scorecardresearch
Wednesday, 10 June, 2026
घरराजकारणइंडिया आघाडीच्या बैठकीला उपस्थित न राहण्याचा ‘द्रमुक’चा निर्णय

इंडिया आघाडीच्या बैठकीला उपस्थित न राहण्याचा ‘द्रमुक’चा निर्णय

द्रविड मुन्नेत्र कळघम पक्षाने (द्रमुक) नवी दिल्लीत 8 जून रोजी होणाऱ्या 'इंडिया' आघाडीच्या बैठकीला उपस्थित न राहण्याचा निर्णय घेतला आहे.  पक्षाने गुरुवारी एका निवेदनात ही माहिती दिली.

चेन्नई: द्रविड मुन्नेत्र कळघम पक्षाने (द्रमुक) नवी दिल्लीत 8 जून रोजी होणाऱ्या ‘इंडिया’ आघाडीच्या बैठकीला उपस्थित न राहण्याचा निर्णय घेतला आहे.  पक्षाने गुरुवारी एका निवेदनात ही माहिती दिली. काँग्रेसने ‘डीएमके’ची साथ सोडून विजय यांच्या ‘तमिळगा वेत्री कळघम’ (टीव्हीके) पक्षाच्या नेतृत्वाखालील सरकारमध्ये सामील होण्याचा निर्णय घेतल्यामुळे निर्माण झालेल्या मतभेदांच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला आहे.

4 मे रोजी विधानसभा निवडणुकीचे निकाल जाहीर झाल्यानंतर काँग्रेसने ‘टीव्हीके’ला पाठिंबा दिला होता. ‘डीएमके’च्या नेत्यांनी या कृतीचा निषेध करत त्याला ‘विश्वासघात’ आणि ‘पाठीत खंजीर खुपसणे’ असे म्हटले. तसेच, केवळ राजकीय फायद्यासाठी अनेक दशकांची युती तोडल्याचा आरोप त्यांनी आपल्या जुन्या मित्रपक्षावर केला. ‘टीव्हीके’ सरकारने काँग्रेसला मंत्रिमंडळात दोन पदे आणि राज्यसभेची एक जागा देऊ केली आहे, ज्यामुळे काँग्रेसला राज्यात आपली राजकीय उपस्थिती मजबूत करण्याची संधी मिळणार आहे. काँग्रेस आणि ‘डीएमके’ हे दोन्ही घटक पक्ष असलेल्या ‘इंडिया’ आघाडीच्या नेत्यांची यापूर्वीची बैठक लोकसभा निवडणुकीच्या आधी जून 2024 मध्ये झाली होती. 8 जून रोजी होणाऱ्या या बैठकीचा मुख्य उद्देश भाजपच्या नेतृत्वाखालील एनडीए सरकारविरुद्ध रणनीती आखणे हा आहे. या बैठकीला उपस्थित राहण्याची शक्यता असलेल्या प्रमुख विरोधी नेत्यांमध्ये लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी, काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे, टीएमसीच्या ममता बॅनर्जी आणि अभिषेक बॅनर्जी, शिवसेना (उबाठा) प्रमुख उद्धव ठाकरे आणि समाजवादी पक्षाचे प्रमुख अखिलेश यादव यांचा समावेश आहे.

मात्र, द्रमुकच्या अनुपस्थितीमुळे ‘इंडिया’ आघाडीसमोरील आव्हाने वाढली आहेत. ‘द्रमुक’चे टी.के.एस. एलंगोवन यांनी गुरुवारी ‘एएनआय’ या वृत्तसंस्थेला सांगितले की, त्यांचा पक्ष आता ‘इंडिया’ आघाडीचा भाग नाही. ते म्हणाले, “काँग्रेसने सांगितले की ते ‘टीव्हीके’सोबत जात आहेत आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या तसेच आगामी संसदीय निवडणुकाही ‘टीव्हीके’सोबतच लढवणार आहेत. याचा अर्थ ते आमच्यासोबत नाहीत. काँग्रेसने स्पष्ट केले की ते द्रमुकपासून वेगळे होत आहेत. अशा परिस्थितीत आम्ही ‘इंडिया’ आघाडीत कसे काय राहू शकतो? म्हणूनच आम्ही सांगितले की आम्ही बैठकीला जाणार नाही.” तरीही, द्रमुकने ‘इंडिया’ आघाडीतून बाहेर पडल्याची अधिकृत घोषणा अद्याप केलेली नाही. ‘द प्रिंट’शी बोलताना ‘द्रमुक’चे प्रवक्ते डॉ. एस.ए.एस. हाफिजुल्ला यांनी गुरुवारी सांगितले की, “आम्ही ‘इंडिया’ आघाडीचे सह-संस्थापक होतो, परंतु निवडणुकीनंतर काँग्रेसने ज्या प्रकारे वर्तन केले, त्यामुळे त्या पक्षासोबत काम करणे अशक्य झाले आहे. तरीही, आघाडीतील काँग्रेसव्यतिरिक्त इतर सदस्यांच्या निर्णयांचे आम्ही पालन करू आणि राज्यातील जातीयवादी शक्तींविरुद्धचा लढा सुरूच ठेवू.”

काँग्रेसच्या नेतृत्वाखालील ‘इंडिया’ आघाडीमध्ये ‘द्रमुक’ची  भूमिका महत्त्वाची राहिली आहे आणि त्यांनी राहुल गांधी यांना या आघाडीचे नेते म्हणून उघडपणे पाठिंबा दिला होता. मात्र, निवडणुकीनंतर तामिळनाडूमध्ये झालेल्या राजकीय समीकरणांमधील बदलांमुळे द्रमुकच्या नेत्यांकडून तीव्र प्रतिक्रिया उमटल्या. बदललेल्या राजकीय परिस्थितीचा हवाला देत, द्रमुकच्या खासदार कनिमोळी यांनी लोकसभेत द्रमुक खासदारांसाठी स्वतंत्र बसण्याची व्यवस्था करण्याची अधिकृत विनंतीही केली होती. ‘इंडिया’ आघाडीच्या बैठकीला उपस्थित न राहण्याचा द्रमुकचा निर्णय या आघाडीसाठी मोठा धक्का मानला जात आहे; विशेषतः अशा वेळी जेव्हा ही आघाडी आधीच अंतर्गत मतभेदांशी, जसे की आम आदमी पक्षाचे आघाडीपासूनचे वाढते अंतर आणि तृणमूल काँग्रेसमधील अस्वस्थता – झुंजत आहे. राजकीय निरीक्षकांच्या मते, काँग्रेस आणि द्रमुक यांच्यातील या दुराव्यामुळे तामिळनाडूतील भविष्यातील युतीचे गणित गुंतागुंतीचे होऊ शकते. तामिळनाडूमध्ये सध्या विरोधी पक्षात असलेला द्रमुक पक्ष आता आपला ‘द्रविडियन’ जनाधार स्वतंत्रपणे बळकट करण्यावर किंवा युतीसाठी नवीन पर्याय शोधण्यावर भर देऊ शकतो.

राजकीय विश्लेषक अरुण कुमार यांनी ‘द प्रिंट’ला सांगितले की, “भारतातील बहुतांश राज्यांमध्ये ‘इंडिया’ आघाडी तशीही निष्प्रभ किंवा अकार्यक्षमच आहे. ती केवळ तामिळनाडूमध्येच कार्यरत आणि प्रभावी होती, कारण द्रमुक सर्व घटकांना एकत्र धरून ठेवत होता. पण आता तशी शक्यता उरलेली नाही. तरीही, तामिळनाडूमध्ये द्रमुक आपली भाजप-विरोधी भूमिका कायम ठेवेल आणि त्यात कोणताही बदल होणार नाही.”

आतापर्यंत, ‘इंडिया’ आघाडीत सामील होण्यासाठी टीव्हीके पक्षाला कोणतेही निमंत्रण मिळालेले नाही.

संबंधित लेख

चुकवू नका

Recent Comments