मुंबई: राज्यात पुढील वर्षी विधानसभा निवडणुका होणार असल्याने, भारतीय जनता पक्षाला गुजरातमध्ये एक दमदार सुरुवात मिळाली आहे. रविवारी ज्या 15 महानगरपालिकांसाठी मतदान झाले, त्या सर्वच्या सर्व महानगरपालिकांमध्ये भाजपने एकहाती विजय मिळवला आहे. ग्रामीण स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची मतमोजणी अद्याप सुरू आहे. अधिकृत आकडेवारीनुसार, या 15 महानगरपालिकांमधील एकूण जागांपैकी 50 टक्क्यांहून अधिक जागांवर भाजपने विजय मिळवला आहे. रविवारी गुजरातमध्ये 15 महानगरपालिका, 84 नगरपालिका, 34 जिल्हा परिषदा आणि 260 तालुका पंचायतींमधील मिळून सुमारे 9 हजार 200 जागांसाठी मतदान पार पडले.
राज्य निवडणूक आयोगाच्या माहितीनुसार, महानगरपालिकांसाठी 55.1 टक्के, नगरपालिकांसाठी 65.5 टक्के, जिल्हा परिषदांसाठी 66.6 टक्के आणि तालुका पंचायतींसाठी 67.2 टक्के मतदानाची नोंद झाली. यावेळी अहमदाबाद, सुरत, वडोदरा, राजकोट, भावनगर आणि जामनगर या विद्यमान महानगरपालिकांसोबतच; नवसारी, गांधीधाम, मोरबी, वापी, आनंद, नडियाद, मेहसाणा, पोरबंदर आणि सुरेंद्रनगर या नव्याने स्थापन झालेल्या नऊ महानगरपालिकांसाठीही मतदान घेण्यात आले. अहमदाबादमध्ये, मंगळवारी सायंकाळी 6 वाजेपर्यंतच्या आकडेवारीनुसार, भाजपने 192 पैकी 160 जागा जिंकत दणदणीत विजय मिळवला, तर काँग्रेसला 32 जागांवर समाधान मानावे लागले. राजकोटमध्येही भाजपने एकहाती वर्चस्व गाजवले; 72 पैकी 65 जागा जिंकत भाजपने मोठा विजय नोंदवला, तर काँग्रेसला 7 जागा मिळाल्या.
“राजकोटचा हा तेजस्वी भगवा रंग! राजकोट महानगरपालिकेत हा भव्य विजय मिळवून दिल्याबद्दल नागरिकांचे मनःपूर्वक आभार आणि सर्व कार्यकर्त्यांचे हार्दिक अभिनंदन,” असे गुजरात भाजपने ‘एक्स’वर केलेल्या पोस्टमध्ये म्हटले आहे.
“या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये भाजपने जनतेचा प्रचंड पाठिंबा मिळवला आहे. ‘ट्रिपल इंजिन सरकार’ने उत्तम कामगिरी केली आहे. गुजरातची जनता गेल्या 30 वर्षांपासून विकासाच्या राजकारणाला सातत्याने पाठिंबा देत आली आहे. काँग्रेस आणि ‘आप’च्या नकारात्मक राजकारणाला हे एक सडेतोड उत्तर आहे,” असे गुजरात भाजपचे प्रवक्ते डॉ. अनिल पटेल यांनी ‘द प्रिंट’शी बोलताना सांगितले. “आम्हाला विश्वास आहे की, येत्या काळात आम्हाला जनतेचा आणखी मोठा पाठिंबा मिळेल. गुजरातची जनता शांतताप्रिय आणि विकासोन्मुख आहे; म्हणूनच त्यांनी आम्हाला मोठ्या संख्येने पाठिंबा दिला आहे आणि येत्या काळातही आम्ही अधिक जोमाने काम करत राहू.” असेही ते म्हणाले.
ग्रामीण गुजरातमध्येही भाजप एक प्रबळ शक्ती म्हणून उदयास आला असून, सायंकाळी 6 वाजेपर्यंत त्यांनी दोन-तृतीयांश जागांवर वर्चस्व गाजवले. जिल्हा परिषदांमध्ये, पक्षाने 1 हजारहून अधिक जागांपैकी जवळपास 600 जागांवर विजय मिळवला, तर काँग्रेसने 75 हून अधिक जागांवर यश संपादन केले. एकूण 5 हजार 234 जागा असलेल्या 260 तालुका पंचायतींमध्ये, सायंकाळी 6 वाजेपर्यंत भाजपने 2 हजार 997 जागा जिंकल्या होत्या. काँग्रेसने 591 जागा मिळवल्या, तर इतरांनी 329 जागांवर विजय मिळवला. काँग्रेससाठी दिलासादायक बाब म्हणजे सुरत महानगरपालिकेत एका प्रभागात (वार्डमध्ये) मिळालेला विजय. गेल्या वेळी या महानगरपालिकेवर ‘आप’ने पूर्णपणे वर्चस्व गाजवले होते. 2021 मध्ये काँग्रेसला येथे एकही जागा मिळाली नव्हती. तसेच, भाजपने बालेकिल्ला मानल्या जाणाऱ्या डभोई नगरपालिकेतही काँग्रेसने विजय मिळवला. अहमदाबादमध्ये काँग्रेसने 32 जागा जिंकल्या, ज्यांची संख्या गेल्या वेळी 24 होती. राजकोटमध्येही त्यांच्या जागांची संख्या गेल्या वेळच्या 4 वरून वाढून 7 झाली.
काँग्रेसचे प्रवक्ते पार्थिव राज यांनी ‘द प्रिंट’ला सांगितले की, जरी ते निकालांच्या बाबतीत पूर्णपणे समाधानी नसले, तरी 2021 च्या तुलनेत पक्षाच्या कामगिरीत नक्कीच सुधारणा झाली आहे. “आम्ही प्रगती करत आहोत आणि लोकांचे प्रश्न सोडवण्यासाठी आम्ही अधिक जोमाने काम करू. लोकशाहीची हत्या होत असली, तरी आम्ही तिच्या रक्षणासाठी आणि ती टिकवण्यासाठी लढा देण्याचा प्रयत्न करत आहोत. सुमारे 9 हजार उमेदवारांपैकी आमच्या उमेदवारांनी कोणाच्याही दबावाला बळी न पडता किंवा कोणालाही न घाबरता खंबीरपणे लढा दिला,” असे ते म्हणाले. ‘आप’साठी मात्र ही कामगिरी फारशी उत्साहवर्धक ठरली नाही. 2021 मध्ये विरोधी पक्षाच्या जागेसाठी एक प्रबळ दावेदार म्हणून उदयास आल्यानंतरही, ‘आप’ला यावेळी तीच जादू पुन्हा निर्माण करण्यात अपयश आले.
सर्वांत मोठा धक्का सुरत महानगरपालिकेत बसला; जिथे 2021 मध्ये पक्षाने 27 जागा जिंकल्या होत्या आणि मुख्य विरोधी पक्ष म्हणून स्थान मिळवले होते. मात्र, यावेळी पक्षाला केवळ 4 जागांवर समाधान मानावे लागले. 2021 च्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये पक्षाला एकूण पडलेल्या मतांपैकी 14 टक्के मते मिळाली होती, ज्यातील मोठा हिस्सा काँग्रेसच्या मतांमधून विभागला गेला होता.

Recent Comments