scorecardresearch
Tuesday, 18 August, 2026
घरन्यायजगत‘राममंदिर देणगी चोरी प्रकरणातील आरोपींची बाजू मांडणाऱ्या वकीलास दंड': अयोध्या बार असोसिएशन

‘राममंदिर देणगी चोरी प्रकरणातील आरोपींची बाजू मांडणाऱ्या वकीलास दंड’: अयोध्या बार असोसिएशन

राममंदिर देणगी चोरीच्या प्रकरणातील आरोपींची बाजू कोणताही वकील मांडणार नाही, असा निर्णय अयोध्या बार असोसिएशनने घेतला आहे. तसेच, जर एखाद्या वकिलाने हे प्रकरण हाती घेण्याचा निर्णय घेतला, तर असोसिएशनने त्यांच्यावर 5 लाख रुपयांचा दंड आकारण्याचा निर्णय घेतला आहे.

नवी दिल्ली: राममंदिर देणगी चोरीच्या प्रकरणातील आरोपींची बाजू कोणताही वकील मांडणार नाही, असा निर्णय अयोध्या बार असोसिएशनने घेतला आहे. तसेच, जर एखाद्या वकिलाने हे प्रकरण हाती घेण्याचा निर्णय घेतला, तर असोसिएशनने त्यांच्यावर 5 लाख रुपयांचा दंड आकारण्याचा निर्णय घेतला आहे.

“चंपत राय, गोपाल राव आणि अनिल मिश्रा यांच्यावर गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया सुरू केली जाईल. तसेच या प्रकरणाची सीबीआय चौकशी व्हावी, अशी मागणी करण्याचा निर्णयही घेण्यात आला आहे. गरज पडल्यास, अयोध्या ॲडव्होकेट्स असोसिएशन स्वतःच्या खर्चाने सर्वोच्च न्यायालय आणि उच्च न्यायालयात दाद मागेल,” असे अयोध्या बार असोसिएशनचे अध्यक्ष कालिका प्रसाद मिश्रा यांनी एएनआयला सांगितले. “ज्यांना तुरुंगात पाठवण्यात आले आहे, ते चालक किंवा स्वच्छता कर्मचारी आहेत. ते खरे गुन्हेगार नाहीत. चंपत राय, अनिल मिश्रा आणि गोपाल राव हे मुख्य आरोपी आहेत, परंतु प्रशासन त्यांना वाचवत आहे,” असे अयोध्या बार असोसिएशनचे उपाध्यक्ष राजेश कुमार उपाध्याय यांनी ‘द प्रिंट’ला सांगितले.

भारतीय नागरिक सुरक्षा संहितेच्या कलम 175 अन्वये चंपत राय, गोपाल राव आणि अनिल मिश्रा यांच्या विरोधात कायदेशीर कारवाई सुरू करण्याबाबत विचार करण्याचा ठराव असोसिएशनने केला आहे. हे कलम न्यायालयीन दंडाधिकाऱ्याला (ज्युडिशिअल मॅजिस्ट्रेट) पोलिसांना एफआयआर नोंदवण्याचे आणि दखलपात्र गुन्ह्याचा तपास करण्याचे आदेश देण्याचे अधिकार देते.

निवृत्त आयएएस अधिकारी नृपेंद्र मिश्रा यांची राम मंदिर ट्रस्टच्या मुख्य कार्यकारी अधिकारीपदी नियुक्ती करण्याबाबतच्या चर्चेवर उपाध्याय म्हणाले, “जेव्हा कारसेवकांवर गोळीबार झाला, तेव्हा ते सरकारमध्ये मुख्य सचिव होते. सरकार त्यांना सीईओ बनवण्याचा विचार करत असल्याचे आम्हाला ऐकायला मिळत आहे. आम्ही यालाही विरोध करू. आम्ही हे घडू देणार नाही.”

संबंधित लेख

चुकवू नका

Recent Comments