नवी दिल्ली: अर्णब चक्रीवादळ किनारपट्टीवर धडकल्यानंतर, नॅशनल डिझास्टर रिस्पॉन्स फोर्स (एनडीआरएफ) चे महानिरीक्षक एन. एस. बुंदेला यांनी सांगितले की, आंध्रप्रदेशला सर्वाधिक फटका बसला आहे. येथे 30 हून अधिक घरांचे नुकसान झाले असून 3 जणांचा मृत्यू झाल्याचे वृत्त आहे.
बुंदेला यांनी बुधवारी घेतलेल्या पत्रकार परिषदेत सांगितले, “चक्रीवादळ अर्णब धडकल्यापासून उत्तर आंध्रप्रदेश आणि दक्षिण ओडिशामध्ये मुसळधार पावसामुळे सर्वाधिक परिणाम झाला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, आंध्रप्रदेशात वादळामुळे 31 घरांचे नुकसान झाले असून 3 जणांचा मृत्यू झाला आहे.” एनडीआरएफ प्रमुखांच्या माहितीनुसार, आंध्रप्रदेशातील विशाखापट्टणम, विजयनगरम, अनकापल्ली आणि श्रीकाकुलम जिल्ह्यांत पावसाचा सर्वाधिक फटका बसला आहे, तर ओडिशामध्ये कोरापुट, गंजाम आणि गजपती जिल्ह्यांत सर्वाधिक पाऊस झाला आहे. एनडीआरएफ पथकाने सांगितले की, “सध्या दोन्ही राज्यांत एनडीआरएफ, एसडीआरएफ आणि आपत्कालीन प्रतिसाद पथके सक्रिय आहेत. याव्यतिरिक्त, भारतीय हवाई दलाने मंगळवारी रात्री दोन फेऱ्या करून आंध्र प्रदेशात एनडीआरएफची आणखी चार पथके तैनात केली आहेत.”
बुंदेला यांनी पुढे सांगितले की, बुधवारी सकाळपर्यंत आंध्र प्रदेशातील 764 गावे बाधित झाली असून 57 हजार लोकांना सुरक्षित स्थळी हलवून मदत छावण्यांमध्ये स्थलांतरित करण्यात आले आहे. ते म्हणाले, “ऐतिहासिक आकडेवारीच्या आधारे आम्ही सखल भाग आणि संवेदनशील ठिकाणांची ओळख पटवली होती. बचाव पथकांनी गर्भवती महिलांना आधीच रुग्णालयात हलवले होते, तसेच महिला, मुले आणि वृद्धांना प्राधान्य देऊन त्यांना सुरक्षित स्थळी हलवण्याचे काम केले.”

त्यांनी असेही सांगितले की, पावसाचा फटका सुरुवातीला आंध्र प्रदेश आणि ओडिशामध्ये बसला असला, तरी झारखंड आणि छत्तीसगडवरही याचा परिणाम होण्याची शक्यता आहे. ते म्हणाले, “मिळालेल्या माहितीनुसार, तीव्र चक्रीवादळ म्हणून सुरू झालेली ही प्रणाली संध्याकाळपर्यंत ‘डीप डिप्रेशन’मध्ये (खोल कमी दाबाचे क्षेत्र) रूपांतरित होईल आणि त्याचा परिणाम झारखंड व छत्तीसगडवर होऊ शकतो.”
त्यांनी पुढे सांगितले, “सध्या आंध्र प्रदेशात एनडीआरएफची 39 आणि एसडीआरएफची 80 पथके तैनात आहेत. गरज पडल्यास इतर राज्यांतही अधिक पथके पाठवली जातील. बचाव पथकांनी संवेदनशील भागांतील लोकांना शोधून सुरक्षित स्थळी हलवले आहे, तसेच तेथील जाहिरात फलक (होर्डिंग्ज) आणि बोटी हटवण्याचे कामही केले आहे.”

Recent Comments