नवी दिल्ली: ‘संसद चलो’ मोर्चादरम्यान आंदोलकांवरील कथित पोलीस कारवाईसाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना जबाबदार धरत, विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी बुधवारी त्यांना पदावरून दूर करण्याची मागणी केली.
आंदोलकांवर गोळीबार झाल्याचा आरोप सरकारने फेटाळून लावला, व असे आदेश मंत्र्यांनी नव्हे, तर प्रशासनाने दिले होते, असे स्पष्टीकरण आल्यानंतर ही मागणी करण्यात आली. संसदेतील गदारोळानंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेत राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना अमित शहा यांना पदावरून हटवण्याची आणि या घटनेची सर्वोच्च न्यायालयाच्या देखरेखीखाली चौकशी करण्याचे आदेश देण्याची विनंती केली. दिल्ली पोलीस आणि रॅपिड ॲक्शन फोर्स (आरएएफ) यांनी विद्यार्थी आणि निदर्शकांवर अवाजवी बळाचा वापर केल्याचा आरोप त्यांनी केला.
निदर्शकांना लाठ्यांनी आणि खिळे लावलेल्या दांड्यांनी मारहाण करण्यात आली, तसेच त्यांच्यावर पेलेट गनने गोळीबार करण्यात आला आणि साध्या वेशातील व्यक्तींनी त्यांच्यावर हल्ले केले, असा आरोप राहुल गांधी यांनी केला. निदर्शकांविरुद्ध ‘फेशियल रेकग्निशन’ (चेहरा ओळखण्याचे) तंत्रज्ञान वापरले जात असल्याचा दावाही त्यांनी केला आणि हिंसाचारात कथितरीत्या सहभागी असलेल्या लोकांच्या ओळखीबाबत प्रश्न उपस्थित केले. “दिल्ली पोलीस आणि आरएएफ हे दोन्ही अमित शहा यांच्या अखत्यारीत येतात. यात केवळ दोनच शक्यता आहेत, एकतर अमित शहा यांनीच निष्पाप निदर्शकांवरील हिंसाचाराचे आदेश दिले किंवा ते इतके अकार्यक्षम आहेत, की हे सर्व घडत असताना त्यांना त्याची काहीच कल्पना नव्हती. काहीही असले तरी, त्यांना पदावरून हटवलेच पाहिजे,” अशी मागणी राहुल गांधी यांनी केली.
संघर्षादरम्यान तिथे उपस्थित असलेल्या अनोळखी व्यक्तींबद्दल प्रश्न उपस्थित करत गांधी म्हणाले, “निदर्शकांवर हल्ला करणारे साध्या वेशातील हे लोक कोण होते? हे गुंड कोण होते? आपल्याच विद्यार्थ्यांविरुद्ध बजरंग दलाचा वापर केला जात आहे.”
त्यांनी सरकारच्या शिक्षणव्यवस्था हाताळण्याच्या पद्धतीवरही टीका केली. बुधवारी लोकसभेत मंजूर झालेले ‘सार्वजनिक परीक्षा (अयोग्य मार्गांचा प्रतिबंध) सुधारणा विधेयक, 2026’ हे मूळ समस्येचे निराकरण करण्यात अपयशी ठरले आहे, असे ते म्हणाले. “हे केवळ पेपरफुटीच्या गुन्ह्यासाठी शिक्षा देणारे विधेयक आहे. हे विद्यार्थ्यांच्या बाबतीत केवळ एक ‘रबर स्टॅम्प’ किंवा वरकरणी मलमपट्टी (बँड-एड) लावण्यासारखे आहे. जर भाजपला शिक्षणात सुधारणा करण्याबाबत खरोखरच गांभीर्य असेल, तर शिक्षणव्यवस्थेतून आरएसएसला दूर केले पाहिजे,” असेही त्यांनी नमूद केले. राहुल गांधी यांनी संसदेत हा मुद्दा मांडण्याचा प्रयत्न केला असता, सरकारने त्यांना गप्प केल्याचा आरोपही केला. “मी अध्यक्षांकडे बोलण्याची परवानगी अनेकदा मागितली. मला संसदेत बोलू दिले गेले नाही. जी क्रूरता घडली, त्यासाठी अमित शहा जबाबदार आहेत, असे मी म्हणालो. मला आश्वासन देण्यात आले की जर मी माफी मागितली, तर मला बोलू दिले जाईल. मी भाजप, आरएसएस किंवा त्यांच्याशी संबंधित कोणाचीही कधीही माफी मागणार नाही,” असे ते म्हणाले.
“माझ्यासाठी सर्वांत महत्त्वाचा मुद्दा म्हणजे आमचे विद्यार्थी. जे लोक मुक्त विचारांचे आहेत आणि प्रश्न विचारतात, त्यांच्यावर दिल्लीच्या रस्त्यांवर क्रूर अत्याचार करण्यात आले. त्यांच्यावर पेलेट गनने गोळ्या झाडण्यात आल्या. विद्यार्थ्यांवर होणारा हा अत्याचार केवळ त्यांच्यासाठीच नाही, तर लाखो लोकांसाठी एक मूलभूत मुद्दा आहे,” असेही त्यांनी पुढे सांगितले. त्यांनी पुढे असा दावा केला की, संसदेत घडामोडी सुरू असताना केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंह यांना अमित शहा यांचे वारंवार फोन येत असल्याचे त्यांनी पाहिले होते. “मी संसद भवनात असताना, जितेंद्र सिंह यांना अमित शहा यांचे एकापाठोपाठ एक फोन येत असल्याचे मी पाहिले. जर त्यांना हे काय चालले आहे याची कल्पना नसेल, तर ते अकार्यक्षम आहेत.” संसदेत उत्तर न दिल्याबद्दल शहा यांच्यावर टीका करताना राहुल गांधी म्हणाले, “तुमच्या प्रश्नांची उत्तरे देण्याचे धाडस त्यांच्यात नाही. ते तुमच्यासमोर उभे राहून तुमचे प्रश्न स्वीकारणार नाहीत.”
राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवरही निशाणा साधला आणि म्हटले, “केवळ ‘रील्स’ बनवल्यामुळे आपण ‘जनरेशन झेड’शी संवाद साधू शकतो, असे पंतप्रधानांना वाटते. पण खरी समस्या तुमच्या प्रतिमेची आहे. तुम्ही अर्थव्यवस्था आणि विद्यार्थ्यांचे जे नुकसान केले आहे, ते सर्वांना माहीत आहे.” हा मुद्दा लावून धरण्याचे आश्वासन आंदोलकांना देताना राहुल गांधी म्हणाले, “दोषींना शिक्षा होईलच, ही आमची हमी आहे. पंतप्रधानांनी अमित शहा यांना पदावरून दूर करावे आणि सर्वोच्च न्यायालयामार्फत चौकशीचे आदेश द्यावेत, अशी आम्ही मागणी करतो.”

Recent Comments