसी शिक्षक मतदारसंघात समाजवादी पक्षाचा विजय हा या एमएलसी निवडणुकीतील चर्चेचा एक मुख्य विषय ठरला आहे. या निवडणुकीत बहुजन समाज पक्ष आणि काँग्रेसने आपले उमेदवार उभे केले नव्हते.

लखनौ: उत्तरप्रदेश विधान परिषद निवडणुकीत सत्ताधारी भारतीय जनता पक्षाला (भाजप) अपेक्षेप्रमाणे यश मिळालेले दिसत नाही, तर दुसरीकडे 2027 च्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर समाजवादी पक्षाला (सपा) बळ मिळाले आहे. समाजवादी पक्ष पाच जागा जिंकण्याच्या मार्गावर आहे; यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाराणसी लोकसभा मतदारसंघातील ‘शिक्षक मतदारसंघ’ जागेचाही समावेश आहे.

ताज्या कलानुसार, पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघातील एकूण 11 जागांपैकी 6 जागांवर भाजप आपले वर्चस्व कायम राखताना दिसत आहे. मागील निवडणुकीत भाजपने सहा जागा, समाजवादी पक्षाने तीन जागा आणि अपक्ष उमेदवारांनी दोन जागा जिंकल्या होत्या. हे निकाल महत्त्वाचे आहेत, कारण मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी भाजपच्या सर्व उमेदवारांसाठी प्रचार केला होता, तर समाजवादी पक्षाने पाठिंबा मिळवण्यासाठी प्रामुख्याने आपल्या स्थानिक नेत्यांवर अवलंबून राहणे पसंत केले. काँग्रेस किंवा बहुजन समाज पक्षाने या निवडणुकीत उमेदवार उभे केले नव्हते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाराणसी या संसदीय मतदारसंघात, समाजवादी पक्षाने शिक्षक मतदारसंघातील जागा जिंकली आहे, तर पदवीधर मतदारसंघातही त्यांचा उमेदवार आघाडीवर आहे. मागील निवडणुकीतही पक्षाने या दोन्ही जागा जिंकल्या होत्या.

वाराणसी शिक्षक मतदारसंघाचा निकाल सर्वांचे लक्ष वेधून घेणारा ठरला. ताज्या आकडेवारीनुसार, समाजवादी पक्षाचे उमेदवार लाल बिहारी यादव यांनी भाजपच्या प्रमोद मिश्रा यांचा सुमारे 5 हजार मतांनी पराभव केला. यादव यांनी दावा केला की, त्यांचा विजयाचा फरक मागील निवडणुकीच्या तुलनेत पाचपट मोठा आहे. त्यांनी या निकालाचे श्रेय भाजपबद्दल लोकांमध्ये वाढत असलेल्या असंतोषाला दिले. या निकालाला सत्ताधारी पक्षासाठी एक मोठा राजकीय संदेश मानत, यादव यांनी भाजपच्या त्या दाव्याला आव्हान दिले, ज्यामध्ये म्हटले जाते, की सुशिक्षित मतदार आणि बुद्धिजीवी वर्ग अजूनही राज्यातील सत्ताधारी पक्षाच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे. त्यांनी आरोप केला की, भाजप सरकारच्या शिक्षण धोरणांचा या क्षेत्रावर विपरीत परिणाम झाला आहे. त्यांनी उदाहरणे देताना सांगितले की, विनाअनुदानित संस्थांमधील शिक्षक आणि मदरशांमधील आधुनिक शिक्षकांसाठी दिले जाणारे मानधन बंद करण्यात आले आहे.

यादव यांनी आपल्या विजयाचे श्रेय समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव आणि शिक्षकांनी पक्षावर दाखवलेल्या विश्वासाला दिले.

भाजपने आपल्या जागा कायम राखल्या

लखनौमध्ये भाजपने शिक्षक मतदारसंघातील आपली जागा कायम राखली, तर पदवीधर मतदारसंघात समाजवादी पक्षाच्या उमेदवार कांती सिंग आघाडीवर होत्या (शेवटच्या अहवालानुसार). आग्रा येथे भाजपने पदवीधर मतदारसंघाची जागा जिंकली, तर समाजवादी पक्षाने शिक्षक मतदारसंघातील जागा मिळवली. मेरठ-सहारनपूर भागात भाजपने दोन्ही महत्त्वाच्या मतदारसंघांवर आपले वर्चस्व कायम ठेवले. मेरठ शिक्षक मतदारसंघात भाजपचे उमेदवार श्रीचंद शर्मा 18 हजार 99 मतांनी विजयी झाले, तर मेरठ पदवीधर मतदारसंघात दिनेश कुमार गोयल 24 हजार 928 मते मिळवून विजयी झाले. या पक्षाने लखनौ शिक्षक मतदारसंघाची जागा उमेश द्विवेदी यांच्या माध्यमातून, तर बरेली-मुरादाबाद शिक्षक मतदारसंघाची जागा हरी सिंग ढिल्लन यांच्या माध्यमातून जिंकली.

योगी आदित्यनाथ यांनी प्रचार करूनही, भाजपला आपल्या मागील जागांच्या संख्येत सुधारणा करता न आल्याने राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे. उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य यांनी समाजवादी पक्षाच्या यशाची दखल घेत म्हटले की, ज्या मतदारसंघांतून विजयाची अपेक्षा नव्हती, तिथेही या पक्षाने खाते उघडले आहे; उदाहरणार्थ आग्रा आणि लखनौ. बुधवारी पत्रकारांशी बोलताना मौर्य म्हणाले, “भाजपने आपल्या जागांची संख्या कायम राखली आहे, परंतु समाजवादी पक्षाच्या जागांत वाढ झाली आहे. पक्ष (भाजप) यावर विचारमंथन करेल.”

समाजवादी पक्षाच्या प्रवक्त्या पूजा शुक्ला यांनी ‘द प्रिंट’ला सांगितले, “एमएलसी निवडणुकीत सत्ताधारी पक्षाला सहसा फायदा मिळतो, विशेषतः जेव्हा मुख्यमंत्री स्वतः उमेदवारांसाठी प्रचार करतात आणि निवडणुकीवर लक्ष ठेवतात. असे असूनही, हे निकाल 2027 च्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आमच्यासाठी प्रोत्साहन देणारे आहेत.” त्यांनी आरोप केला की, “भाजपने गोरखपूरची जागा फसवणूक करून जिंकली आहे. अन्यथा, त्यांची एकूण संख्या सहा नसून पाच असती.” वाराणसीमधील या गतीचा वापर करून समाजवादी पक्ष 2027 च्या विधानसभा निवडणुकीत भाजपच्या नरेटिव्हला (प्रचारातील मांडणीला) आव्हान देऊ शकतो; जरी केवळ एमएलसी निवडणुकीचे निकाल विधानसभा निवडणुकीत तशाच प्रकारचे यश मिळवून देतीलच असे नाही.

मतमोजणीवरून वाद; तणाव वाढला

मतमोजणी प्रक्रियेदरम्यान गैरवर्तन आणि अनियमिततेचे आरोपही समोर आले आहेत. आग्रा येथे, समाजवादी पक्षाचे उमेदवार आकाश अग्रवाल यांनी आरोप केला की, मतमोजणी केंद्रावर त्यांच्यावर हल्ला करण्यात आला आणि त्यांचा कुर्ता फाडण्यात आला; त्यांनी यासाठी भाजप समर्थकांना जबाबदार धरले. भाजप कार्यकर्त्यांनी हे आरोप फेटाळून लावले आणि दावा केला की, अग्रवाल यांनी स्वतःच आपला कुर्ता फाडला आहे. ‘द प्रिंट’ला मिळालेल्या माहितीनुसार, दोन्ही बाजूंमधील जोरदार वादावादीनंतर पोलिसांनी हस्तक्षेप केला. गोरखपूरमध्ये, समाजवादी पक्षाने मतमोजणी प्रक्रियेत अनियमिततेचा आरोप करत मतमोजणीवर बहिष्कार टाकण्याची घोषणा केली. त्यांचा असा दावा होता की, प्रशासन भाजप उमेदवाराला फायदा पोहोचवण्याचा प्रयत्न करत आहे. या आरोपांची स्वतंत्रपणे पडताळणी होऊ शकलेली नाही.

दरम्यान, प्रयागराज-झाशी पदवीधर मतदारसंघात समाजवादी पक्षाचे उमेदवार मान सिंग यादव आघाडीवर होते, तर लखनौ पदवीधर मतदारसंघात कांती सिंग यांनी आपली आघाडी कायम ठेवली होती. उत्तरप्रदेशात 2027 मध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर, दोन्ही पक्ष या निकालांचे विश्लेषण करत असल्याने, सर्व 11 मतदारसंघांतील अंतिम निकालांकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

येथे जागांनुसार निकाल/कल दिले आहेत:

वाराणसी शिक्षक मतदारसंघ: समाजवादी पक्षाचे लाल बिहारी यादव यांनी भाजपच्या प्रमोद मिश्रा यांचा सुमारे 5 हजार मतांनी पराभव केला.

वाराणसी पदवीधर मतदारसंघ: समाजवादी पक्षाचे आशुतोष सिन्हा, भाजपच्या केदार नाथ सिंह यांच्या विरोधात आघाडीवर आहेत.

मेरठ शिक्षक मतदारसंघ: भाजपचे श्रीचंद शर्मा विजयी, 18 हजार 99 मते मिळवली

मेरठ पदवीधर मतदारसंघ: भाजपचे उमेदवार दिनेश कुमार गोयल 24 हजार 928 मते मिळवून विजयी

आग्रा शिक्षक मतदारसंघ: समाजवादी पक्षाचे उमेदवार आकाश अग्रवाल यांनी भाजपच्या हरी किशोर तिवारी यांचा पराभव केला.

आग्रा पदवीधर मतदारसंघ: भाजपचे डॉ. मानवेंद्र यांनी समाजवादी पक्षाच्या शशांक यादव यांचा पराभव केला

गोरखपूर-फैजाबाद शिक्षक मतदारसंघ: भाजपचे ध्रुव त्रिपाठी अपक्ष उमेदवार राजीव यादव यांच्यापेक्षा आघाडीवर

लखनौ शिक्षक मतदारसंघ: भाजपचे उमेश द्विवेदी यांनी समाजवादी पक्षाच्या सुशील कुमार पटेल यांचा पराभव केला

लखनौ पदवीधर मतदारसंघ: समाजवादी पक्षाच्या कांती सिंग भाजपच्या अवनीश कुमार सिंग यांच्यापेक्षा आघाडीवर

बरेली-मुरादाबाद शिक्षक मतदारसंघ: भाजपचे डॉ. हरी सिंग ढिल्लन यांनी समाजवादी पक्षाच्या दानिश अख्तर यांचा पराभव केला

प्रयागराज-झाशी पदवीधर मतदारसंघ: समाजवादी पक्षाचे मान सिंग यादव भाजपच्या अशोक कुमार राठोड यांच्यापेक्षा आघाडीवर

संबंधित लेख

चुकवू नका

Recent Comments