नवी दिल्ली: टीएमसीच्या बंडखोर लोकसभा सदस्य काकोली घोष दस्तीदार यांनी, आपण आणि किमान 20 इतर खासदारांनी भाजपच्या नेतृत्वाखालील एनडीएचा भाग होण्याची इच्छा अधिकृतपणे कळवण्यासाठी लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांना पत्र लिहिण्याचा निर्णय घेतल्याचे जाहीर केल्यानंतर एका दिवसाने, टीएमसीचे ज्येष्ठ नेते कल्याण बॅनर्जी यांनी यावर प्रतिक्रिया दिली. त्यांनी याला ‘सुटका’ असे संबोधले आणि म्हटले की, ज्यांना ममता बॅनर्जी यांच्याबद्दल काही तक्रार आहे त्यांनी पक्षाचा राजीनामा द्यावा.
लोकसभेतील टीएमसीचे मुख्य व्हीप कल्याण बॅनर्जी म्हणाले की, दस्तीदार यांनी आपला निर्णय जाहीर करून 24 तास उलटून गेले आहेत, तरीही या निर्णयाला पाठिंबा देणाऱ्या खासदारांच्या स्वाक्षऱ्या असलेले पत्र कोणालाही दिसलेले नाही. “ते पत्र लोकसभा अध्यक्षांना पाठवले आहे की नाही, हे कोणालाच माहीत नाही. ते पत्र कोणीही पाहिलेले नाही. काकोली दस्तीदार सर्व खासदारांच्या स्वाक्षऱ्या असलेले ते पत्र का दाखवत नाहीत?” असा सवाल बॅनर्जी यांनी मंगळवारी दिल्लीतील आपल्या निवासस्थानी घेतलेल्या पत्रकार परिषदेत केला. बर्धमान-दुर्गापूरचे लोकसभा खासदार आणि सहकारी कीर्ती आझाद यांच्या उपस्थितीत बोलताना टीएमसी नेते म्हणाले की, ते अधिकृतपणे सांगू शकतात की ते पत्र अद्याप अध्यक्षांच्या कार्यालयात पोहोचलेले नाही.
त्यांनी संविधानाच्या 10 व्या अनुसूचीचादेखील उल्लेख केला, ज्यामध्ये स्पष्टपणे नमूद केले आहे, की जर एखादा गट किंवा फळी मूळ पक्षापासून वेगळी होत असेल, तर केवळ विलीनीकरणच शक्य असते. “त्यासाठीही, राजकीय पक्षाच्या किमान दोन-तृतीयंश सदस्यांचे विलीनीकरण होणे आवश्यक आहे. त्यामुळे, जर त्यांना वेगळे व्हायचे असेल, तर भाजपमध्ये विलीन होण्याशिवाय त्यांच्याकडे दुसरा कोणताही पर्याय नाही,” असे बॅनर्जी म्हणाले.
त्यांनी बंडखोर खासदारांना त्यांच्या संबंधित मतदारसंघांना भेटण्याचे आणि पक्ष कार्यकर्त्यांना भेटण्याचे आव्हान दिले. “भाजपमध्ये सामील झाल्यानंतर हे खासदार त्यांच्या मतदारसंघात जाऊन त्या कार्यकर्त्यांना कसे सामोरे जातील, हे मला पाहायचे आहे; ज्या कार्यकर्त्यांनी त्यांच्या विजयासाठी कठोर परिश्रम घेतले होते. या कार्यकर्त्यांना आता भाजपचे गुंड उचलून नेत आहेत आणि मारहाण करत आहेत. हे खासदार त्यांना काय सांगणार आहेत? की ते त्याच पक्षात सामील झाले आहेत, ज्या पक्षाचे गुंड टीएमसी कार्यकर्त्यांना मारहाण करत आहेत?” टीएमसीमधील फुटीमागे भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाचा हात असल्याचा आरोप करत बॅनर्जी म्हणाले की, भाजप मंत्र्यांचा शपथविधी होऊन महिना उलटला, तरीही त्यांना अद्याप खाती (पोर्टफोलिओ) वाटप करण्यात आलेले नाही; अशा परिस्थितीत सुवेंदू अधिकारी यांनी दिल्लीत बंडखोर टीएमसी खासदारांची भेट घेणे ही अत्यंत संतापजनक बाब आहे. गेल्या महिन्यात पश्चिम बंगाल निवडणुकीत भाजपच्या हातून झालेल्या दारूण पराभवानंतर पक्षात बंडाळी माजली होती. तेव्हापासून ममता यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिलेल्या बॅनर्जी यांनी सांगितले की, दस्तिदार यांनी सुखेंदू शेखर राय यांचा आदर्श घेऊन आपल्या खासदारकीचा राजीनामा दिला पाहिजे.
“पण त्या किंवा त्यांना पाठिंबा देणारे इतर खासदार असे करणार नाहीत, कारण त्यांना सत्ता आणि सुरक्षाव्यवस्थेसह सर्व सुख-सुविधा हव्या आहेत. ते पक्ष सोडून जात आहेत, याचा आम्हाला आनंदच आहे. त्यांचे दुतोंडी स्वरूप उघड झाले, ही चांगलीच गोष्ट आहे,” असे ते म्हणाले. “जे लोक भूपेंद्र यादव आणि सुवेंदू अधिकारी यांची भेट घेण्यासाठी त्यांच्या निवासस्थानी गेले होते. आज त्यांचे नेते नरेंद्र मोदी आहेत. ते आता भाजपमय झाले आहेत,” असेही त्यांनी नमूद केले.
टीएमसीच्या पुढील वाटचालीबद्दल विचारले असता, बॅनर्जी म्हणाले, की पक्ष राज्यात लढा देईल. “आम्ही यापूर्वीही मुख्यमंत्र्यांविरुद्ध लढा दिला आहे. आता आम्ही ममता बॅनर्जी यांच्या नेतृत्वाखाली भाजपविरुद्ध लढा देऊ,” असे ते म्हणाले.

Recent Comments