नवी दिल्ली: ‘नीट पेपरफुटी’ला ‘गंभीर गुन्हा’ असे संबोधत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी सांगितले की, ‘सरकारने याप्रकरणी तात्काळ कारवाई केली असून जबाबदार असलेल्यांना शासन होत आहे.’ ‘नीट’चा मुद्दा राजकीय नसून तो देशातील तरुणांशी संबंधित आहे, असे सांगत पंतप्रधानांनी एनडीएच्या संसदीय पक्षाच्या बैठकीदरम्यान हे विधान केले. केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू यांनी प्रसारमाध्यमांना सांगितले की, “बैठकीदरम्यान पंतप्रधान मोदींनी नमूद केले, की पेपरफुटीच्या बातम्या समोर येताच सरकारने त्वरित कारवाई केली आणि 13 जणांना अटक करून तुरुंगात पाठवले.
पंतप्रधानांचे हे विधान अशा वेळी आले आहे, जेव्हा देशभरातील विद्यार्थी आणि पालकांमध्ये नीट परीक्षेच्या पेपरफुटीबाबत तीव्र संताप दिसून येत आहे; या संतापापोटी ‘कॉकरोच जनता पार्टी’च्या (सीजेपी) नेतृत्वाखाली जंतरमंतर येथे निदर्शनेही करण्यात आली होती. “पंतप्रधान म्हणाले की, पेपरफुटीची बातमी मिळताच सरकारने त्वरित तपास केला आणि 13 जणांना अटक केली. विद्यार्थ्यांचे भविष्य धोक्यात येऊ नये म्हणून ‘नीट’ची फेरपरीक्षा घेण्यात आली,” असे रिजिजू म्हणाले.
“त्याच वेळी, विद्यार्थ्यांच्या भविष्यावर कोणताही परिणाम होऊ नये याची काळजी घेत नीट फेरपरीक्षेला प्राधान्य देण्यात आले, ती यशस्वीपणे पार पडली आणि निकालही विलंब न करता जाहीर करण्यात आले. भविष्यात अशा प्रकारची पेपरफुटी रोखण्यासाठी कठोर पावले उचलण्यात आली आहेत, असेही पंतप्रधान म्हणाले. पेपरफुटीच्या रॅकेटमध्ये सहभागी असलेल्यांना अटक करून तुरुंगात पाठवण्यात आले आहे,” असेही त्यांनी नमूद केले. रिजिजू यांनी असेही सांगितले की, पंतप्रधानांनी आवाहन केले आहे, की ‘दोषींना देशातील सर्वोत्तम वकिलांच्या मदतीने शक्य तितकी कठोर शिक्षा दिली जावी. जेणेकरून अशा गंभीर गुन्ह्यात सहभागी असलेल्यांवर कठोर कारवाई होईल आणि अशा घटनांची पुनरावृत्ती होणार नाही’.
सोमवारी, महिनाभर चाललेल्या आंदोलनाची दखल घेत आणि हजारो समर्थकांनी राजधानीत धडक देऊन आपला आवाज ऐकवण्याची मागणी केली असताना, केंद्रीय मंत्री जे. पी. नड्डा यांनी सीजेपीच्या प्रतिनिधींची भेट घेतली. ते म्हणाले: “आज सकाळी पहिल्यांदाच आंदोलकांकडून सरकारशी चर्चा करण्याचा प्रस्ताव आला आणि सकाळी 11.50 पासून आमची चर्चा सुरू आहे.”
एका वरिष्ठ खासदाराच्या म्हणण्यानुसार, पंतप्रधानांनी हे देखील अधोरेखित केले, की पेपरफुटी ही केवळ एका राज्याची किंवा केवळ केंद्राची समस्या नसून ती संपूर्ण देशाची समस्या आहे. “देशभरात ज्यांनी असे (पेपरफुटीचे) गुन्हे केले आहेत, त्यांना शिक्षा व्हावी यासाठी सर्वांनी (सर्व राजकीय पक्षांनी) एकत्र आले पाहिजे. हा काही राजकीय मुद्दा नसून देशाचा मुद्दा आहे. अशा लोकांना आपल्या तरुणांच्या भवितव्याशी खेळण्यापासून रोखण्यासाठी आपण कठोर पावले उचलली पाहिजेत आणि आधीपासूनच कार्यरत असलेल्या अभेद्य प्रणालीला बळकट करण्यासाठी सर्वांनी योगदान दिले पाहिजे,” असे रिजिजू यांनी नमूद केले. बैठकीदरम्यान पंतप्रधान मोदींनी भविष्यात पेपरफुटीसारख्या घटना घडू नयेत, यासाठी सर्व राज्य सरकारांनी मिळून काम करण्यावर भर दिला.
कर्नाटकच्या एका खासदाराने सांगितले की, पंतप्रधान मोदींच्या मते ‘नीट’ची फेरपरीक्षा सुरळीत पार पडली. “आम्ही नेहमीच सोबत आहोत, पण आपण एक भक्कम प्रणाली उभारली पाहिजे. त्यांनी पुढे सांगितले की, पूर्वी पेपरफुटीच्या घटना सर्रास घडत असत, परंतु यावेळी त्यावर कठोर कारवाई करण्यात आली आहे,” असे ते म्हणाले. “पंतप्रधान केवळ नीट परीक्षेबद्दलच नाही, तर सर्वसाधारणपणे परीक्षांबद्दलही बोलत होते. त्यांनी सांगितले की, स्वार्थी हेतूंमुळे परीक्षांचे पेपर फुटतात. आपण अशी प्रणाली विकसित केली पाहिजे ज्यामुळे मुलांच्या भवितव्यावर कोणताही विपरीत परिणाम होणार नाही,” असे त्या खासदाराने सांगितले. तसेच, सध्या सुरू असलेल्या निदर्शनांचा यात कोणताही उल्लेख झाला नाही, याकडेही त्या खासदाराने लक्ष वेधले.
खासदारांनी निदर्शनास आणून दिले की, सरकारने ‘नीट’ पुनर्परीक्षेत विलंब होणार नाही याची आणि ती लवकरात लवकर घेतली जाईल हे सुनिश्चित केले, तसेच निकालही वेळेवर जाहीर झाले.

Recent Comments